Tata Tiago EV Review: टाटा टियागो ईव्ही, पुण्याच्या या दिशेला, त्या दिशेला ५०० किमीचा प्रवास; परवडते का? चार्जिंगची समस्या... By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 12:17 PM 2023-09-01T12:17:14+5:30 2023-09-01T12:33:38+5:30
Tata Tiago EV Review in Marathi: सध्या स्वस्त ईव्ही कारपैकी एक असलेली टियागो ईव्ही ही कार आम्ही पुण्याच्या दोन्ही बाजुंना, म्हणजेच सातारा ग्रामीण भाग ते पलिकडे कर्जतचा ग्रामीण भाग अशा ठिकाणी जवळपास ५०० किमी चालवून पाहिली. किती प्रॅक्टीकल वाटली... आज इलेक्ट्रीक कार घेणे खरेच परवडणारे आहे का? पुरेशी चार्जिंग स्टेशन आहेत का? वेळ किती लागतो? प्रती किमीला किती खर्च येतो? वाटेतच चार्जिंग संपले तर... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही टाटा टियागो ईव्हीद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला. सध्या स्वस्त ईव्ही कारपैकी एक असलेली टियागो ईव्ही ही कार आम्ही पुण्याच्या दोन्ही बाजुंना, म्हणजेच सातारा ग्रामीण भाग ते पलिकडे कर्जतचा ग्रामीण भाग अशा ठिकाणी जवळपास ५०० किमी चालवून पाहिली.
सुरुवातीला आपण चार्जिंगचे पाहू, आमच्याकडे जी टाटा ईव्ही होती तिला घरी चार्ज करण्यासाठी १५-१६ amp चे सॉकेट लागते जे फ्रिज, गिझरला वापरले जाते. कारचा चार्जर कमी लांबीचा असल्याने तुम्हाला थोडासा जुगाड करावा लागणार आहे. घरी चार्ज करण्यासाठी आम्हाला ३३ टक्के ते १०० टक्के चार्ड होण्यासाठी साधारण साडे आठ तास लागले. म्हणजे ० ते १०० टक्के चार्ज करण्यासाठी दहा ते १२ तास लागण्याची शक्यता आहे.
६५-७० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे २० युनिट वीज खर्च झाली. घरचा वीज दर आणि चार्जिंग पॉईंटच्या वीजदरात मोठी (जवळपास अडीज पट) तफावत आहे. यामुळे आम्ही घरीच कार चार्ज करणे पसंत केले. फास्ट चार्जिंग पॉईंटवर तुम्हाला फुल चार्ज करण्यासाठी तासभर वेळ पुरेसा आहे. सध्या कार कमी असल्याने आणि बहुतांश लोक घरीच चार्ज करत असल्याने कॉमन चार्जिंग पॉईंटवर काही काळ वाट पाहून किंवा गेल्या गेल्याच चार्जिंग करता येऊ शकते. हा एक तात्पुरता निगेटीव्ह पॉईंट सोडला तर आम्हाला ही कार खिशाला परवडणारी वाटली.
आम्ही या काळात टियागो ईव्ही तीनवेळा चार्ज केली. या ५०० किमीच्या अंतरात आम्ही पुणे-फलटण व्हाया शिरवळ (पुणे-सातारा हायवे) परत रिटर्न आणि त्यानंतर शहरातील ट्रॅफिक व मुंबईकडे कर्जतपर्यंत प्रवास केला. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कंडीशन असल्याने चांगल्याप्रकारे कार टेस्ट करता आली. ही कार चालविताना आम्ही तिला ईलेक्ट्रीक कार आहे, जास्त रेंजसाठी हळू चालवावी असे ट्रिट केले नाही. आम्ही पेट्रोल, डिझेलसारखीच कार चालवून पाहिली.
खड्ड्यांमध्ये कारचे सस्पेंशन, ब्रेकिंग एकदम चांगले आहे. वळणावरील बॅलन्सही चांगला आहे. आतमध्ये मोटरचा आवाज येत नाही, परंतू रिजनेरेशनवेळी थोडासा कू असा आवाज येतो. रिजनरेशन १ ते तीन असे मोड आहेत. तीनवर ठेवले तर कार कमी अंतरात वेग कमी करते आणि जास्त चार्ज करते. हे तुम्हाला शहरात उपयोगी ठरू शकते. इतर ठिकाणी १ किंवा दोन रिजेन मोड उपयुक्त आहेत. हारमनची साऊंड सिस्टिममुळे गाण्यांचा आनंद चांगल्याप्रकारे घेता येतो. आम्हाला अॅपचा अनुभव घेता आला नाही.
रात्रीच्या वेळी कारची हेडलाईटचा थ्रो चांगला आहे. टाटाचा एक प्लस पॉईंटम्हणजे हॅलोजनच्या रंगाची म्हणजेच एलईडी सारख्या पांढऱ्या नाही तर पिवळसर रंगाची हेडलाईट दिली जाते. जी पावसाळा, धुके आदी विविध वातावरणात तुम्हाला रस्त्यावर चांगली दृष्यमानता देते. अनेकदा एलईडीच्या लाईटमुळे धुक्यात किंवा रस्त्यावर पाणी साचलेले असेल, पाऊस पडत असेल तर व्हिजन दिसत नाही. याबाबत टाटाला प्लस पॉईंट द्यायलाच हवा.
टियागोमधील सीट या आरामदायी आहेत. परंतू, मागच्या सीटवर तुम्हाला दोन मोठे व्यक्ती बसू शकतील एवढीच जागा आहे. म्हणजे ही छोट्या फॅमिलीसाठी किंवा रोजच्या वापरासाठीची कार आहे. आकाराला छोटी असल्याने ही कार शहरात किंवा इंटरसिटी प्रवासासाठी एकदम उपयुक्त आहे. एसी देखील केबिन चांगल्याप्रकारे कुल करत होता. सध्या पावसाळा आहे परंतू पाऊस नाहीय, यामुळे आम्ही २१-२२ वर एसी ठेवून कार चालवत होतो. त्याचाही थोडाफार रेंजवर परिणाम झाला.
पिकअप... या कारमध्ये ड्रायव्हिंग आणि स्पोर्ट असे दोन मोड आहेत. बहुतांश अंतर आम्ही डी मोडमध्येच चालविली. आम्हाला शहरात किंवा हायवेवरील ८०-१०० किमीचा स्पीड मेंटेन करण्यासाठी कोणतीही समस्या जाणविली नाही. महत्वाचे म्हणजे या छोट्या कारमध्ये क्रूझ कंट्रोल आहे, त्याचाही वापर आम्ही एक्स्प्रेस हायवेवर केला. गावातील छोट्या रस्त्यांवर चटकन ओव्हरटेक करण्यासाठी मात्र आम्हाला स्पोर्ट मोड वापरावा लागत होता. स्पोर्ट मोडवर कार झटकन वेग पकडत होती.
घाटात कशी वाटली... घाटामध्ये कारचा ड्रायव्हिंग मोड काहीशी धडपड करत होता. लेन चेंज करताना, ट्रकना मागे टाकताना डी मोडवर कार मरगळलेली वाटत होती. यामुळे खंडाळा, लोणावळा जुना हायवे घाटात आम्हाला स्पोर्ट मोडच वापरावा लागला. यामुळे त्याचा परिणाम रेंजवरही दिसला.
रेंज किती मिळाली... चार्जिंग इन्फ्राच्या कमतरतेमुळे आम्ही ० ते १०० टक्के बॅटरी वापरण्याची रिस्क घेतली नाही. १०० टक्के ते ३३ टक्के एवढ्या बॅटरीमध्ये पेट्रोल डिझेलसारख्याच पॅटर्नने आम्ही 130 किमी कार चालविली. तरीही कार आम्हाला ३३ टक्के बॅटरी उरलेली असताना ६४ किमीची रेंज दाखवत होती. म्हणजेच रिजेन, जास्त रेंजसाठी धडपड न करताही ही कार आरामात १८०-१९० किमीची रेंज देते. म्हणजे १ रुपयांपेक्षा कमी खर्चात १ किमीचा प्रवास करता आला. जो पेट्रोल, डिझेलपेक्षा कैकपटीने कमी आहे.
चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची पोलखोल... दुसरी गोष्ट म्हणजे साताऱ्याकडे जाताना आम्ही चार्जिंग पॉईंटचीही तपासणी केली. बॅटरी चार्ज होती, तरीही एक चाचपणी म्हणून जिओ बीपीच्या पेट्रोल पंपावरील चार्जिंग स्टेशनवर गेलो. ग्रामीण भागात आठवड्याच्या एखाद्या वारी लाईट नसते. तिथे गुरुवारी लाईट जाते, यामुळे पंप जनरेटरवर चालू होता. यामुळे तिथले चार्जिंग स्टेशन बंद होते. इतर वेळेला चालू असते असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पुढे आम्ही शिरवळच्या चार्जिंग स्टेशनवर गेलो. विशेष म्हणजे ही दोन्ही चार्जिंग स्टेशन टाटाच्या अॅपवर लिस्टेड नव्हती. दुसऱ्या स्टेशनवर आधीच दोन टियागो ईव्ही चार्ज होत होत्या. तिथे जवळपास अर्धा तास वेटिंग करावे लागले. या काळात त्या कार चालकांशी गप्पा झाल्या. त्यांनी कंपनीच्या कामानिमित्त आपण नेहमी सांगली-औरंगाबाद-पुणे-सांगली असा प्रवास करत असल्याचे सांगितले. तसेच सासवड मार्गे साताऱ्याला जात असताना जेजुरी येथील चार्जिंग स्टेशन बंद असल्याने शिरवळला आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सर्व चार्जिंग स्टेशन लिस्टेड असलेले अॅप सांगितले. हे अॅप PlugShare आहे. टाटाचे टाटा पॉवरही आहे. ग्रामीण भागात जाताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
घाटातून प्रवास करताना.... जर तुम्ही घाटातून प्रवास करत असाल तर तुम्हाला घाट चढताना जेवढी बॅटरी खपते त्यापेक्षा कित्येक पटीने कमी बॅटरी घाट उतरताना लागते. उलट आम्ही म्हणू की घाट उतरताना बॅटरी रिजेन मोडमुळे चार्ज होते व जास्त रेंज मिळते. आम्हाला पुण्यातून कर्जतला आतल्या भागात जाण्यासाठी (११० किमी) जवळपास ५५ टक्के बॅटरी लागली. हायवेवर तुम्हाला रिजेनवर बॅटरी चार्ज करणे शक्य नाही. यामुळे शहरात आणि हायवेवर वेगवेगळ्या रेंज मिळतात. यामुळे घाट उतरताना आणि चढताना या गोष्टी लक्षात ठेवून प्रवासाचा प्लॅन करावा लागणार आहे.
अंतिम मत... तुम्ही डेली ट्रॅव्हलर असाल, शहरातल्या शहरात कार चालवत असाल किंवा १००-दीडशेच्या रेंजमधील जसे की मुंबई-पुणे, पुणे-सातारा, सातारा-कोल्हापूर अशा अंतराच्या शहरात प्रवास करणारे असाल तर तुमच्यासाठी ही कार एकदम ओके आहे. छोट्या फॅमिलीसाठी देखील ही कार योग्य आहे. तुम्ही जिथे जाणार आहात, तिथे चार्जिंगची सोय असल्यास एकदम उत्तम.
सध्या शहरांबाहेर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने तुम्हाला लांबची ट्रिप प्लॅन करूनच करावी लागणार आहे. एकदा सरावला की तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त चांगली रेंज मिळेल हे नक्की. पेट्रोल, डिझेलवरील कारच्या किंमतीत तुम्हाला ही कार मिळते, यामुळे तुम्ही रनिंगमध्ये इंधनावरील होणारा खर्च वाचवू शकता. हा देखील एक प्लस पॉईंट आहे. शिवाय तुम्हाला फोर स्टार सेफ्टी रेटिंग असलेली कार देखील मिळते.