१४१ दिवस शनी वक्री: ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना ताप; मेष ते मीन कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 07:07 AM2023-06-18T07:07:07+5:302023-06-18T07:10:02+5:30

शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी किंवा कुंडलीतील स्थान मजबूत करण्यासाठी कोणते उपाय करावे? तुमच्यावर शनी वक्रीचा कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा न्यायाधीश, कर्मकारक शनी ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. शनी ग्रह याच मूलत्रिकोण कुंभ राशीत वक्री होणार आहेत. सुमारे १४१ दिवस शनी वक्री अवस्थेत भ्रमण करणार असून, ०४ नोव्हेंबर रोजी कुंभ राशीत शनी मार्गी होणार आहे. (saturn retrograde in aquarius 2023)

सन २०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आताच्या घडीला मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तर कुंभ राशीचा साडेसातीचा मधला किंवा दुसरा टप्पा सुरू आहे. याशिवाय मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपेल, असे सांगितले जात आहे. (shani vakri in kumbh rashi 2023)

शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. शनी मंदगतीचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश असल्याने जसे तुम्ही कर्म कराल, तसा तो न्याय करतो, असे म्हटले जाते. शनी वक्री होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. यामुळे काही राशींना याचा शुभ लाभ मिळू शकेल, तर काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन काहीसे संमिश्र ठरू शकेल. कार्यक्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण जास्त असू शकेल. दुसरीकडे, व्यावसायिकांना लाभ मिळू शकतो. आव्हाने कमी होऊ शकतील. धनलाभ वाढेल. विद्यार्थ्यांनाही जास्त मेहनत करावी लागेल. शक्य असल्यास शनिवारी पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावावा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन सकारात्मक ठरू शकेल. जीवनात अनेक चांगले बदल घडू शकतात. अपेक्षित ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी ताण जास्त असेल. नोकरदारांवरही कामाचा भार पडू शकेल. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. मात्र, दिलेली जबाबदारी अधिक चांगली कार्य करण्यास सक्षम असाल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन लाभदायक ठरू शकेल. विशेष फायदा होऊ शकेल. प्रत्येक क्षेत्रात विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीही चांगली असू शकेल. जुनी येणी किंवा अडकलेले पैसे प्राप्त होण्याची शक्यता आहे. ती रक्कम मोठी असू शकते.

कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन काहीसे संमिश्र ठरू शकेल. कोणतीही मोठी गुंवतणूक टाळणे हिताचे ठरू शकेल. जोखीम पत्करून कामे न करणे उपयुक्त ठरू शकेल. नवीन कामाला सुरुवात न केलेली बरी. आरोग्याची काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने निराश होऊ शकाल. दाम्पत्य जीवनात तणाव वाढू शकतो. कालांतराने गोष्टी अनुकूल होऊ शकतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन अनुकूल ठरू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. अनेकांची रखडलेली कामेही लवकरच पूर्ण होऊ शकतील. व्यवसायिकांचा एखादा करार अडकला असेल तर तो अंतिम करू शकता. भविष्यात तुम्हाला यश मिळू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. जुना आजार डोके वर काढू शकतो. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार पुढे ढकलावा. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते. मात्र, भावंडांशी मतभेद होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आहार नियंत्रित ठेवणे हिताचे ठरू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन काहीसे संमिश्र ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींच्या नात्यात तणाव वाढू शकतो. गैरसमजामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. आर्थिक आघाडीवर काही आव्हानांचा सामना करावा लागू शकेल. दुसरीकडे जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास शनिवारी रुद्राभिषेक करावा.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन काहीसे संमिश्र ठरू शकेल. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. धावपळ करावी लागू शकते. मालमत्तेवरून वादविवाद होऊ शकतात. मात्र, कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ धीर धरणे उचित ठरू शकेल. शक्य असल्यास दर शनिवारी बजरंगबलीची पूजा करावी. मंदिरात जावे.

धनु राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन सकारात्मक ठरू शकेल. जीवनात चांगले बदल घडू शकतात. ऑफिसमधील सहकारी पूर्ण सहकार्य करतील. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी नाते अधिक घट्ट होऊ शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. शक्य असल्यास शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करा.

मकर राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होऊ शकते. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतील. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील. आनंद आणि समृद्धी वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकेल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल.

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनी याच राशीत वक्री होत आहे. शनी वक्री होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. प्रत्येक बाबतीत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव वाढू शकतो. करिअरमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. नोकरी, व्यवसायात चांगल्या परिणामांसाठी दुप्पट मेहनत करावी लागेल. जोडीदाराच्या सल्ल्याने कोणतेही नवीन काम केल्यास फायदा होऊ शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री चलन अनुकूल ठरू शकेल. जीवनात आनंद, शांतता वाढू शकेल. खर्च वाढेल, पण चांगल्या कामावर खर्च केल्यास मनाला समाधान मिळेल. परदेशातून मिळणारे उत्पन्न वाढू शकेल. व्यवसायात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करू शकता. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, परत मिळणे कठीण होईल. शक्य असल्यास दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करावे. सात वेळा प्रदक्षिणा घालावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.