देशात TATA च्या Electric SUV नं केली कमाल, विक्री वाढली; सिंगल चार्जमध्ये जाते ३१२ किलोमीटर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:12 PM2021-07-01T17:12:37+5:302021-07-01T17:20:34+5:30

Tata Electric SUV : कंपनीच्या कार्सच्या विक्रीत १११ टक्क्यांची वाढ. गेल्या काही काळापासून भारतीय बाजारात वाढत आहे इलेक्ट्रीक कार्सची मागणी.

भारतात गेल्या काही काळात इलेक्ट्रीक कार्सच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. यादरम्यान अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहनं भारतीय बाजारपेठेत आणली आहेत.

परंतु इलेक्ट्रीक पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या Nexon EV या कारवर लोकांचा अधिक भरवसा असल्याचं दिसून येत आहे.

टाटा मोटर्सनं गेल्या जून महिन्यातील आपल्या वाहनांच्या विक्रीचा रिपोर्ट सादर केला आहे. यानुसार Nexon EV ही देशातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रीक कार बनली आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात कंपनीनं एकूण २४,११० प्रवासी वाहनांची विक्री केली.

यादरम्यान कंपनीच्या Nexon EV च्या तब्बल ६५० युनिट्सची विक्री झाली आहे. तसंच आतापर्यंत कंपनीनं या कारच्या ४,५०० पेक्षा अधिक युनिट्सची विक्री केली आहे.

२०२० च्या जून महिन्यात ११,४१९ युनिट्सच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात वाहनांची विक्री १११ टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

टाटा मोटर्सद्वारे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या नव्या मॉडेल्सच्या विक्रीला वेग देण्यात आला आहे. यामध्ये टाटा सफारी पासून टाटा हॅरिअर, नेक्सॉन, टिअॅगो, अल्ट्रॉज आणि टिगोरसारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.

नवी मॉडेल्स केवळ अत्याधुनिक डिझाईनसोबत येत नाहीत तर कंपनीनं यात अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि नव्या तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. त्यामुळे या कार्स मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

इलेक्ट्रीक एसयूव्हीबाबत सांगायचं झालं तर नुकतंच Tata Nexon EV ला कंपनीनं अपडेट केलं आहे.

तसंच यामध्ये नवे फीचर्सही जोडण्यात आले आहे. यामध्ये आता बटनलेस आणि डायललेस इन्फोटेन्मेंट सिस्टम मिळतं.

यात सात इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली असून टाटाच्या कनेक्ट नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टमचा यात वापर करण्यात आला आहे.

या इलेक्ट्रीक एसयूव्हीची किंमत १३.९९ लाखांपासून १६.५६ लाख (एक्स शोरूम) इतकी आहे.

कंपनीनं या एसयूव्हीमध्ये दमदार बॅटरीसह काही आकर्षक फीचर्सही दिले आहे. यामध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल, ऑटो हायलाईट्स. इलेक्ट्रीक सनरूफ, पार्क असिस्ट, ऑटो रेन सेन्सिंग व्हायपर्स, इलेक्ट्रीक टेलगेट यांचा समावेश आहे.

यामध्ये कंपनीनं ३०.२ kWh क्षमतेच्या लिथियम आयन लिक्विड कुल्ड बॅटरीचा वापर केला आहे. एका चार्जमध्ये कंपनी ३१२ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते असा दावा कंपनीनं केला आहे.

यामध्ये देण्यात आलेली मोटर १२७ bhp ची दमदार पॉवर आणि २४५ Nm चा टॉर्क जनरेट करते.