TATA चा जबरदस्त Punch! येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक एसयुव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 09:07 AM2022-12-24T09:07:36+5:302022-12-24T09:16:43+5:30

पाहा काय असेल खास आणि किती असू शकते किंमत

TATA Electric SUV : टाटा मोटर्स इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या प्रसिद्ध मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे नवे इलेक्ट्रीक व्हर्जन लाँच करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अलीकडेच कंपनीने आपली नवीन Tiago EV बाजारात आणली आहे. Tigor EV, Tiago EV, Nexon EV Prime आणि Nexon EV Max आधीच टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रीक पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध आहेत. आता कंपनीने सादर केलेले हे पाचवे इलेक्ट्रीक वाहन असेल. बाजारात आल्यानंतर ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.

टाटा मोटर्सने 18 ऑक्टोबर 2021 रोजी देशांतर्गत बाजारात टाटा पंच लाँच केली होती. ही मायक्रो एसयूव्ही बाजारात आल्यापासून खूप प्रसिद्ध झाली आहे आणि ती कार ग्राहकांच्या पसंतीसही पडत आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीनं आपले एक लाखावं युनिटही रोलआऊट केले होते. अवघ्या 10 महिन्यांत हा टप्पा गाठणारी ही पहिली SUV ठरली आहे.

असे सांगितले जात आहे की नवीन टाटा पंच इलेक्ट्रीक कंपनीच्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यावर कंपनीची प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजदेखील तयार केली गेली आहे. या SUV मध्ये देखील Tigor आणि Tiago च्या धर्तीवर कंपनी Ziptron तंत्रज्ञान वापरेल अशी अपेक्षा आहे. असेही वृत्त आहे की कंपनी निरनिराळ्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ही कार आणू शकते. ज्यापैकी एक मीडियम रेंज देईल आणि दुसरी हायर रेंज देईल.

जिथे डिझाइनचा संबंध आहे, त्या ठिकाणी त्यात कोणतेही मोठे बदल पाहायला मिळणार नाहीत. याचे एक्सटिरिअर सध्याच्या कारप्रमाणेच असेल. इलेक्ट्रिक कार म्हणून त्यात निश्चितपणे काही कॉस्मेटिक बदल दिसून येतील. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या Nexon EV आणि Tiago EV च्या दरम्यानची ही कार असू शकते. तसंच पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत काही अतिरिक्त फीचर्ससह येऊ शकते.

कंपनीने या इलेक्ट्रीक कारच्या बॅटरी पॅक इत्यादींबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नसली तरी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की कंपनी यामध्ये 24kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देऊ शकते. यानुसार ही कार सुमारे 250 ते 300 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. यासोबतच फास्ट चार्जिंगचा पर्यायही दिला जाण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतही परवडणारी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Tata Tiago इलेक्ट्रीकची प्रारंभिक किंमत 8.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. अशा परिस्थितीत, नवीन पंच इलेक्ट्रीक एसयूव्ही 10 लाख रुपयांदरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.