Tesla कर्नाटकात उभारणार उत्पादन प्रकल्प; येडियुरप्पा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 04:49 PM2021-02-14T16:49:51+5:302021-02-14T17:01:40+5:30

Tesla in India : काही दिवसांपूर्वीच टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं टेस्लानं बंगळुरूमध्ये केली होती नोंदणी

जगातिल दिग्गज कार कंपनी टेस्ला ही आपला कार उत्पादन प्रकल्प कर्नाटकात उभारणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा यांनी अधिकृतरित्या यासंदर्भातील माहिती दिली.

एलन मस्क यांची कंपनी टेस्ला कर्नाटकात उत्पादन प्रकल्प उभारणार आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी दिली. केंद्राच्या अर्थसंकल्पात राज्याला मिळणाऱ्या लाभाबद्दल माहिती देताना येडियुरप्पा यांनी याबद्दलही माहिती दिली.

टेस्ला ही कंपनी कर्नाटकात इलेक्ट्रिक कार उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. राज्यातील तुमकुम जिल्ह्यात एक इंडस्ट्रियल कॉरिडोअर उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ७ हजार ७२५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि यामुळे तब्बल अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं येडियुरप्पा म्हणाले.

गेल्या महिन्यात टेस्लानं आपली सब्सिडायरी कंपनी टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं बंगळुरूमध्ये नोंदणी केली होती.

त्यानंतर येडियुरप्पा यांनी ट्वीट करत कंपनी बंगळुरूमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर उभारणार असल्याचं म्हटलं होतं.

दिग्गज उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार आता भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे.

इंजिनिअर्सच्या एका समुहाकडून २००३ मध्ये टस्ला या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. इलेक्ट्रिक गाड्या चालवताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये असा ही कंपनी स्थापन करण्यामागील त्यांचा उद्देश होता.

या कंपनीनं अवध्या काही काळातच म्हणजेच वर्षभरात इलेक्ट्रिक कार्स या अन्य कार्सप्रमाणेच वेगानं पळणाऱ्या आणि कम्फर्ट देणाऱ्या असल्याचं सिद्ध केलं.

२००८ मध्ये टेस्लानं रोडस्टर. एका अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा शुभारंभ केला.

टेस्लानंतर आपली पहिली प्रिमिअम ऑल इलेक्ट्रिक सेडान गाडी डिझाईन केली. ही कार टेस्लाची सर्वोत्तम कारही ठरली.

२०१० मध्ये टेस्लानं अमेरिकेत आपला आयपीओ लाँच केला. १९५६ मध्ये फोर्ड मोटर कंपनीच्या आयपीओनंतरची ही दुसरी अमेरिकन कंपनी ठरली.

२०१६ मध्ये टेस्लानं कमी किंमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ३ गाड्या लाँच केल्या. आता टेस्ला ही कंपनी भारतातदेखील आपल्या ३ कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यांची किंमत ५५ ते ६० लाखांच्या दरम्यान असेल.

टेस्लाच्या कार्सचं उत्पादन कॅलिफोर्निआ आणि शांघायमध्ये केलं जातं. कंपनी आता भारतासहित विकसनशील देशांमध्येही विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

भारत आणि अन्य देशांकडे पाहते टेस्ला कमी किंमतीतही कार्स बाजारात आणण्य़ाच्या तयारीत आहे. याची किंमत १८.३ लाखांपर्यंत असू शकते.

१० जानेवारी २०२० रोजी बीएमडब्ल्यू, डॅमलर आणि फोक्सवॅगन यांना मागे टाकत टेस्ला अमेरिकेतील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी ठरली.