'जाऊदे, ते प्यायलेले असतील, तू गाडी थांबवू नको'; ३ ऑगस्टच्या पाठलगाबाबत चालकाचा मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 10:18 AM 2022-08-17T10:18:31+5:30 2022-08-17T10:31:05+5:30
ऑडिओ क्लिपवर आता विनायक मेटेंचा दूसरा चालक समाधान वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघात झाला नसून तो घातपात आहे, अशा दवा समर्थक आणि नातेवाइकांकडून केला जात असताना आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात एका कार्यकर्त्याने ३ ऑगस्टलासुद्धा विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाल्याचे सांगितले आहे. या ऑडिओ क्लिपवर आता विनायक मेटेंचा दूसरा चालक समाधान वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे.
३ ऑगस्टच्या दिवशी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. यावेळी शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा कट मारला. आमची गाडी साधारण ८० च्या स्पीडने चालत होती. मात्र त्या इर्टिगा गाडीने जवळपास १२० किमीच्या वेगाने आमच्या गाडीला कट मारला.
सदर प्रकारानंतर मी विनायक मेटे साहेबांना म्हणालो, की गाडी थांबवू का? मात्र ते पिऊन गाडी चालवत असतील. त्यामुळे तू थांबू नकोस, गाडी सुरुच राहुदे, असं विनायक मेटेंनी मला सांगितले, असा दावा समाधान वाघमारे यांनी केला आहे. तसेच शिक्रापूर परिसरात रस्त्यावर असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यामधून बरंच काही बाहेर येईल, असा दावाही समाधान वाघमारे यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकासमोर मोठं आव्हान निर्माण झाली आहे.
समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र १४ ऑगस्टला तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. मी अपघाताच्या दिवशी गाडीवर असतो तर मी स्वतःचा जीव दिला असता, मात्र साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं, असं समाधान वाघमारे यांनी सांगितलं.
अपघाताच्या चौकशीसाठी ८ पथके विनायक मेटेंच्या अपघातावर अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. त्यासाठी पोलिसांची ८ पथके नेमण्यात आली आहेत. मेटेंच्या कारचा चालक आणि ट्रक ड्रायव्हरची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर विनायक मेटे यांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापुरवीच झाला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.