मस्तच! टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला By देवेश फडके | Published: January 17, 2021 04:50 PM 2021-01-17T16:50:04+5:30 2021-01-17T16:56:09+5:30
प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना देशभरातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सन २०२० मध्ये कोणती इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली गेली, त्याचा घेतलेला हा आढावा... नवी दिल्ली : प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना देशभरातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वाहन निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहेत. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे सन २०२० मध्ये वाहनांची विक्री कमी झाली असली, तरी आता सन २०२१ मध्ये वाहन विक्रीला वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सन २०२१ इलेक्ट्रिक वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, असे सांगितले जात आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सरकारकडून प्रोत्साहन म्हणून अनेक गोष्टीत सूट देण्यात येत आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या 'ऑटो एक्स्पो'त बहुतांश कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या होत्या. तर, काही कंपन्यांनी आपल्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार सादर केल्या. यानंतर भारतीय बाजारपेठेत काही इलेक्ट्रिक कार विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या. मात्र, सन २०२० मध्ये कोणती इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली गेली, त्याचा घेतलेला हा आढावा...
सन २०२० मध्ये इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा कंपनीचा दबदबा राहिला. टाटाच्या सर्वांत सुरक्षित SUV मानल्या गेलेल्या नेक्सॉन इलेक्ट्रिक कारने बाजी मारत या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जानेवारी २०२० मध्ये नेक्सॉन EV ही इलेक्ट्रिक कार बाजारात सादर करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ५२९ नेक्सॉन EV ची विक्री झाली.
Tata Nexon EV चा सन २०२० मध्ये एकूण बाजारातील हिस्सा ६३.२ टक्के राहिला आहे. टाटा नेक्सॉन इव्ही एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत १३.९९ लाख ते १६.२५ लाख आहे. ही इलेक्ट्रिक कार तीन व्हेरियंट्समध्ये भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. भारतातील सर्वांत सुरक्षित कार म्हणूनही गौरवण्यात आले आहे.
एकदा चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन ३१२ कि.मी.चे अंतर पार करू शकते. टाटा नेक्सॉनची बॅटरी ०-८० टक्के चार्ज व्हायला केवळ ६० मिनिटांचा वेळ घेते. तसेच ८ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि वॉटरप्रुफ बॅटरी या इलेक्ट्रिक कारमध्ये उपलब्ध करून दिली जाते.
इलेक्ट्रिक कारच्या सेंगमेंटमध्ये दुसऱ्या स्थानावर MG ZS EV कार आहे. एमजी मोर्टर्सने भारतीय बाजारपेठेत पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच मोठा ग्राहकवर्ग निर्माण करण्यात यश मिळवले आहे. एमजी मोटर्सने जानेवारी २०२० मध्ये MG ZS EV ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. सन २०२० मध्ये एकूण १ हजार १४२ MG ZS EV ची विक्री करण्यात आली. या इलेक्ट्रिक कारची किंमत २०.८८ लाख ते २३.५८ लाखांच्या दरम्यान आहे.
MG ZS EV इलेक्ट्रिक कार दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ३४० कि.मी.चे अंतर ही इलेक्ट्रिक कार पार करू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 50kW चार्जरचा वापर केल्यास पूर्ण चार्ज होण्यासाठी या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीला ५० मिनिटांचा कालावधी लागतो, असे सांगितले जाते.
इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हुंदाई कोना आहे. सन २०२० मध्ये Hyundai Kona चे २२३ युनिट विकले गेले. या कारची दिल्लीतील एक्स शोरूमची किंमत २३.७५ लाख ते २३.९४ लाखाच्या दरम्यान आहे.
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा टाटाची इलेक्ट्रिक कार Tigor आहे. इलेक्ट्रिक Tigor चे एकूण १०० युनिट्सची गेल्या वर्षभरात विक्री झाली. Tata Tigor EV ची किंमत ९.५८ ते ९.९० लाख रुपये आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने Mahindra e-Verito बाजारात उपलब्ध केली होती. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ ९ Mahindra e-Verito विकल्या गेल्या.