Electric Scooter Vs. Bike: इलेक्ट्रीक स्कूटर घेऊ की बाईक? आधी फरक समजून घ्या...; सोपे जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:27 PM2021-12-24T18:27:56+5:302021-12-24T18:34:22+5:30

Electric Scooter Vs. Bike comparison: कारपेक्षा दुचाकींकडे जास्त ओढा असला तरी यामध्येही काही प्रकार आहेत. ते पहिल्यांदा समजून घ्यायला हवेत.

लोकांमध्ये आता इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक, कार घेण्याची इच्छा वाढू लागली आहे. सरकारी आकड्यांनुसार यंदा दुप्पट इलेक्ट्रीक वाहने विकली गेली आहेत. दर आठवड्याला ५००० स्कूटर, बाईकची विक्री होत आहे. कारपेक्षा दुचाकींकडे जास्त ओढा असला तरी यामध्येही काही प्रकार आहेत. ते पहिल्यांदा समजून घ्यायला हवेत.

अनेकदा ई बाईक असा शब्द कानी पडतो. त्यालाच लोक इलेक्ट्रीक स्कूटर किंवा मोटरसायकल समजतात. पण ती दुचाकी नसते तर सायकल असते. चला जाणून घेऊयात ही ई बाईक काय असते. जर तुम्ही ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई बाईक किंवा ई स्कूटर पैकी कोणते वाहन निवडावे, ते देखील तुमच्या लक्षात येईल.

सर्वात आधी तुम्हाला ई बाईकचा कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. ई बाईक म्हणजे तुम्ही जुन्या सायकलींचे नवीन स्वरूप म्हणू शकता. याला सामान्य सायकल सारखेच पॅडल असतात. तसेच बॅटरीची ताकदही वापरली जाते. यामुळे ही बाईक इलेक्ट्रीक उर्जेवर देखील पळू लागते.

देशात सध्या जेवढ्या ई बाईक आहेत, त्यापैकी अधिकांशचा वेग हा 20 ते 25 किमी आहे. तसेच सिंगल चार्जमध्ये या बाईक 30 ते 35 किमी जाऊ शकतात. काही कंपन्यांनी 80 ते 100 किमीरेंजच्या ई बाईक लाँच केल्या आहेत. या कमी रेंजच्या सायकलचा वापर काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

जर तुम्ही ई बाईकचा वापर करण्याचा विचार करत असाल तर त्याची दोन वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला सायकल चालविण्याची मजा देखील अनुभवता येईल, व्यायामही होईल. तसेच दमणार देखील नाही. याचबरोबर सामान्य सायकलने 10 ते 15 किमीचे अंतर कापणे कठीण असते, या ई बाईकने ते सोपे होईल. अर्ध्या पाऊन तासात तुम्ही 15 किमीचे अंतर पार कराल.

याशिवाय यामध्ये रिमुव्हेबल बॅटरी असते. यामुळे तुम्ही काही तासांत ही बॅटरी घरी, दुकानात चार्ज करू शकता. काही ई बाईकमध्ये पॅडल मारल्यावर बॅटरी चार्ज होण्याची सुविधा आहे.

ई बाईक ही ई स्कूटर किंवा मोटरसायकलच्या तुलनेत स्वस्त असते. 30 ते 40 हजारांत ही ई बाईक मिळते. ही ई बाईक मोठमोठ्या कंपन्या किंवा सोसायट्या, कॉलेज कॅम्पस आदी ठिकाणी वापरता येते. ज्या ठिकाणी एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत किंवा कंपनीत जाण्यासाठी अंतर जास्त आहे तिथे या वापरता येतील. शिवाय रोजचा बाजारात फेरफटका मारायचा असेल तर देखील या वापरता येतील.

जर तुमचा होम डिलिव्हरी किंवा कुरिअरचा बिझनेस असेल तर तुम्ही ही ई बाईक वापरू शकता. कोरोना काळात लोक ऑनलाईन ऑर्डर, किराना, खाद्य पदार्थ आदी मागवितात. हे पदार्थ पोहोचविण्यासाठी ई बाईक खूप फायद्याची ठरेल.

आता विषय येतो इलेक्ट्रीक स्कूटर घ्यावी की ई बाईक, याचा. ही गोष्ट तुमच्या वापरावर अवलंबून आहे. ई स्कूटरने तुम्हाला जास्त लांबचा प्रवास करता येतो. मात्र, काही स्कूटरना रिमुव्हेबल बॅटरी नाही, त्यामुळे त्यांना चार्ज करण्याची समस्या आहे.

इलेक्ट्रीक स्कूटरचे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागते. ई बाईकसाठी रजिस्ट्रेशन करावे लागत नाही. तसेच ईस्कूटर आणि बाईकमध्ये दुपटीपेक्षाही जास्त किंमतीचे अंतर आहे. यामुळे देखील तुम्हाला काय घ्यावे हे तुमच्या बजेटनुसार ठरवावे लागणार आहे.