‘या’ ४ राशींवर गुरु मेहेरबान, अपार कृपेचा मिळतो लाभ; धन-दौलत-भरभराट, बृहस्पति शुभच करतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:42 IST2025-01-15T11:33:29+5:302025-01-15T11:42:14+5:30

नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाच्या ४ राशी अत्यंत प्रिय असून, गुरुकृपेमुळे कशाचीच कमतरता भासत नाही. अपार यश, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला अतिशय महत्त्व असून वरचे स्थान आहे. नवग्रहांतील गुरु ग्रह हा जगातील सत् स्वरूपाचा कारक आहे. गुरुचे सर्व सद्गुण जीवाला पोषक व चैतन्यदायी आहेत. गुरू ग्रहाला एकंदर ७९ चंद्र आहेत, असे मानले जाते. त्यांपैकी ठळकपणे दिसणारे व गॅलिलियोने शोधलेले चार उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात. (most favorite of jupiter according astrology)

गुरु हा ज्ञान, सुख व स्वराचा कारक, सचिव आहे. गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे. राशीचक्रात धनु व मीन या दोन राशींचे अधिपत्य गुरु ग्रहाकडे आहे. तर पुनर्वसु, विशाखा, पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांचे स्वामित्व गुरुकडे आहे. अंकशास्त्रात मूलांक ३ चा स्वामी गुरु आहे. कर्क ही गुरुची उच्च रास आहे. रवि, चंद्र व मंगळ हे गुरुचे मित्रग्रह आहेत. तर बुध, शुक हे शत्रूग्रह आहेत. शनी, राहु यांच्याशी याचे समत्वाचे संबंध आहेत. (brihaspati guru graha 4 priya rashi in marathi)

गुरुप्रधान व्यक्ती व्यवसायाने शिक्षक, प्रोफेसर, सरकारी कार्यालयातील कारकून, भिक्षुक, गुरु, धार्मिक कार्ये करणारे पुरोहित, कीर्तनकार, प्रवचनकार, बँक कर्मचारी, राजकीय सल्लागार, सामाजिक पुढारी, ज्योतिषी, न्यायाधीश, हिशोबनीस असू शकतात. गुरु हा देवांचा गुरु तर शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. नवग्रहांचाही गुरु मानला गेलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाच्या ४ राशी अत्यंत प्रिय असल्याची मान्यता असल्याचे सांगितले जाते.

गुरु ग्रहाला शिक्षण, ज्ञान, संपत्ती, समृद्धी, नशीब, विवाह, आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. गुरु कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. जेव्हा गुरु ग्रह एखाद्या व्यक्तीवर कृपा करतो तेव्हा त्याचे भाग्य चमकते, असे म्हटले जाते. गुरु ग्रह आपल्या प्रिय राशींवर कधी संकटे येऊ देत नाही, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही, अपार कृपेसह धन-दौलतीची भरभराट करतो, अपार यश-प्रगती देतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. गुरु ग्रहाच्या ४ प्रिय राशी कोणत्या? कसा पडू शकतो प्रभाव? जाणून घेऊया...

कर्क: ही गुरु ग्रहाची उच्च रास आहे. या राशीत गुरु ग्रह सर्वांत शक्तिशाली होतो. गुरु ग्रह नेहमीच कृपा करतो, आशीर्वाद देतो आणि प्रत्येक वेळी त्यांना सर्वांत कठीण समस्यांमधून बाहेर काढण्यास मदत करतो. देवगुरू गुरूच्या कृपेने या राशीचे लोक जीवनात खूप आनंदी राहतात. या राशीच्या लोकांना नेहमीच गुरु ग्रहाचा आशीर्वाद असतो. असे मानले जाते की, जेव्हा गुरु कर्क राशीत भ्रमण करतो तेव्हा या लोकांना आर्थिक लाभ होतो. त्यांच्या आयुष्यात नेहमीच भरभराट होते. गुरुच्या कृपेने हे लोक शिक्षण, सामाजिक कार्य आणि त्यांच्या कार्यात खूप प्रगती करतात आणि कीर्ति मिळवतात.

सिंह: या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्य हा गुरुचा सर्वांत परममित्र आहे. अशा परिस्थितीत, या राशीचे लोक गुरु ग्रहाच्या विशेष कृपाछत्राखाली राहतात. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. ते आत्मविश्वासाने पुढे जातात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. या राशीच्या लोकांना जीवनात सर्व सुखे मिळतात. ते त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारे यश मिळवतात. या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व, धाडस आणि सर्जनशीलता असे जन्मजात गुण असतात. या राशीचा स्वामी सूर्य नेतृत्व गुण देतो, परंतु यात धोरण, न्याय आणि नैतिकता वाढविण्यात गुरुचे सर्वांत मोठे योगदान असते. यामुळेच व्यक्तीला विशेष कीर्ति मिळते.

धनु: गुरुचे स्वामित्व असलेली ही रास आहे. धनु रास अग्नि तत्त्वाशी संबंधित आहे. या राशीचे लोक न्यायी, तार्किक, सर्जनशील आणि स्वतंत्र विचार करणारे असतात. या राशीच्या लोकांवर गुरुचा आशीर्वाद नेहमीच असतो. गुरु ग्रहाच्या कृपेने हे लोक नवीन गोष्टी शिकण्यात उत्सुक आणि पटाईत असतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. गुरु ग्रह सर्व बिघडलेल्या कामांना पूर्ववत करून योग्य दिशा देण्याचे काम करतो. या राशीचे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात. देवगुरू प्रत्येक कठीण काळात त्यांचे रक्षण करतात. जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. समाजात आदर वाढतो. या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळते. गुरुच्या कृपेने आयुष्यात भरपूर भौतिक आनंद मिळतो.

मीन: या राशीचे स्वामित्वही गुरु ग्रहाकडे आहे. मीन रास जल तत्त्वाची रास आहे. या राशीचे लोक स्वभावाने सर्जनशील, कल्पनाशील आणि सहानुभूतीशील असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे सर्वोत्तम योगदान देतात. या राशीतील लोकांवर कोणत्याही ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव खूपच कमी असतो. या राशीच्या लोकांवर नेहमीच गुरुकृपा राहते. राहु ग्रह या राशीवर वर्चस्व गाजवू शकत नाही. गुरु आशीर्वादाने संपत्ती आणि समृद्धी वाढते. समाजात भरपूर आदर मिळतो. गुरु या राशीच्या लोकांचे नेहमीच रक्षण करतात. गुरु ग्रहाच्या कृपेने जीवन चांगले आणि आनंदी असते. या लोकांना कला, संगीत आणि साहित्यात खूप रस असतो. या राशीचे लोक स्वभावाने खूप सहनशील असतात. या स्वभावामुळे गुरु ग्रहाला या राशीचे लोक अत्यंत प्रिय असतात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.