Tata Motors Cars Price : टाटाच्या कार पुन्हा महागल्या, पाहा टियागो-पंचच्या नवीन किमती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:57 PM2023-05-03T13:57:01+5:302023-05-03T14:08:50+5:30

Tata Motors Cars Price : इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सने मे 2023 पासून आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. वर्षभरात कंपनीने वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे. कंपनीने पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. तर इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत.

टाटाच्या कारच्या किमती 5,000 ते 15,000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. किमतीतील ही वाढ मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन बीएस 6 नियमांमुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे, ज्यामुळे किमतींवर परिणाम झाला आहे. जाणून घ्या Tiago, Tigor, Altroz, Punch, Nexon च्या नवीन किमती.

टाटा टियागोची किंमत सहा हजार रुपयांनी वाढली आहे. कारची सुरुवातीची किंमत आता 5.60 लाखांवर गेली आहे. दरम्यान, कारचे XTO व्हेरिएंट अद्याप 6 लाखांमध्ये मिळत आहे. तर याची किंमत 8.01 रुपयांपर्यंत जाते. या दरवाढीचा परिणाम सीएनजी व्हेरिएंटवरही झाला आहे.

टिगोरची किंमत 10,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. कारची सुरुवातीची किंमत 6.20 लाख होती, जी आता 6.30 लाख झाली आहे. दरम्यान, कारच्या XZ + LP व्हेरिएंटची किंमत वाढलेली नाही.

टाटा अल्ट्रोझच्या विविध व्हेरिएंटच्या किंमतींमध्ये 5,000 ते 15,000 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. कारची सुरुवातीची किंमत आता 6.60 लाख रुपये झाली आहे, जी आधी 6.45 लाख रुपये होती. चांगली गोष्ट म्हणजे कारच्या XZA+ व्हेरिएंटची किंमत एक रुपयानेही वाढलेली नाही.

टाटा पंचच्या प्युअर आणि प्युअर+रिदम पॅक व्हेरिएंटच्या किमती वाढलेल्या नाहीत. म्हणजेच कारचीची सुरुवातीची किंमत अजूनही फक्त 6 लाख रुपये आहे. याशिवाय मायक्रो एसयूव्हीचे सर्व व्हेरिएंट्स 5,000 रुपयांनी महागले आहेत.

टाटा नेक्सॉनच्या किमती 5,000 ते 15,000 पर्यंत वाढल्या आहेत. मात्र, कारचे बेस मॉडेल आणि टॉप-एंड वाल्या अखेरच्या दोन व्हेरिएंट्सच्या किंमतीत बदल झालेला नाही. याशिवाय, नेक्सॉनचे इतर सर्व मॉडेल्स महाग झाले आहेत.

दरम्यान, वर नमूद केलेल्या टाटा कारच्या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.