सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई! जबरदस्त रेंजवाली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 18:58 IST2022-03-01T18:51:31+5:302022-03-01T18:58:32+5:30
फक्त एकदा चार्ज करा आणि मुंबई-पुणे-मुंबई असा बिनधास्त प्रवास करा...चार्जिंगच्या समस्येवर सिंपल वन कंपनीनं शोधला उपाय!

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढत असला तरी दूरवरच्या प्रवासासाठी इलेक्ट्रीक वाहनांना मर्यादा येत असल्याचं बोललं जातं. पण आता इलेक्ट्रीक वाहन निर्मात्या कंपन्या या मुद्द्यावर लक्ष वेधत असून बॅटची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत.
सिंपल वन कंपनीनं एक जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. सिंपल एनर्जी कंपनीनं मंगळवारी अतिरिक्त बॅटरी पॅकची घोषणा केली आहे. या बॅटरी पॅकमुळे सिंपल वनच्या इलेक्ट्रीक स्कूटर्सची ड्रायव्हिंग रेंज वाढणार आहे.
नव्या बॅटरी पॅकच्या माध्यमातून सिंपल वनच्या इलेक्ट्रीक स्कूटरची सिंगल चार्ज रेंज आता तब्बल ३०० किमी इतकी होणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सिंगल चार्जमध्ये तुम्ही सिंपल वनच्या इलेक्ट्रीक स्कूटरवरुन मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास करू शकणार आहात.
सिंपल वनच्या दाव्यानुसार प्राथमिक परिस्थितीत स्कूटरची बॅटरी २३६ किमी इतकी ड्रायव्हिंग रेंज देते. पण अतिरिक्ट बॅटरी पॅक 1.6kWh बसविण्यात आल्यानंतर याची रेंज आणखी वाढवता येणार आहे. अतिरिक्त बॅटरीला स्कूटरच्या बूट स्पेसजवळील जागेवर फीट करता येणार आहे.
फास्ट चार्जिंगसह अनेक फिचर्स
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर अपग्रेड केली जाईल, ज्यामध्ये 8.5kW पर्यंतची मोटर दिली जाऊ शकते. ही मोटर 72 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध असेल.
स्कूटरमध्ये 30 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देखील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्मार्ट नेव्हिगेशन सारखे फीचर्स देखील आहेत. या स्कूटरमध्ये रायडिंग मोड, फोन अॅप, कॉल आणि म्युझिक कंट्रोलची वैशिष्ट्ये आहेत.
किंमतीत काय बदल होईल?
सिंपल वन स्कूटरच्या ओरिजनल व्हेरिअंटची किंमत 1.09 लाख रुपये आहे, परंतु जर तुम्ही अतिरिक्त बॅटरी बॅकअपचा पर्याय विकत घेतला तर त्याची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. त्याची बुकिंग फक्त 1,947 रुपयांमध्ये करता येते आणि डिलिव्हरी जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी स्पर्धा?
सिंपल वनची ड्रायव्हिंग रेंज इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा खूप जास्त आहे. ही स्कूटर Ola S1 Pro आणि Ather सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते, जे सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर्सना त्यांची गुणवत्ता, डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह तोडीस तोड स्पर्धा करतात. Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिव्हर्स गियरचा पर्याय देखील देण्यात आला आहे.