हनुमंताचे ५ सोपे मंत्र, शिकवतील भक्ती, युक्ती, शक्तीचे तंत्र! By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:34 AM 2021-08-14T11:34:40+5:30 2021-08-14T11:43:31+5:30
शक्ती, भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठायी आढळतो. म्हणून आपण सर्वांनी, विशेषतः युवकांनी आपल्या उपास्य देवतेबरोबरच हनुमंताची उपासना करावी, असे समर्थ रामदास स्वामी सांगत असत. शक्तीला युक्तीची जोड हवी नाहीतर नुसत्या शक्तीचा गैरवापर होऊ शकतो. सगळीकडेच शक्तिप्रदर्शन करून चालत नाही, काही ठिकाणी युक्ती आणि भक्ती दोन्हीचा वापर करावा लागतो. हे तंत्र आत्मसात करण्यासाठी आपण हनुमंताला शरण जाऊया आणि त्याची करुणा भाकून आम्हालाही सन्मार्ग दाखवा अशी प्रार्थना करूया. त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही मंत्राचा उपयोग करता येईल ॐ अं अंगारकाय नमः शरीराबरोबर मनाचेही स्वास्थ्य गरजेचे आहे. यासाठी शक्तीच्या उपासकांनी रोज सकाळी व्यायामाला सुरुवात करताना ५ मिनिटे ध्यानधारणा करून 'ॐ अं अंगारकाय नमः' हा जप १०८ वेळा करावा. नंतर नित्य व्यायामाला सुरुवात करावी.
मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥ रामरक्षा आणि मारुती स्तोत्रात या श्लोकाचा उल्लेख आलेला आहे. एरव्हीसुद्धा मारुतीची स्तुती करताना आपण हा श्लोक म्हणतो. वाऱ्यापेक्षा वेगवान असलेल्या मनावर ज्याने विजय मिळवला आहे आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो अशा पवनपुत्र रामदूता तुला आमचा नमस्कार असो.
ॐ हं हनुमते नम: जप, स्तोत्र, मंत्रांमध्ये उच्चाराला महत्त्व आहे. मंत्र किती वेळा म्हटला हे महत्त्वाचे नसून तो कसा म्हटला यावर त्याचा प्रभाव ठरतो. मंत्रांमधले इकार, उकार, हुंकार विशिष्ट हेतूने दिलेले असतात, ते जसे च्या तसे म्हणणेच अभिप्रेत असते. त्यानुसार वरील मंत्र नीट उच्चारासह १०८ वेळा म्हणावा.
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥ ही देखील मारुती रायाची केलेली स्तुती आहे. स्तुती, कवन हे देवाचे गोडवे गाण्यासाठी नसून देवाच्या कीर्तीची ओळख आपल्याला पटावी म्हणून केलेली असते. त्यानुसार वरील श्लोकात म्हटले आहे, की जो अतुलनीय शक्तीचे धाम आहे, कणखर देहाचा, ज्ञानी, विद्वान, सर्वगुणसंपन्न, वानरांचा प्रमुख, तरी रामाचा सेवक म्हणवून घेणारा असा हनुमंत तुला आमचा नमस्कार!
ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट हनुमंत हा रुद्रावतार मानला जातो. शिव शंकराच्या देहाचा दाह राम नामाने शांत झाला तेव्हापासून ते कायमस्वरूपी रामभक्त झाले आणि त्यांनी राम युगात हनुमंत बनून रामरायाची सेवा पत्करली. अशा रुद्राचे आणि हनुमंताचे स्मरण करण्यासाठी वरील मंत्र १०८ वेळा भक्तिभावाने म्हणावा.