Safest Cars in India: देशात फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कार किती? टाटाचा एक नंबर, महिंद्राही रेसमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:22 PM2022-09-01T15:22:43+5:302022-09-01T15:28:57+5:30

भारतातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल बोलायचे झाले तर टाटा आणि महिंद्राच्या कार या यादीत आघाडीवर आहेत.

फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग किती महत्वाची हे गेल्या काही दिवसांतील अपघातावरून लक्षात येते. अपघात हे काही सांगून होत नाहीत, परंतू त्या वाहनात असलेल्यांचा जीव वाचणे खूप महत्वाचे असते. पाच पन्नास हजारासाठी अनेकजण झिरो रेटिंग असलेल्या कारही घेतात, पण जीव गमावतात तेव्हा तेच जात नाहीत तर अख्ख्या कुटुंबाचे नुकसान करून जातात. लाखोंच्या गाड्या घेऊन जीव एवढा स्वस्त करून ठेवला जातो. फाईव्ह स्टार रेटिंगच्या कारही आपल्या भारतात उपलब्ध आहेत. जास्त नसल्या तरी त्या तुमचा जीव वाचविण्यासाठी समर्थ आहेत.

भारतातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल बोलायचे झाले तर टाटा आणि महिंद्राच्या कार या यादीत आघाडीवर आहेत. त्यांना 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. देशात सर्वात पहिली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगवाली कार टाटाने आणली होती, टाटा नेक्सॉन. तेव्हा तर ग्लोबल एनकॅपचे सीईओ भारतात लाँचिंगला आले होते. यानंतर महिंद्राने एक फाईव्ह स्टार सेफ्टीवाली कार लाँच केली. आता टाटाच्या तीन आणि महिंद्राच्या दोन कार भारतात उपलब्ध आहेत.

Tata Altroz ही टाटा मोटर्सची प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ग्लोबल NCAP मिळालेली ही टाटाची दुसरी कार आहे. किंमत 5.69 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1399cc चे इंजिन आहे. या हॅचबॅकमधील सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, व्हॉईस अलर्ट, फॉग लॅम्प्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल देण्यात आले आहेत.

टाटा नेक्सॉनला क्रॅश चाचणीत 17 पैकी 16.6 गुण मिळाले आहेत. सुरुवातीची किंमत 7.09 लाख रुपये असून 21.5 kmpl चे मायलेज देते. या SUV मध्ये 1499cc चे इंजिन देण्यात आले आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ब्रेक डिस्क वाइपिंग, इमर्जन्सी ब्रेक असिस्टंट, हिल होल्ड असिस्ट, ESP, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोलसह ISOFIX माउंट्स समाविष्ट आहेत.

टाटा पंच ही सुरक्षा नियमांची पूर्तता करणारी छोटी कार आहे. याला ग्लोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग देखील दिले आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शनर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, सीटबेल्ट रिमाइंडर, ISOFIX अँकरेज आणि ABS यांचा समावेश आहे. क्रॅश चाचणीत 17 पैकी 16.45 गुण मिळाले आहेत. फ्रंट फॉग लॅम्प्ससह ड्युअल एअरबॅग्ज, टॉप ट्रिम्समध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि रेन सेन्सिंग वायपर्स देखील मिळतात.

Mahindra XUV700 ही महिंद्राची दुसरी फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगवाली कार आहे. या कारला 'सेफर चॉईस अवॉर्ड'ही देण्यात आला आहे. XUV700 MX एसयूव्हीचे डिझेल व्हेरिअंट 155hp च्या दमदार 2.2 लीटर इंजिनसह उपलब्ध आहे. तर याचं पेट्रोल व्हेरिअंट 200hp च्या क्षमतेसह २.० लीटर टर्बोचार्ज्ड पावरप्लांट इंजिनसह उपलब्ध आहे.

महिंद्राची कॉम्पॅक्ट SUV XUV300 ही 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे. कंपनीने यामध्ये 7 एअरबॅग दिल्या आहेत. याशिवाय, EBD सह ABS, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, 6-स्पीड ट्रान्समिशन, LED टेल लॅम्प आणि सर्व 4 पॉवर विंडो या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्याची किंमत 9.95 लाख रुपयांपासून सुरू होते. 20 kmpl मायलेज आहे.