संतापजनक ! चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञाताने फोडला; हजारो लिटर पाणी गेले वाहून By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 01:40 PM 2021-08-10T13:40:09+5:30 2021-08-10T13:49:04+5:30
( संतोष स्वामी ) बीडच्या धारुर तालुक्यातील चाटगाव येथील तलावावरील सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने तलावातील साठा कमी झाला आहे. उन्हाळ्यात या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
यंदा बालाघाट डोंगर पट्ट्यात सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे चाटगाव येथील तलाव ९८ टक्के भरला. तलाव भरल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ समाधानी होते.
चाटगाव,दिंद्रुड, संगमसह पाच ते सहा गावच्या शिवारात शेती व पिण्यासाठी पाणी या तलावातून वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होते.
तलावातील संपादित क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पीक लागवड केलेली आहे. ही पिके पाण्याखाली जात असल्याने तलावाचा सांडवा फोडण्यात आला असावा अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
सांडव्याची चिरेबंदी भिंत एक फूट उंच तर जवळपास चार फूट रुंद फोडण्यात आली आहे. भविष्यात जोरदार पाऊस झाल्या तर पाण्याचा दाब वाढून भिंतीला मोठे भगदाड पडू शकते.
तसेच तलावातील पाणी वाहून जात तलावाखालील चाटगाव, संगमसह अनेक गावांना आणि तलाव परिसरातील शेतींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, पाटबंधारे विभागाशी याबाबत संपर्क केला असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चाटगाव, दिंद्रुड व संगम ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पहा व्हिडिओ - https://fb.watch/7hXOXJKrMZ/