Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स! By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:14 PM 2024-05-11T14:14:22+5:30 2024-05-11T14:18:52+5:30
Beauty Tips: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. कदाचित यामुळेच जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा डोळ्यांकडे विशेष लक्ष देतो. चेहेऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर घालतात आखीव रेखीव दाट भुवया. वेळच्या वेळी आयब्रो करून आपण अपडेटेड राहू शकतो. थ्रेडींग केल्यामुळे चेहऱ्याचा नूर पालटतो. पण भुवया विरळ असतील तर आयब्रो पेन्सिलचा मारा केला जातो. ती नीट लावता आली नाही तर भुवयांची कृत्रिमता सौंदर्य बिघडवू शकते. म्हणून नैसर्गिक रित्या भुवया जाड आणि दाट दिसण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा तीन प्रकारे वापर करता येईल. डोळ्यांचा मेकअप करताना भुवयांचीही काळजी घेतली जाते. जर त्या विरळ असतील तर त्यांना दाट दिसण्यासाठी आयब्रो पेन्सिलचा वापर केला जातो. मात्र दर वेळी आयब्रो पेन्सिल वापरून कृत्रिम रित्या भुवया दाट करण्यापेक्षा नैसर्गिक उपाय जाणून घेऊया.
थंडीत आपण जी पेट्रोलियम जेली वापरतो, तिचा रोजचा वापर तुमच्या भुवयांना कंडीशनिंग करण्याचं काम करेल. भुवयांचे केस मऊ होतील आणि वेगाने वाढून भुवई दाट होईल. ज्याप्रमाणे डोक्यावरचे केस मऊ व्हावे म्हणून आपण खोबरेल तेलाचा वापर करतो, तसेच आयब्रोचे केस योग्य रीतीने वाढावेत म्हणून जेलीचा वापर केला जातो.
भुवयांवर पेट्रोलियम जेली वापरण्याचे फायदे भुवयांवर पेट्रोलियम जेली लावण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी आपण त्याच्या फायद्यांबद्दल बोलू. भुवयांवर पेट्रोलियम जेली लावून अनेक फायदे मिळू शकतात. जसे की, पेट्रोलियम जेली हे एक हायड्रेटिंग प्रोडक्ट आहे आणि म्हणूनच त्याच्या वापरामुळे भुवया मऊ आणि दाट होऊ शकतात.
पेट्रोलियम जेली लावल्याने भुवयांना मेकअपमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळू शकते. पेट्रोलियम जेली भुवया नैसर्गिकरित्या जाड करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या नियमित वापराने भुव्यांची वाढ काही दिवसातच होऊ लागते. पेट्रोलियम जेली भुवयावरील केस गळणे थांबवते आणि त्यांना कंडिशन करते. आता त्याचा वापर कसा करायचा ते पाहू.
पेट्रोलियम जेली आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल - तुमच्या भुवया जाड करण्यासाठी, व्हिटॅमिन ई कॅप्सूल पेट्रोलियम जेलीमध्ये मिसळून लावू शकता. यासाठी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल फोडावी. त्यात अर्धा चमचा पेट्रोलियम जेली घालून चांगले मिक्स करावे आणि लावावे. रात्रभर असेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा.
पेट्रोलियम जेली आणि एरंडेल तेल - भुवयांची वाढ होण्यासाठी पेट्रोलियम जेली एरंडेल तेलात मिसळून लावता येते. यासाठी एका छोट्या भांड्यात एरंडेल तेलाचे काही थेंब घ्या आणि त्यात थोडीशी पेट्रोलियम जेली घाला. आता हे मिश्रण बोटाने किंवा स्वच्छ मस्करा ब्रश वापरून तुमच्या भुवयांवर लावा. या उपायाचा नियमितपणे अवलंब केल्याने तुम्हाला काही दिवसातच तुमच्या भुवयांच्या केसांमध्ये फरक दिसू लागेल.
भुवईची वाढ थांबण्याचे कारण - चेहऱ्यावर मेकअप तसेच धुळीचे थर असले तरी भुवयांची वाढ थांबते. म्हणून रोज झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा आणि मग पेट्रोलियम जेलीचा भुवयांवर वापर करा. रात्री झोपताना त्वचेवर शक्य तेवढे नैसर्गिक प्रोडक्ट वापरा.