प्रकट दिन ते स्मरण दिन ‘अशी’ करा स्वामी सेवा; ६ दिवस, ६ गोष्टी दान द्या, वर्षभर सुख लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 17:34 IST2025-03-30T17:18:12+5:302025-03-30T17:34:54+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2025: प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधी ६ दिवस विशेष स्वामी सेवा करून ६ गोष्टींचे दान करणे अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे. नेमके काय आणि कसे करावे? जाणून घ्या...

Shree Swami Samarth Prakat Din 2025: चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. स्वामींनी अनेकांना विविध रुपात दर्शन देऊन प्रत्यक्ष अनुभूति दिली. श्री स्वामी समर्थ या नावाचा नामोच्चार केला, तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे.

Shree Swami Samarth Smaran Din 2025: अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात. केवळ अक्कलकोट नाही, तर जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधी ६ दिवस विशेष स्वामी सेवा करून ६ गोष्टींचे दान करणे अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे.

समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते, तेव्हा स्वामींची कृपा व्हावी, अशी आशा अनेक जण मनाशी लावून धरतात. स्वामींच्या प्रकट दिन ते स्मरण दिन विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, स्वामींची अखंड कृपा लाभू शकते. समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा सकारात्मक मार्ग सापडू शकतो, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे. स्वामींचा प्रकट दिन, त्यानंतर येणारे ४ गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल, त्या गोष्टींचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम.

श्री स्वामींच्या प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा. यासाठी आपण एखाद्या गुरुजींना, पुरोहिताला, गावातल्या मंदिरातील पूजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो, तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य नाही, त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाउजपीस त्यांच्या पत्नीला दान द्यावे.

दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत. एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो, तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल.

तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना वाहावीत. त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल. मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने वाहावे. श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा.

चौथ्या गुरुवारी गूळ, चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा. यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे. आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सन्निध पोहोचतो.

चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतारकार्याची सांगता केली होती. यंदा शनिवारी, २६ एप्रिल २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. तसेच स्वामींच्या मठात जाऊन तेथे आलेल्या भाविकांना प्रसादरुपी वाटावा. अथवा एखाद्या गरजवंताला द्यावा.

आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते. स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा करत राहावी.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.