TVS चा मोठा धमाका! सादर केली जगातील पहिली CNG स्कूटर, जाणून घ्या फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:20 IST2025-01-18T16:16:31+5:302025-01-18T16:20:42+5:30

TVS Jupiter CNG Scooter : दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये TVS ने 'ज्युपिटर CNG' स्कूटर सादर केली आहे.

TVS Jupiter CNG Scooter at Auto Expo: देशातील आघाडीची टू-व्हिलर उत्पादक कंपनी TVS ने सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (BMGE 2025) मध्ये TVS ने जगातील पहिली CNG स्कूटर सादर केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय 'ज्युपिटर' चे 'CNG' कन्सेप्ट मॉडेल जगासमोर आणले आहे. कंपनी फिटेड CNG किट असलेली ही पहिली स्कूटर आहे.

कशी आहे ज्युपिटर CNG ? TVS ने सादर केलेली नवीन ज्युपिटर 125 CNG मागील मॉडेलवर आधारित आहे. या स्कूटरचा लूक आणि डिझाईन पारंपारिक ज्युपिटर प्रमाणेच आहे. पण, त्यातील मॅकेनिझम आणि पॉवरट्रेनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. याशिवाय स्कूटरच्या पॅनलवर सीएनजी बॅजिंगही देण्यात आले आहे. हे एक कन्सेप्ट मॉडेल असल्याने, कंपनीने त्याच्या बॉडी पॅनल्सवर कोणतेही मोठे काम केलेले नाही.

इंजिन मेकॅनिझमबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने शोकेस केलेल्या ज्युपिटर CNG कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये 124.8-cc सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड ट्वीन- इंजिन वापरले आहे. हे इंजिन 7.2 हॉर्स पॉवर आणि 9.4 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या इंजिनचा कमाल वेग ताशी 80.5 किमी आहे.

सीटखाली बसवले सीएनजी सिलिंडर- तुम्ही पहिल्यांदा ज्युपिटर सीएनजी बघाल, तेव्हा तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न येतो की, त्यात सीएनजी सिलिंडर कुठे बसवला आहे? तर, कंपनीने स्कूटरच्या सीटखाली सीएनजी सिलिंडर दिला आहे. यात 1.4 किलोचा सिलिंडर मिळतो. तसेच, यात 2 लिटरचा पेट्रोल टँकदेखील दिला आहे.

226 किमीची रेंज- कंपनीच्या दाव्यानुसार, नवीन ज्युपिटर 125 सीएनजी आणि पेट्रोल मोडमध्ये 226 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. CNG वरून पेट्रोल मोडवर स्विच करण्यासाठी एक बटण दिले आहे. याद्वारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने इंधन मोड बदलू शकता.

इतर फिचर्स- इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ज्युपिटर 125 सीएनजीमध्ये एलईडी हेडलाइट, मोबाइल चार्जिंग पोर्ट, ऑल-इन-वन लॉक आणि साइड स्टँड इंडिकेटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळेल. कंपनीने या ज्युपिटर 125 सीएनजीला मेटल-मॅक्स बॉडी दिली आहे.

स्कूटर कधी लॉन्च होणार? सध्या टीव्हीएस मोटरने या सीएनजी स्कूटरचे कन्सेप्ट मॉडेल दाखवले आहे. त्यामुळे उत्पादन कधी सुरू होणार, या स्कूटरची किंमत किती असणार आणि तही बाजारात कधी लॉन्च होणार, याबाबत अद्याप कुठलीही माहिती कंपनीने दिली नाही. पण ही स्कूटर बाजारात आल्यानंतर खळबळ माजवेल हे निश्चित. या नवीन स्कूटरची किंमत सध्याच्या ज्युपिटरच्या किमतीच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, सध्या बाजारात जगातील पहिली CNG बाईक उपलब्ध आहे. काही महिन्यांपूर्वीच देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj Auto ने आपली फ्रीडम सीएनजी बाईक लॉन्च केली होती. ही बाईक ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून, आतापर्यंत चाळीस हजाराहून अधिक युनिट्सची विक्रीदेखील झाली आहे. या बाईकमध्येही सीएनजी आणि पेट्रोल, अशी दोन्ही मोड्स उपलब्ध आहेत.