TNR Estyla: नव्या नावानं पुन्हा सादर झाली Electric Scooter; किंमत केवळ ५० हजार, मिळतायत जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:08 PM2021-08-30T16:08:16+5:302021-08-30T16:26:46+5:30

TNR Estyla Electric Scooter : भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहे Electric Vehicles ची मागणी.

भारतीय बाजारात, विशेषत: दुचाकी विभागात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी सातत्यानं वाढत आहे. ग्राहकांचा हा ट्रेंड लक्षात घेऊन वाहन उत्पादक या विभागात आपली नवीन मॉडेल्स सादर करण्यात सतत प्रयत्नशील असल्याचे दिसतात.

दरम्यान, दिल्लीस्थित आघाडीची इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादक कंपनी TNR ने अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर स्टेला देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे, आता कंपनीने या स्कूटरचे नाव बदलून 'Estyla' म्हणून पुन्हा सादर केली आहे.

अतिशय आकर्षक लूक आणि शक्तिशाली इलेक्ट्रीक मोटर असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत फक्त 50,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. टीएनआरने शेअर केलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरला स्टायलिश रेट्रो लूक देण्याबरोबरच त्यात प्रगत वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ही स्कूटर दैनंदिन वापरासाठी एक आदर्श पर्याय बनते. या स्कूटरच्या नावात बदल करण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

या स्कूटरमध्ये कंपनीने 60V 28 ah क्षमतेचे लिड अॅसिड आणि लिथियम आयन बॅटरी पॅक दिले आहेत. ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी आवश्यक नाही. यामुळे ही स्कूटर आणखी किफायतशीर बनते. ही स्कूटर अशा प्रकारे तयार केली गेली आहे की ती पुरुष आणि महिला दोघांसाठीही योग्य आहे.

या स्कूटरची लांबी 1800 मिमी, रुंदी 700 मिमी, उंची 1130 मिमी आणि लिथियम आयर्न बॅटरीसह त्याचे वजन 115 किलो आहे. त्याची जास्तीत जास्त भार वाहण्याची क्षमता 160 किलो आहे. यात समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक तसेच दोन्ही ठिकाणी ट्यूबलेस टायर्स आहेत.

ड्रायव्हिंगला आरामदायक बनवण्यासाठी, त्याच्या समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक सस्पेंशन आहे. टीएनआर एस्टिला मध्ये, कंपनीने एक शक्तिशाली बॅटरी पॅक दिलं आहे, जे एका चार्जमध्ये सुमारे 70 ते 80 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देते.

त्याची लीड अॅसिड बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. त्याच वेळी, लिथियम आयर्न बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4 ते 5 तास लागतात. त्यात दिलेल्या बॅटरीचे वजन 7 किलो ते 10 किलो दरम्यान आहे. यामध्ये, ग्राहकांना कीलेस एंट्री, अँटी-थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग आणि स्वाइप सिस्टीम सारखी वैशिष्ट्ये मिळतात.

टीएनआर भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादक आहे. इलेक्ट्रीक ऑटोमोबाईल व्यवसायात, TNR त्याच्या भागीदार फर्म पँथरच्या माध्यमातून ई-रिक्षा देखील तयार करते.

नुकतीच त्यांची दुचाकी रेंज लाँच केल्यामुळे, कंपनच्या दुचाकी पोर्टफोलिओमध्ये इतर स्कूटरचाही समावेश आहे आणि कंपनी लवकरच बाजारात इलेक्ट्रीक बाईक्स आणण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनी ब्रँड म्हणून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, हरियाणा, बिहार, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये आपली सेवा पुरवत आहे.