Tata Tiago EV Booking: टाटाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारचं आजपासून बुकिंग, केवळ २१ हजारांत करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:29 AM2022-10-10T10:29:59+5:302022-10-10T10:39:49+5:30

Tata Tiago EV Booking: इलेक्ट्रीक सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कारचं आजपासून बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या कारला ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे.

Tata Tiago EV Booking: टाटा मोटर्सची (Tata Motors) सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार टियागो इलेक्ट्रींची (Tiago Electric) बुकिंग आजपासून सुरू झालं आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक हॅचबॅक कारबद्दल अनेक जबरदस्त दावे केले आहेत.

भारतातील इलेक्ट्रीक वाहनांची वाढती मागणी पाहता, कंपनी बाजारात आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्हीला बाजारात आधीच मोठी मागणी आहे. आता कंपनीने इलेक्ट्रीक हॅचबॅक सेगमेंटमध्येही प्रवेश केला आहे.

ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिप किंवा वेबसाइटवर 21,000 रुपयांची टोकन अमाऊंट जमा करून Tiago Electric बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. Tiago EV डिसेंबरपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध होईल. टियागो इलेक्ट्रीक झिपट्रॉन तंत्रज्ञानावर आधारित आहे.

Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असेल. इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त असल्याने, या कारला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळू शकतो अशी अपेक्षा करण्यात येत आहे. टियागो इलेक्ट्रीकचं केबिन टियागोच्या आयसीई एडिशनप्रमाणेच आहे. यात लेदर फिनिशिंग स्टिअरिंग व्हील आणि सीट्स मिळतील. ड्राइव्ह मोड निवडण्यासाठी गीअर लीव्हर रोटरी डायलने बदलले गेले आहे आणि एक स्पोर्ट्स मोडदेखील देण्यात आले आहे.

ग्राहकांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन कंपनीने दोन बॅटरी पॅकसह Tiago EV लाँच केली आहे. Tiago EV मध्ये IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि 24kWh बॅटरी पॅक यासह अनेक चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की Tiago EV मध्ये 24kWh बॅटरी पॅकसह 315 किमीची रेंज असेल.

टाटा मोटर्सने 19.2kWh च्या बॅटरी पॅकसहदेखील Tiago EV सादर केली आहे. या बॅटरी पॅकसह कारची रेंज 250 किमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मोटर आणि बॅटरी 8 वर्षे किंवा 1,60,000 किलोमीटरच्या वॉरंटीसह येतील अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि इनसाईट्सच्या आधारे 24kWh बॅटरी पॅक व्हेरियंटला उत्पादन आघाडीवर प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही बॅटरी पॅक फास्ट चार्जिंग करण्यास सक्षम आहेत. कारची बॅटरी DC फास्ट चार्जर वापरून सुमारे 57 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. या कारमध्ये हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, टीपीएमएस, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-मोड रीजन फीचर देण्यात येत आहे.

Tata Tiago ही ईव्ही सेगमेंटमधील भारतातील पहिली हॅचबॅक प्रीमियम इलेक्ट्रीक कार बनली आहे. Tiago EV मध्ये चार चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये 15A सॉकेट, 3.2 kW AC चार्जर, 7.2 kW AC चार्जर आणि DC फास्ट चार्जर पर्यायांचा समावेश आहे.

टाटाने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV 7 व्हेरिअंट्समध्ये लाँच केली आहे. हे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग पर्यायांसह येईल. वेळ, तारखेसोबतच व्हेरिअंट आणि त्याचा रंग यावर कारच्या डिलिव्हरीची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.