Strom Motors R3: आली रे आली! साडे ४ लाख रुपयांची ईलेक्ट्रीक कार आली; महाराष्ट्रातील या शहरांत प्री बुकिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 07:01 PM2022-02-14T19:01:11+5:302022-02-14T19:09:26+5:30

World Cheapest Electric Car Strom Motors R3, Price, Range specification: अनेकांची इच्छा असूनही ते या इलेक्ट्रीक कार घेऊ शकत नाहीत, एवढ्या महाग आहेत. अशावेळी एक कार अशी आहे जी अवघ्या साडेचार लाखात येत आहे.

देशात सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच इलेक्ट्रीक कार आहेत. अनेकांची इच्छा असूनही ते या कार घेऊ शकत नाहीत, एवढ्या महाग आहेत. आणखी काही कंपन्यांच्या ईव्ही कार येत आहेत. परंतू त्या देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. अशावेळी एक कार अशी आहे जी अवघ्या साडेचार लाखात येत आहे.

या कारसाठी बुकिंग सुरु झाले असून सध्या ही कार देशातील दोन मोठ्या शहरांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई उपनगरांसाठी ही कार उपलब्ध होणार आहे. यानंतर हळूहळू पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये ही कार विक्रीस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या स्टार्टअप कंपनीने ही कार आणली असून ती जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एव्हाना फोटो पाहुन तुम्हाला कल्पना आलीच असेल, ही तीच कार आहे जिने सोशल मिडीयावर काही महिन्यांपासून धूमधडाका उडविला आहे.

ही शानदार इलेक्ट्रीक कार बनविणाऱ्या कंपनीचे नाव Strom Motors आहे. याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. या कंपनीने Strom R3 या नावाने ही कार आणली आहे. साडे चार लाख एक्स शोरुम किंमत आणि दहा हजारांत बुकिंग करता येणार आहे.

ही कार तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने प्री बुकिंग सुरु केले आहे. ही कार सध्या देशभरात उपलब्ध नसली तीरी दिल्ली एनसीआर आणि मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये मिळणार आहे.

या ईव्हीला तीन चाके आहेत. म्हणायला कार पण ही तिचाकीच आहे. पुढे दोन आणि मागे एक चाक आहे. मात्र, थ्री व्हिलरपेक्षा लूक एकदम उलटा आहे. जर तुमचे रोजचे रनिंग १०० ते १५० किमी आहे तर तुम्हाला ही कार एकदम फिट आहे.

कंपनीने या कारची रेंज २०० किमी असल्याचा दावा केला आहे. परंतू जर रस्त्यावरील रेंजचा विचार केला तर ती १०० ते १२० किमी आरामात जाऊ शकते. कमी वेगात चालविल्यास ही कार १५० ते १६० किमी पार करू शकते.

या कारमध्ये दोन दरवाजे आणि दोन सीट आहेत. सोबतच मोठा सनरुफ आहे. मागे साहित्य ठेवण्यासाठी चांगली जागा आहे. कंपनीने या कारवर १ लाख किमी किंवा तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे. तसेच ही कार तीन तासांत फुल चार्ज होते.

Strom R3 मध्ये ४जी कनेक्टेड डायग्नोस्टिक इंजिन आहे. चालकाला लोकेशन ट्रॅक आणि चार्ज स्टेटसची माहिती मिळते. या कारचा वेग ८० किमी प्रति तास आहे. कार चालविण्यासाठी केवळ ४० पैसे प्रति किमी खर्च येतो. तसेच मेन्टनन्सही अन्य कारपेक्षा ८० टक्के कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.