Tata Tigor AMT icng Review in Marathi: सीएनजी कार ती पण AMT, कसे शक्य आहे? पिकअप घेते का? किती मायलेज देते... वाचा रिव्ह्यू...

By हेमंत बावकर | Published: June 6, 2024 03:38 PM2024-06-06T15:38:17+5:302024-06-06T15:49:43+5:30

Tata Tigor AMT icng Review in Marathi: आजवर कंपन्या मॅन्युअल गिअरबॉ़क्सच्या सीएनजी कार विकत होत्या. अनेकांना सीएनजीपण आणि ऑटोमॅटीक कार हवी होती, पण पर्याय मिळत नव्हता...

शहरातच नाही तर आता ग्रामीण भागातही सीएनजी कार वापरायला सुरुवात झाली आहे. काहीशी रांग पेट्रोल पंपावर लावावी लागते परंतु बराच पैसा यामुळे वाचत आहे. आजवर कंपन्या मॅन्युअल गिअरबॉ़क्सच्या सीएनजी कार विकत होत्या. यामध्ये मारुती आघाडीवर होती. परंतु, टाटाने त्याच्या एक पाऊल पुढे टाकत ऑटोमॅटीक गिअरबॉक्सवाली कार सीएनजीमध्ये आणली आहे. ही नव्या कॉम्बिनेशनची कार आम्ही जवळपास ४६२ किमी चालविली. सीएनजीवर किती चालली? पिकअप घेतला का? किती सीएनजी लागला आदी प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला.

टाटाची टिगॉर एएमटी आय सीएनजी (Tata Tigor AMT icng) ही कार आमच्याकडे होती. शहरातील ट्रॅफिकच्या त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी ऑटोमॅटीक कार चांगल्या पडतात. त्यात सीएनजी कार फार वापरल्या जातात. यामुळे टाटाने या दोघांचेही कॉम्बिनेशन बाजारात आणत भल्य़ा भल्य़ा कंपन्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाटाने या कारमध्ये ड्युअल सिलिंडर वापरला आहे. यामुळे इतर सीएनजी कारच्या एका सिलिंडरमुळे जी बुटस्पेस खाल्ली जायची ती आता बऱ्यापैकी मोठी मिळत आहे. याचे फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

कात्रज बोगद्याच्या घाटातून आम्ही ही कार पुढच्या टेस्टसाठी नेली. सुरुवातीला पिकअप एवढा चांगला वाटला नाही. नागमोडी ओव्हरेटक मारत असताना ५५-६० किमीचा वेग घेत होती. परंतू, नंतर जेव्हा बोगदा ओलांडला आणि चढाव उतार सुरु झाले तेव्हा कारने जबरदस्त पिकअप घेत चांगला परफॉर्मन्स दिला.

महत्वाच म्हणजे गिअर चेंज होताना दचके दिले जात नव्हते. यामुळे एका स्टेडी स्पीडमध्ये ही सीएनजी एएमटी कार चालविता आली. यामुळे कुठेही कॉन्फिडन्स गमावला जात नव्हता. पुणे शहरातील ट्रॅफिक, शिरवळ ते लोणंद रस्ता आणि पुढे पार बारामतीपर्यंतचा गाव खेड्यातून प्रवास या कारने केला. सस्पेंशन खूपच चांगले ट्युन केलेले आहे. हार्मनची म्युझिक सिस्टीम असल्याने साऊंड क्वालिटीचा प्रश्नच नाही.

गावा-गावांमधील एकेरी रस्त्यावरही ओव्हरटेक करताना गाडीने कच खाल्ली नाही. जशी पावर हवी होती, तशी तीच गिअर बदलत होती. यामुळे आपली कार पिकअप घेण्यापूर्वीच ओव्हरटेक करताना समोरील वाहन पुढ्यात येऊन ठेपेल की काय अशी भीती वाटली नाही.

टाटाच्या या कारला फोर स्टार सेफ्टी रेटिंग आहे. ही देखील इतर कंपन्यांवर कडीच आहे. टाटाने ट्विन सिलिंडर टेक्नॉलॉजी यात वापरली आहे. दोन छोटे सिंलिंडर जरी असले तरी ८० लीटर सीएनजी यात बसतो. किलोमध्ये विचार करायचा झाला तर साधारण ११ किलो सीएनजी यात बसला. एवढ्या सीएनजीमध्ये आम्हाला किती मायलेज मिळाले?

११ किलोमध्ये या कारने एएमटी असूनही २८६.६ किमी अंतर कापले. आम्हाला या कारने या प्रवासात २६.०५ किमी प्रति किलोचे मायलेज दिले. यानंतर आम्ही ही कार जवळपास १७६ किमी पेट्रोलवर चालविली. पेट्रोलवर आम्हाला या कारने १८.६ चे मायलेज दिले.

टाटाची ही कार दणकट आहे. यामुळे ती इतर कंपन्यांच्या कारपेक्षा उजवी आहेच. शिवाय ट्विन सिलिंडर वापरल्यामुळे डिक्कीत स्पेस चांगली मिळते. शहरात रोजच्या प्रवासात वापरण्यासाठी, कमी अंतराच्या शहर ते गाव आदी प्रवासासाठी किंवा एकटा-दोघांनी लांबचा प्रवास करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

एएमटी आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय एकाच कारमध्ये असल्याने अनेकांची होणारी अडचण टाटाने दूर केली आहे. सस्पेंशन-कंफर्ट चांगला आहे. हायवेला ही कार ११५-१२० च्या स्पीडने देखील जाण्याची या तीन सिलिंडर इंजिनची क्षमता आहे.