सगळंच उलटं! समजायला, वेग घ्यायला वेळ लागेल, पण स्कोडाची कोडियाक वेड लावेल... कशी वाटली? By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:47 AM 2023-08-24T11:47:07+5:30 2023-08-24T11:58:29+5:30
Skoda Kodiaq review in Marathi: आज देशाचा तरुणाईचा काळ आहे. थोडीशी हायफाय जीवनशैली, आयटी-ऑटो-हेल्थ सेक्टरमुळे या तरुणाईच्या हाती पैसा खुळखुळत आहे. साधारण १५-२० वर्षांपूर्वी बजेटमधल्या कारकडे वळलेले लोक आता थोड्या मोठ्या, प्रिमिअम कारकडे वळू लागले आहेत. यातच कंपन्यादेखील या ग्राहकांना काहीतरी नवीन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या प्रिमिअम कार आणि सुरक्षित कार देण्याच्या स्पर्धेत फारच कमी कंपन्या आहेत. आता लोकांचा कल याबरोबरच पाच सीटरवरून सात सीटरकडे वळू लागला आहे.
ग्राहकांना प्रिमिअम फिल देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे झेक प्रजासत्ताकची कंपनी स्कोडा. सध्या बाजारात सात सीटर प्रिमिअम कार फार मोजक्याच आहेत. यात स्कोडाची एसयुव्ही कोडियाक देखील आहे. स्कोडाची कोडियाक आम्ही जवळपास ४०० किमी एवढ्या मोठ्या अंतरासाठी चालवून पाहिली. आम्हाला कशी वाटली... चला पाहुया...
स्कोडाची ही प्रिमिअम फिल देणारी एसयुव्ही आहे. प्रशस्त केबिन, सात सीट, मागे एसी व्हेंट्स, सनरुफ, अडास, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आदी वैशिष्ट्यांनी युक्त ही एसयुव्ही आहे. खड्ड्यांमध्ये टायर आदळल्याचा आवाज सोडला तर केबिनमध्ये रोड नॉईस येत नाही. सायलंट केबिनमुळे प्रवासाचा थकवा जाणवत नाही. शिवाय सीटही आरामदायक आहेत. म्युझिक सिस्टिमचा आवाजही चांगला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी विंडो कर्टन आहेत. प्रवासात झोप काढायची असल्यास मान पडू नये म्हणून हेडरेस्टला सपोर्ट देण्यात आलेला आहे. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. हा झाला आरामदायी प्रवासासाठीचा अनुभव...
ही एसयुव्ही आम्हाला पावरपॅक्ड वाटली. बहुतांश अंतर आम्ही नॉर्मल मोडवरच कार चालविली. पिकअपला चांगली वाटली. सिग्नलला कार थांबली की इंधन वाचविण्यासाठी इंजिन ऑटो ऑफ होत होते, तसेच ऑटो ऑनही होत होते. इंजिन चालू करताना आतमध्ये आवाज जाणवत नव्हता. पिकअमबाबत बोलायचे झाले तर ओव्हरटेक करताना आम्हाला जास्त टॉर्क येण्यासाठी स्पोर्ट मोडमध्ये कार चालवावी लागत होती. आम्ही नागमोडी रस्ता निवडल्याने कमी अंतरात पुढील वाहनाला ओव्हरटेक करावी लागत होती. यामुळे क्विक पिकअपसाठी हे करावे लागत होते.
एक्स्प्रेस हायवेवर क्रूझ कंट्रोल वेग नियंत्रित ठेवण्यासाठी वापरला, ओव्हरेटकसाठी इथे मात्र स्पोर्ट मोड वापरावा लागत नव्हता. सनरुफ खूपच मोठा नसला तरी पुरेशा लांबी-रुंदीचा आहे. केबिनमध्ये सर्व प्रवाशांसाठी स्वतंत्र लाईटची सोय करण्यात आली आहे. केबिनमध्ये देखील पायाखाली दिसण्यासाठी लाईट देण्यात आल्या आहेत.
उलटे काय... एक गंमतीचा भाग म्हणजे या गाडीची सिस्टिम थोडी उलटी आहे. म्हणजे, वायपर आणि लाईटचे कंट्रोल भारतीय पद्धतीच्या उलटे आहेत. म्हणजे ज्या बाजुला इतर कंपन्या इंडिकेटरसाठी कंट्रोल देतात तिथे वायपरचे कंट्रोल आहे, तर त्याच्या उलट बाजुला इंडिकेटरचे कंट्रोल आहेत. शिवाय स्टिअरिंग व्हीलवरच इतर कंट्रोल आहेत.
बुटस्पेस पाच सीटरसाठी भली मोठी आहे, गरज असेल तर तुम्ही तिसऱ्या रो मधील सीट फोल्ड-अनफोल्ड करू शकता. तरीही पाच ते सात जणांचे साहित्या ठेवण्यासाठी पुरेसी जागा आहे. बुटस्पेस ओपन करण्याचा दरवाजा हाताने बंद करावा लागत नाही, एका बटनावर आपोआप बंद होतो, उघडतो.
मायलेज कोडियाकमध्ये मायलेज मोजण्यासाठी देखील वेगळी पद्धत वापरली आहे. प्रति १०० किमीसाठी किती लीटर पेट्रोल लागले ते दाखविले जाते. सामान्यपणे प्रति लीटरला किती किमी गाडी चालली ते दाखविले जाते. यामुळे कोडियाक चालविताना उलट-सुलट असलेले कंट्रोल आणि मायलेजचे गणित लक्षात घ्यावे लागणार आहे. आम्हाला हायवेला कोडियाकने 12 किमी आणि ओव्हरऑल सीटी, डोंगररांगांच्या रस्त्यावर 7.6 किमी प्रति लीटरचे (१३.३ लीटर प्रति १०० किमी) मायलेज दिले.
आम्हाला रेंज ६०० किमीची दाखवत होती, परंतू साडेचारशे-पाचशेच्या आसपास कारने रेंज दिली. २.० लीटरचे इंजिन आणि एवढी मोठी कार पाहता, तसेच आम्ही रिव्ह्यूसाठी निवडलेला रस्ता पाहता हे मायलेज ठीकठाक आहे. एक लक्षात घ्यावे लागेल की ही पेट्रोल कार होती. बहुतांश रस्ता आम्ही बाजारपेठा आणि गावाकडील एकेरी, नागमोडी चढ उताराचा होता.
रात्रीच्या वेळी प्रवास करताना डे नाईट ओआरव्हीएम, लाईटचा थ्रो एलईडी असला तरी पुढून जरी एलईडी लाईट डोळ्यावर आली तरी व्यवस्थीत दिसेल एवढा आहे. रात्रीच्यावेळी कोडियाक चालविताना सिंगल रोडवर देखील काही समस्या जाणविली नाही. पार्क करताना चारही बाजुंनी कॅमेरे असल्याने तुम्हाला योग्य प्रकारे गायडन्स मिळतो.
आम्हाला कशी वाटली... कारची इन्फोटेन्मेंट सिस्टिम चांगली आहे. कारची नेव्हिगेशन सिस्टिमवर पूर्णपणे अवलंबून न राहिलेले बरे. आम्हाला रोह्यातील गजबजलेल्या म्हणजे कार तिथून काढता येणार नाही एवढ्या गर्दीच्या रस्त्यावरून या नेव्हिगेशनने मार्ग दाखविला. खड्ड्याच्या रस्त्यांवर आरामदायक प्रवास, पिकअपदेखील चांगला, नेहमीच्या प्रवासासाठी चांगली अशी ही एसयुव्ही आहे. मोठ्या फॅमिलीसाठी पॉश दिसणारी आणि उत्तम अशी ही कार आहे. टोयोटा फॉर्च्युनर, टाटा सफारी, एमजी ग्लोस्टर सारख्या प्रमिअम एसयुव्हीसाठी ही कार चांगला पर्याय ठरू शकते.