दमदार इंजिन अन् मोठी बचत; Royal Enfield ने लॉन्च केली इथेनॉलवर चालणारी बाईक, किंमत... By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:00 PM 2024-02-01T19:00:19+5:30 2024-02-01T19:05:47+5:30
Royal Enfield Classic 350: कंपनीने पहिली इथेनॉलवर चालणारी Royal Enfield Classic 350 आणली आहे. Royal Enfield Classic 350: देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Royal Enfield ने मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांची देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने हे नवीन अपडेट सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाइकमध्ये केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने इथेनॉलवर चालणारे E-20 कंप्लायन्स मॉडेल मर्यादित डीलरशिपना पाठवण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकमध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल मिसळून इंधन वापरता येईल. बाकी ही बाईक आधीच्या बाईकप्रमाणेच असेल.
या नवीन Royal Enfield Classic 350 मध्ये 349cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे शक्तिशाली इंजिन 20.2 bhp आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.
Royal Enfield Classic 350 ची बाजारात सुरुवातीची किंमत 1.93 लाख ते 2.25 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही बाईक 41 kmpl चे मायलेज देते. सुरक्षेसाठी या बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. याशिवाय, ॲनालॉग स्पीडोमीटर, टेल लाईट्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळते.
काय आहे इथेनॉल? इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळून वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. इथेनॉल प्रामुख्याने ऊसापासून तयार केले जाते.
इथेनॉलच्या वापरामुळे कार्बन मोनोऑक्साइडचे उत्सर्जन 35 टक्के कमी होते. एवढेच नाही तर ते सल्फर डायऑक्साइड देखील कमी करते. याशिवाय इथेनॉलमुळे हायड्रोकार्बन उत्सर्जनही कमी होते. इथेनॉलमध्ये 35 टक्के ऑक्सिजन असते.
नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारने इथेनॉलच्या किमती निश्चित केल्या होत्या, त्यानुसार सी हेवी मोलॅसेस इथेनॉलची किंमत 49.41 रुपये प्रति लिटर, बी हेवी मोलासेस इथेनॉलची किंमत 60.73 रुपये प्रति लिटर आहे.