FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न... By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:13 PM 2021-02-20T14:13:45+5:30 2021-02-20T14:23:13+5:30
FASTag problems and solution's here : पहिला अनुभव आपणच घ्यायचा का? पुढच्यास ठेच मागचा शहाणा होता येणार नाही का... ''एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे'' हा पहिला भाग काल तुम्हाला मिळाला आता हा दुसरा भाग आहे...जाणून घ्या भविष्यात येणारे फास्टॅगचे प्रॉब्लेम... फास्टॅग वापरायला लागल्यापासून अनेकांना काही दिवस झाले असतील. टोल नाक्यांवरूनही एकदा किंवा दोनदाच गेला असाल. काहीजण अनेकदा गेलेही असतील. परंतू तिथे पुढे या पुढे या, थांबा असे हातवारे करणारे टोल नाक्यावरील कर्मचारी दिसतात. काहीवेळा चुकून मागच्या गाडीचाच टोल कापला जातो. तर काहीवेळा तुमच्या कारचा दोनदा टोल घेतला जातो. मग काय़ करायचे? ते पैसे परत कसे मिळवायचे यापासून अनेक प्रश्न सतावतात.
जर टोल नाक्यावर तुमचा दोनदा टोल कापला गेला तर बँकेच्या ग्राहक सेवा नंबरवर तक्रार करावी आणि दोनदा टोल कापल्याची माहिती द्यावी. बँकवाले तुमच्या तक्रारीची तपासणी करून त्या आधारे डुप्लिकेट ट्रान्झेक्शन दाखवून पैसे परत करतील. आता हे सरकारी बँकामध्ये विलंबाने होईल, खासगी बँकांमध्ये नेहमीप्रमाणे फास्ट होईल.
रिफंड नाही मिळाला तर... रिफंड मिळाला नाही तर तुमच्या बँकेच्या मेल आयडीवर तसेच कस्टमर केअरला पैसे परत करण्य़ास सांगावे. अनेकांचा अनुभव हे पैसे परत मिळालेले नसल्याचा आहे. तसेच SBI सारख्या बँकेकडून गेली तीन वर्षे दोन-तीनदा पाठविलेल्या मेलला साधा रिप्लायदेखील आलेला नाहीय. यामुळे फास्टॅगची बँक निवडताना ही काळजी जरूर घ्या.
चुकीचे टोल शुल्क कापल्यास... मुंबई पुणे एक्प्रेसवेवर हा प्रकार होतो. कारण दोन टोलनाक्यांदरम्यान लोणावळा, खोपोली एक्झिट असल्याने वाहनचालक पूर्ण रस्ता पार करत नसल्याने दोनदा टोल कापला जातो. यामध्ये पहिल्या टोलवर एकूण टोलपैकी जादा असेल ती रक्कम आणि नंतरच्या टोलवर उरलेली रक्कम कापली जाते. अनेकदा दोन्ही टोलवर जादाची रक्कम दोनदा कापली जाते. अशावेळी बँकेला फोन करून त्यांना माहिती द्यावी. त्या याची चौकशी करून तुम्हाला चार्जबँकच्या पद्धतीने तुम्हाला पैसे देतील.
दुसऱ्या शहरात राहण्यास गेला तर... FASTag हा देशभरातील सर्व टोल प्लाझांवर काम करतो. यामुळे तुम्ही कोणत्याही राज्यात रहायला गेला तरीही याचा परिणाम तुमच्या फास्टॅगवर होत नाही. परंतू जर तुम्ही पत्ता बदलणार असाल तर त्याची माहिती बँकेला द्यावी. म्हणजे पुढील काही पत्रव्यवहार असतील ते तुम्हाला मिळतील.
फास्टॅग ट्रान्सफर होतो का? फास्टॅग ट्रान्सफर होत नाही. जर तुम्ही कार विकत असाल तर तुमचा फास्टॅग काढून टाका. नाहीतर नवीन मालक टोलनाक्यावरून गेल्य़ास तुमच्या अकाऊंटमधून पैसे कापले जातील. तसेच बँकेलाही कार विकत असल्याची सूचना द्यावी व अकाऊंट बंद करावे.
खात्यातून पैसे गेले की नाही कसे कळणार? जेव्हा वाहनचालक टोलनाका पास करतो तेव्हा त्याला मेसेज येईलच असे नाही. काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी मेसेज येतो. या मेसेजमध्ये टोलनाक्याचे नाव, ट्रान्झेक्शनची तारीख, कापलेले पैसे आदीची माहिती असते. ती चेक करावी.
खातेधारक आणि वाहन मालक एकच हवा का? बऱ्याचदा वडील किंवा मुलाने गाडी घेतलेली असते आणि कुटुंबातील सदस्य ती चालवत असतात. मुलीच्या नावावर असते आणि तिचे लग्न होते. फास्टॅग हा वाहनाशी संबंधित आहे. तसेच त्याला कोणतेही अकाऊंट जोडता येते. मात्र ज्याचे ते अकाऊंट आहे तो व्यक्ती वाहन मालकाच्या रक्तातील नात्यातला असायला हवा.
कोणता फास्टॅग घ्यावा... बाजारात वेगवेगळ्या बँकांनी फास्टॅग आणले आहेत. यामध्ये पेटीएम, एसबीआय, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसीसारख्यांचे फास्टॅग आहेत. तुम्हाला जो सोईस्कर आहे तो फास्टॅग घेऊ शकता. पण लक्षात असुद्या...फास्टॅग सोप्या पद्धतीने रिचार्ज करता यायला हवा.
कोण कोणती कागदपत्रे लागणार... FASTag खरेदी करताना कागदपत्रांची गरज लागणार आहे. यामध्ये वाहनाचे आरसी बुक, मालकाचा फोटो, आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आदी कागदपत्रे द्यावी लागतात.
आरसीशिवाय फास्टॅग घेता येतो का? नाही. फास्टॅग हा कारच्या नंबरवर असतो. हा नंबरही युनिक असतो. यामुळे टोल नाक्यांवरून जात असताना पुढील स्क्रीनवर तुमच्या वाहनाचा नंबर दिसतो.