Traffic Challan Rule: ट्रॅफिक नियम: दंडाची पावती आलीय का?; अशी करा रद्द, वापरा तुमचा अधिकार By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 08:47 PM 2022-02-26T20:47:17+5:30 2022-02-26T20:58:02+5:30
How to Take objection on Traffic Challan: वाहतुकीचा नियम मोडला म्हणून पोलीस थांबवतात किंवा ई चलन पाठवितात. बऱ्याचदा तुम्हाला चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो. अशावेळी दंड लगेचच भरू नका. तुमच्याकडे तीन पर्याय आहेत आणि दोन फायदे. तुम्हाला हा अधिकार माहिती असायलाच हवा. वाहतुकीचे नियम मोडले की त्याचे चलन आता थेट घरी येऊ लागले आहे. अनेकदा वाहतूक पोलीस सिग्नल संपला की किंवा वळण संपले की दबा धरून थांबलेले असतात. अनेकदा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि ते तो नियम दाखवून पावती फाडतात. जर तुमचे चलन चुकीने काढले गेले असेल तर तुम्हाला अनेक स्तरांवर ते रद्द करता येते.
वाहतूकीचे नियम मोडले की पावती फाडली जाते. परंतू अनेकदा चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो. त्याविरोधात अपिल करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कारण आता दंडाची रक्कम काही हजारात गेली आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आधी हे पर्याय अवलंबा. थोडा त्रास होईल परंतू ते चलन रद्द होईल.
तुम्हाला आलेल्या दंडाच्या पावतीवर अपिल करण्याचे पर्याय तुम्हाला आधीपासूनच दिलेले आहेत. परंतू ९९ टक्के लोकांना याची माहिती नसते. किंवा जर माहिती असलीच तर ती जुजबी असते. यामुळे चलन आले की तुम्ही तातडीने वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन करू शकता.
याचबरोबर याची माहिती जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात देऊ शकता. जर या ठिकाणीही तुमची तक्रार ऐकून घेतली गेली नाही तर तुम्हाला न्यायालयात जाऊन चॅलेंज करण्याचा पर्याय आहे. जर तुम्ही वाहतूक पोलिसांची चूक सिद्ध करू शकलात तर तुम्हाला चलनाचे पैसे जमा करण्याची गरज पडणार नाही.
कार, ट्रक, मोटारसायकल, स्कूटर किंवा काहीही चालवत असाल तर तुम्हाला कधी ना कधी दंडाची पावती मिळणार. कधी पार्किंग केले म्हणून, तर कधी सिग्नल तोडला म्हणून तर कधी मोबाईल, सीटबेल्ट, गाडीची नंबरप्लेट, लाईट, इंडिकेटर आदी अनेक कारणे असतात. यापैकी कधी ना कधी तुम्ही अनवधानाने का होईना नियम मोडलाच असेल.
काहीवेळा वाहतूक पोलीस चुकीच्या पद्धतीने नियम लावून दंड आकारतात आणि त्याची पावती तुमच्या हातात देतात. असे जेव्हा असेल तेव्हा तुम्ही ती वेळ आणि तो प्रसंग नीट लक्षात ठेवा. तिथे पैसे भरू नका. पोलीस ठाण्यात जाऊन तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून द्या की ते चलन कसे चुकीचे आहे. यात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा मुद्दा येत नाही. यामुळे सौम्य भाषेचा वापर करून त्यांच्याशी बोलावे.
जर या अधिकाऱ्याला तुमचा मुद्दा पटला आणि वाहतूक पोलिसाची चूक लक्षात आली तर तिथेच तुमचे चलन रद्द होऊ शकते.
कोर्टात काय करणार चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या दंडाच्या पावतीविरोधात तुम्ही न्यायालयातही दाद मागू शकता. यासाठी न्यायालयाला तुम्ही कारण देणे गरजेचे आहे. तुमची कोणतीही चूक नव्हती किंवा तेव्हा तुम्ही तिथे नव्हता, हे पटवून द्यावे लागेल. अनेकदा दुसऱ्याची गाडी असते परंतू तुम्हाला चलन पाठविले जाते. पोलिसांच्या नजरचुकीने असे घडते. न्यायालयात या बाबी सिद्ध झाल्या तर तुम्हाला आलेले चलन रद्द होईल.
फायदा काय? दंडाची पावती रद्द झाली तर तुमचे पैसे मोठ्या प्रमाणावर वाचणार आहेत. कारण आता दंड हजार रुपयांपासून सुरु होतो तो १० हजार किंवा दोन तीन नियम एकत्र केले तर लाखातही जात आहे. यामुळे तुम्ही कष्टाने कमविलेले पैसे वाचविता येणार आहेत.
शिवाय इन्शुरन्स कंपन्या तुमच्या दंडाच्या पावत्यांवरून तुम्हाला इन्शुरन्स आकारणार आहेत. तुम्ही वेगाने गाडी चालवत असाल आणि दंडाची पावती आली तर त्याचा परिणाम तुमच्या इन्शुरन्स खरेदी आणि क्लेमवर देखील होणार आहे. सध्या यावर इरडा आणि कंपन्यांचे काम सुरु आहे.