देशातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या कार कोणत्या? नावे वाचून शॉक व्हाल, पहिल्यांदाच आला असा रिपोर्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:25 AM2024-12-03T10:25:33+5:302024-12-03T10:32:15+5:30

Most Accident car list: देशातील एकूण अपघातांपैकी ७८ टक्के अपघात हे मेट्रो शहरांमध्ये होतात, असे समोर आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे नाही तर हैदराबाद आणि दिल्ली एनसीआरचा वरचा क्रमांक लागतो.

देशात दरवर्षी लाखो अपघात होतात. यात अनेकांचे जीव जातात तर अनेक लोक जायबंदी होतात. या अपघातात दुचाकी स्वारांच्या मृत्यूची संख्या जास्त असते. परंतू, असाही एक अहवाल आला आहे ज्यात सर्वाधिक अपघात होणाऱ्या कारची नावे देण्यात आली आहेत.

देशातील एकूण अपघातांपैकी ७८ टक्के अपघात हे मेट्रो शहरांमध्ये होतात, असे समोर आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे नाही तर हैदराबाद आणि दिल्ली एनसीआरचा वरचा क्रमांक लागतो. यानंतर पुणे आणि बंगळुरुचा क्रमांक लागतो. सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणांमध्ये पुण्यातील मारुंजी आणि मुंबईतील मीरा रोड आणि बंगळुरुतील बोमनहळ्लीचा भाग आहेत.

सर्वाधिक अपघात होणाऱ्या चारचाकींमध्ये ह्युंदाई आय १० चा पहिला क्रमांक आहे, त्यानंतर मारुती स्विफ्ट, त्यानंतर मारुती बलेनो, त्यानंतर ह्युंदाई i20 आणि मारुती डिझायरचा क्रमांक लागतो. या गाड्यांचे सर्वाधिक अपघात होतात, असे हा रिपोर्ट सांगतो.

अॅको जनरल इन्शूरन्सचे उपाध्यक्ष मयांक गुप्ता यांनी या रिपोर्टवर माहिती दिली आहे. रस्ते अपघात कमी करणे, अपघात प्रवण क्षेत्राची माहिती करून देणे व उपाय लागू करण्यासाठी प्रशासनाची मदत करण्यासाठी हा अहवाल आणला असल्याचे म्हटले आहे.

या रिपोर्टमध्ये अपघाताच्या अन्य कारणांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. रस्ते अपघातासाठी बहुतांशवेळा मोकाट जनावरे, कुत्रे आदी कारणीभूत असतात. कुत्र्यांमुळे अपघात होण्याच्या घटना या प्राण्यांमुळे होणाऱ्या एकूण अपघातांच्या ६२ टक्के आहेत. गाय २९ टक्के आणि म्हैस ही ४ टक्के अपघाताचे कारण आहे.

दारु पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. दारु पिऊन गाडी चालविण्यापेक्षा नारळामुळे २.२ पटींनी जास्त अपघात होत असल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

भारतीय रस्त्यांवर खड्डे सर्वात मोठा धोका आहे. भ्रष्टाचार काही कमी होण्याचे नाव घेत नाही. रस्ते निर्मितीत एवढा प्रचंड भ्रष्टाचार आहे की त्यामुळे हे रस्ते लवकर खराब होतात. ते चुकविण्याच्या प्रयत्नात किंवा खड्ड्यात गाडी आदळल्याने, तोल गेल्याने पडून अपघात होतात.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांपैकी ४४.८ टक्के अपघात हे शहरांत होतात. दिल्ली, मुंबई त्यात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. हा अहवाल एकाच वाहन विमा कंपनीचा आहे. अन्य कंपन्यांकडील आकडेवारीत विविध अपघातप्रवण ठिकाणे, कार आणि कारणे आदी असू शकतात.