जगातील सर्वात मोठे कार पार्किंग, २०००० वाहने एकाचवेळी पार्क होतात; इतरही ठिकाणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 10:40 IST2025-02-06T10:23:05+5:302025-02-06T10:40:32+5:30
world's largest car parking lot List: इथे आपल्याला पार्क केलेली कार शोधता शोधता नाकीनऊ येतात, तिथे तर एकाच वेळी हजारो कार पार्क होतात...

आजकाल पार्किंगची समस्या खूपच भीषण झाली आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी मुंबई-पुण्यातच नाही तर छोट्या छोट्या शहरांत देखील रस्ते पूर्ण मोकळे असायचे. आता हेच रस्ते ओसंडून वाहत असतात. या रस्त्यांच्या दुतर्फा गाड्या पार्क केलेल्या असतात. एकीकडे प्रदुषण, पार्किंगची समस्या आणि ट्रॅफिकच्या नावाने ओरडा मारायचा आणि दुसरीकडे ऑटोमोबाईल कंपन्यांना कोणताही धरबंध ठेवायचा नाही.
दर महिन्याला जवळपास साडे तीन ते चार लाख कार रस्त्यावर येत आहेत. एवढी प्रचंड विक्री होत आहे. दुचाकींचा आकडा तर विचारूच नका. मग या गाड्या पार्क कुठे करणार? म्हणून आता महाराष्ट्र सरकार ज्याच्याकडे पार्किंग त्यालाच गाडी घेता येणार असा नियमच आणत आहे.
जगभरातही अशाच समस्या आहेत. तेथील सरकारे, प्रशासन कॉमन पार्किंग उभारत असतात. तिथे काही पैसे दिले की काही तास किंवा दिवसभर गाड्या पार्क करता येतात. असेच एक जगातील सर्वात मोठे कार पार्किंग कॅनडामध्ये आहे. तिथे शे दोनशे नाही तर तब्बल २० हजार गाड्या पार्क करता येतात.
आकडा पाहून च्रकावलात ना, एडमॉन्टनमध्ये हे भलेमोठे पार्किंग बनविण्यात आले आहे. एकाचवेळी या ठिकाणी २० हजार गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. एवढेच नाही तर त्याच्या आजुबाजुच्या जागेवर १० हजार गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात.
साध्या मॉलमध्ये दोन-तीन फ्लोअर असतील तर तुम्ही तुमची कार शोधून शोधून थकता. इथे हे कसे होत असेल, असा प्रश्न पडला असेल. परंतू ही पार्किंगची व्यवस्था १९८१ पासून सुरु करण्यात आली आहे. West Edmonton Mall चे हे पार्किंग आहे. हा मॉल कॅनडातील सर्वात मोठा मॉल आहे. इथे मॉलमध्ये न जाणारे परंतू ज्यांना कार पार्क करायची आहे ते लोकही कार पार्क करू शकतात.
जगात एकाच ठिकाणी काही हजारांत कार पार्क करता येतील अशी ठिकाणे आहेत. सिएटलमधील सी-टॅक विमानतळ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आहे. या विमानतळाच्या पार्किंगमध्ये सुमारे १३ हजार कार पार्क करता येतात.
डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळाचे मॅकनामारा टर्मिनल हे जगातील तिसरे सर्वात मोठे पार्किंग लॉट आहे, जिथे सुमारे ११,५०० कार पार्क करता येतात.
चौथा क्रमांक डिस्ने वर्ल्डचा लागतो. डिस्ने वर्ल्ड, मॅजिक किंगडम आणि एपकोट लॉट्समध्ये मिळून ११,००० कार पार्किंगची क्षमता आहे. इथे पार्किंग लॉटना डिस्ने पात्रांची नावे देण्यात आली आहेत.