स्कोडाची कुशक खरोखरच प्रिमिअम? आंबा घाटातला पाऊस; सस्पेंशन, मायलेजला कशी वाटली?

By हेमंत बावकर | Published: July 24, 2023 02:42 PM2023-07-24T14:42:44+5:302023-07-24T16:01:48+5:30

Skoda Kushaq Review: सिंपल, सोबर पण प्रमिअम फिल देणारी एसयुव्ही सोबत फाईव्ह स्टार सेफ्टी देखील मिळते. फॅमिलीसाठी कशी वाटली? पहा ४६० किमीचा प्रवास...

हळूहळू भारतीयांची आवड ही सेदान, हॅचबॅकवरून आता कॉम्पॅक्ट एसयुव्ही आणि एसयुव्हींकडे वळू लागली आहे. आता या श्रेणीतल्या कारची विक्री एवढी वाढलीय की कंपन्यांनाही या एसयुव्ही कारची मागणी पूर्ण करताना धापा टाकाव्या लागत आहेत. त्यातले त्यात प्रिमिअम श्रेणीकडेही आजच्या तरुण वर्गाचा ओढा वाढू लागला आहे. या श्रेणीत स्कोडाची कुशक देखील येते.

आम्ही ही कार जवळपास 460 किमी शहरातील वाहतूक, हायवे आणि घाटरस्त्यात चालविली. ही एसयुव्ही आम्हाला कशी वाटली. खड्डे, वळणांवरील बॅलन्स, मायलेज आणि फिचर्स आदी गोष्टी यावेळी विचारात घेण्यात आल्या. सिंपल, सोबर पण प्रमिअम फिल देणारी ही एसयुव्ही आहे. याचबरोबर फाईव्ह स्टार सेफ्टी देखील मिळते.

बाहेरील लुक एकदम प्रिमिअम वाटत होता. 17 इंचाचे अलॉय़ व्हील्स, स्कोडाचे सिग्नेचर ग्रील, एलईडी लाईट यामुळे ही कार चांगला लुक देते. आतूनही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे इंटेरिअर, दरवाजा उघडतानाचे फिल तुम्हाला ही कार दणकट असल्याची भावना देते.

शहरामध्ये चालविताना सिग्नलवर कार उभी राहिली की इंजिन ऑटो ऑन-ऑफ फिचर आहे, त्यामुळे इंधनात बचत होते. तसेच पुन्हा चालू होताना इंजिनला चांगली पावर मिळते. यामुळे पिकअपचे टेन्शन राहत नाही. आम्हाला मिळालेली कार ही १.५ लीटर क्षमतेचे इंजिन असलेली 6 स्पीड अॅटोमॅटीक गिअरबॉक्सची होती. यामुळे घाटातही आम्हाला चांगला पिकअप मिळाला. महत्वाचे म्हणजे पिकअप चांगला होता, कारमध्ये तीन व्यक्ती होते. शहरात, स्पीड ब्रेकरवर किंवा घाटात चढणीला कारने चांगला पिकअप दिला. तसेच गिअर शिफ्टमध्ये थोडासाही लॅग जाणवला नाही. यामुळे आत्मविश्वासाने ओव्हरटेक, घाटात किंवा टोल नाक्यावर गाडी चढणीला थांबली तरी मागे जाण्याची भिती वाटली नाही. आजकाल पेट्रोलच्या कारची हीच मोठी भीती चालकांना वाटत असते, ती या कारमध्ये वाटली नाही.

एकदम खडबडीत, गावातील अर्ध्या कच्च्या रस्त्यावर देखील आम्ही कार चालवून पाहिली. परंतू, आतमध्ये अजिबात धक्के जाणवले नाहीत. खड्ड्यात चाके आदळल्याचा आवाज यायचा परंतू, आतमध्ये त्याचे धक्के जाणवत नव्हते. काहीवेळ पाठीमागे बसूनही प्रवास केला. सीटची रचना चांगली वाटली. कुठेही थकवा किंवा बसायला त्रास होते असे जाणवले नाही. इंजिनचा आवाजही आत येत नव्हता, परंतू, थोडा रोड नॉईस आतमध्ये येत होता. केबिन इन्सुलेशन एकदम आतमध्ये शांतता देणारे होते. बाहेरच्या गाड्यांचा आवाज, गोंगाट, हॉर्नचे आवाज आदी आतमध्ये खूप कमी ऐकायला येत होते. यामुळे आरामदायी प्रवास हा या एसयुव्हीचा युएसपी वाटला.

पाठीमागच्या प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स आणि टाईप सी युएसबी चार्जिंग देण्यात आलेले आहे. तसेच पाठीमागच्या सीटवर सेंटर आर्मरेस्ट, त्यात छोटी बॉटल ठेवण्यासाठी होल्डर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. एका फॅमिली कारमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. कारच्या चारही दरवाजांमध्ये एकेक लीटरच्या पाण्याच्या बॉटल राहतील, त्याहून जास्त स्पेस देण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी केबिनमध्ये पुढे आणि रिअर सीटसाठी लाईटची सोय करण्यात आली आहे. तसेच बुटमध्ये देखील लाईट देण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सेफ्टीसाठी सहा एअरबॅग देण्यात आलेल्या आहेत. रात्रीच्यावेळी रस्त्यावर हेडलाईटची लाईट पुरेशा प्रमाणात पसरते. पावसात रेन सेंसिंग वायपर योग्यरित्या काम करतात. पाठीमागेही वायपर देण्यात आले आहेत. ते देखील चांगल्या प्रकारे धुळ, उडालेला चिखल साफ करतात.

म्युझिक सिस्टिमचा आवाज चांगला वाटला, कुठेही स्पीकरचे व्हायब्रेशन जाणवले नाही. कारमधील वापरण्यात आलेले मटेरिअल चांगल्या क्वालिटीचे आहे. ग्लोव्ह बॉक्स, वायरलेस चार्जिंग, मध्ये छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा आदी पुरेशी देण्यात आली आहे.

या कारमध्ये सनरुफही आहे. सनरुफची काच बटनावर पुढे मागे करता येते. परंतू, आतील कव्हर हे तुम्हाला हातानेच बंद करण्यासाठी ओढावे लागते. १० इंचाची टचस्क्रीन चांगला टच रिस्पॉन्स देते. ब्लूटूथवर गुगल मॅप सुरू करताना समस्या आली. युएसबीसाठी तुमच्याकडे दोन्ही बाजुला टाईप सी केबल असायला हवी.

आम्हाला या कारने मायलेजमध्ये निराश केले नाही. हायवेला जवळपास १६.३ चे व शहरात १५.१ प्रति लीटरचे मायलेज दिले. काही ठिकाणी आम्ही क्रूझ कंट्रोलही वापरले. कारमध्ये तुम्हाला वेग जाणवत नसल्याने वेगाच्या लिमिटमध्ये राहण्यासाठी याचा चांगला वापर करता आला. ८० किमीचा वेग पार झाला की तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर माहिती दिली जाते. कार टाकी रिकामी होण्याची रेंजही अचूक दाखविते.

प्रिमिअम फिल हवा असेल, इतरांपेक्षा वेगळी कार हवी असेल, फॅमिली पॅकेज देणारी कार हवी असेल तर स्कोडा कुशक हा चांगला पर्याय आहे. सस्पेन्शन चांगले आहे, यामुळे लांबच्या प्रवासाला थकायला होत नाही. पिकअप चांगला असल्याने व केबिन सायलंट असल्याने कसला त्रासही जाणवत नाही. मायलेजही खिशाला परवडणारे आहे. बुटस्पेस थोडीशी कमी वाटली. परंतू, तीन-चार जणांचे साहित्य, बॅगा आरामात मावू शकतात. कारमध्ये इतर स्टोरेज स्पेस चांगली देण्यात आली आहे. एकंदरीत एकाच कारमध्ये तुम्हाला चांगले पॅकेज देण्याचा प्रयत्न स्कोडाने केलेला आहे. शिवाय सुरक्षिततेचे फाईव्ह स्टार रेटिंगही आहे. लहान मुलांसाठी आयसोफिक्स देखील आहे.

ग्राऊंड क्लिअरन्सचा कुठेही अडथळा आला नाही. पावसाळी निसरड्या रस्त्यावरही कारची वळणावर, ब्रेकिंगला ग्रिप चांगली वाटली. स्टिअरिंगवर म्युझिक, क्रूझ कंट्रोलची बटने देण्यात आली आहेत. डॅशबोर्डच्या मधोमध आरामात अॅक्सेस मिळणारी एसी कंट्रोल, टच स्क्रीन कंट्रोल आहे.

तुम्हाला टर्न इंडिकेटर, हेडलाईट कंट्रोल आणि वायपरचे कंट्रोल भारतीय पद्धतीचे नाहीएत. स्टेअरिंगच्या दोन्ही बाजुला सामान्य कारमध्ये जसे असतात त्याच्या उलट देण्यात आलेले आहेत. यामुळे सुरुवातीला तुम्हाला समस्या येऊ शकते. परंतू सवय झाली की काही वाटत नाही. शिवाय पुश स्टार्ट बटन डॅशबोर्डवर नाहीय, तर ते स्टिअरिंगच्या खाली जिथे आपण चावी लावायचो तिथे देण्यात आलेले आहे. तुम्हाला टाईप सी केबलच वापरावी लागणार आहे.

टॅग्स :स्कोडाSkoda