TATA ने बाजी पलटली! १० वर्षांत प्रथमच मारुती सुझुकीला धोबीपछाड; केली जास्त कमाई, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:05 PM2021-11-08T17:05:06+5:302021-11-08T17:10:03+5:30

TATA ने गेल्या १० वर्षांत प्रथमच नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठ्या कार निर्माता मारुती सुझुकीला मागे टाकले. जाणून घ्या...

TATA ने अनेकविध क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. TATA ग्रुपच्या विविध कंपन्या दमदार कामगिरी करत असून, ग्राहकांचाही विश्वास वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

यातच देशातली आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors आपल्या शानदार वाहनांच्या माध्यमातून बाजारातली आपली पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. तसेच टाटा मोटर्स आता सर्वात सुरक्षित वाहनांसाठी ओळखली जाते.

एका अहवालानुसार, Tata Motors देशातील सर्वात मोठी आणि मार्केट लीडर मारुती सुझुकीपेक्षाही (Maruti Suzuki) प्रति कार जास्त नफा कमवतेय. १० वर्षात पहिल्यांदाच टाटा मोटर्सने प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनीला मागे टाकले आहे.

Tata Motors ने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत प्रति कार ४५,८१० रुपये नफा कमावला आहे. याच कालावधीतील मारुती सुझुकीच्या नफ्याच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे. १० वर्षात पहिल्यांदाच टाटा मोटर्सने प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनीला मागे टाकले.

Tata Motors च्या प्रवासी वाहन विभागाचे मार्जिन FY22 च्या दुसऱ्या तिमाहीत ५.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी मारुतीसाठी हे मार्जिन ४.२ टक्क्यांवर घसरले. टाटा मोटर्स अशी सर्व मॉडल्स विकत आहे, जी २०१६ नंतर लाँच झाली आहेत.

Tata Motors कंपनीने आपल्या सर्व जुन्या गाड्या बंद केल्या आहेत. टाटाच्या परिवर्तनाला २०१६ मध्ये टियागो लाँच झाल्यापासून सुरूवात झाली. सन २०१६ ते २०२१ पर्यंत, टाटाने शानदार कार लाँच केल्यात, त्यापैकी काही त्यांच्या सेगमेंटमधील बेस्ट सेलर आहेत. तसेच, TATA हा एकमेव भारतीय ब्रँड आहे ज्याकडे देशात नेक्सॉन, अल्ट्रोझ आणि पंच या तीन ५ स्टार रेटेड कार आहेत.

Tata Motors ने नुकतीच आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही टाटा पंच लाँच केली आणि या छोट्या एसयूव्हीने येताच भारताच्या बाजारात धमाल केलीय. पहिल्या महिन्यामध्येच तिने देशातली टॉप १० वाहनांच्या यादीत स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये ती १० व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

पहिल्या महिन्यातच ८,४५३ टाटा पंच कार कंपनीने विकल्या. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत ५.४९ लाख रुपये ठेवली आहे, तर टॉप व्हेरिअंटची किंमत ९.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Tata Motors इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही लीडर म्हणून समोर येत आहे. कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Tata Nexon EV भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही एसयूव्ही ३१२ किमीपर्यंतची जबरदस्त ड्रायव्हिंग रेजे देते. अलीकडेच कंपनीने Tigor EVs सुद्धा लाँच केलीये.

आगामी काळात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांचा विभाग वाढवण्यावर कंपनीचा 'फोकस' राहणार असून नुकतीच १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याद्वारे येत्या ४ ते ५ वर्षामध्ये टाटा अजून १० नवीन इलेक्ट्रिक वाहने भारताच्या बाजारात उतरवेल, असे सांगितले जात आहे.