मिस्टर परफेक्शनिस्टचे सिनेमे फ्लॉप का होतायत? आमीर खानचा पुढील काळ वाईट? २ वर्षे अत्यंत कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 07:07 AM2022-08-27T07:07:07+5:302022-08-27T07:07:07+5:30

आमीर खानची रास कोणती? मिस्टर परफेक्शनिस्टला कुंडली नेमके काय दर्शवते? जाणून घ्या...

एकामागून एक हिट सिनेमांची रांग लावणाऱ्या तसेच बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आमीर खानचे गेल्या काही वर्षातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटल्याचे पाहायला मिळत आहे. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला आमीर खानचा लाल सिंह चड्ढा नामक चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. (aamir khan)

मात्र, आमीरचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल दाखवू शकलेला नाही. इतकेच नाही तर यामुळे नेटफ्लिक्सशी होत असलेला करारही रद्द झाला. याचा आमीर खानला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी मिस्टर परफेक्शनिस्टचे सिनेमे फ्लॉप का होतायत? आमीर खानचा वाईट काळ सुरू झालाय का, याबाबत ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. (mister perfectionist aamir khan kundali)

आमिर खानचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला. आमीर खानच्या जन्मकुंडलीप्रमाणे लग्न स्थानी कुंभ रास असून, या एकाच राशीत सूर्य, शुक्र आणि शनी हे तीन ग्रह विराजमान झालेले आहेत. बुध ग्रह मीन राशीत आहे. तर गुरु ग्रह मेष राशीत आहे. राहु ग्रह कुंडलीत चौथ्या स्थानी आहे. तसेच मंगळ ग्रह सातव्या आणइ केतु दहाव्या स्थानी विराजमान आहे. चंद्र स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत आहे. म्हणजेच आमीर खानची रास कर्क आहे. आमीर खानच्या कुंडलीत सूर्य २९ अंशावर आहे.

सूर्याच्या या शुभ स्थितीमुळे आमीर खानला खूप यश आणि प्रसिद्धी मिळाली आहे. बॉलिवूडमधील अनेक पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारांसोबतच भारत सरकारने आमीर खानला त्याच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

आमीर खानची कुंडली कुंभ राशीची आहे, ज्यात शुक्र योगकारक ग्रह आहे. योगकारक शुक्र एखाद्या व्यक्तीला त्याच्या महादशामध्ये २० वर्षे उत्तम यश आणि सर्वोच्च प्रगती देतो, असा दावा ज्योतिषशास्त्रानुसार केला जातो. शुक्र ग्रहाने आमीरला महादशामध्ये भरपूर यश मिळवून दिले. शुक्राची महादशा १९९३ ते २०१३ पर्यंत चालली आणि याच काळात त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि यशोशिखर गाठले.

मात्र, आमीर खानच्या कुंडलीत मंगळाची स्थिती प्रतिकूल आहे. मंगळ विवाह स्थानात बसून मांगलिक योग बनवत आहे. त्यामुळेच आमीर खानचे दोनदा लग्न झाले आणि घटस्फोटही झाले, असे सांगितले जात आहे. आमिर खानच्या कुंडलीत सूर्य आणि शनि हे दोन्ही विरुद्ध ग्रह एकाच स्थानी आहेत. जीवनात पुढे जाण्यासाठी या दोन्ही ग्रहांचे महत्त्वाचे योगदान आहे. पण जेव्हा हे दोन ग्रह कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत एकत्र असतात, तेव्हा प्रसिद्धी तर मिळतेच, पण लोकांना वारंवार विरोधाचा सामना करावा लागतो, असे म्हटले जाते.

सन २०१९ पासून आमीर खानची चंद्राची महादशा सुरू झाली असून, ती २०२९ पर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे. चंद्राची ही दशा आमिरसाठी चांगली नाही. याचे कारण चंद्र आपल्या कुंडलीत शत्रूस्थानाचा स्वामी असून, शत्रूस्थानात बसलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रसिद्धीचा आलेखही घसरला असल्याचे म्हटले जात आहे.

सन २०१७ च्या ऑगस्टपासून आमीर खानच्या कुंडलीतील राहु ग्रहही शुभ स्थानी नाही. ज्यामुळे डिसेंबर २०१८ मध्ये त्याचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता सन २०२२ मध्ये राहु आपल्या कुंडलीत गुरुवर प्रतिकूलरित्या जात आहे. परिणामी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लॉप ठरला. तसेच विरोधालाही सामोरे जावे लागले.

आमीर खानच्या कुंडलीत राहुचा प्रभाव खूप प्रतिकूल असल्याने त्याला आर्थिकदृष्ट्याही काही प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर, जानेवारी २०२३ पासून शनी कुंभ राशीत जात आहे. जो सूर्यावरुन जाईल आणि चंद्रापासून आठव्या घरात असेल. त्यामुळे २०२३ ते २०२५ हा काळ आमीर खानसाठी आणखी कठीण असू शकतो, असा दावा केला जात आहे.

अशा प्रतिकूल ग्रहस्थितीत गीतकार शैलेंद्र यांनी तिसरी कसम सिनेमा बनवला होता, त्यामुळे कर्जाचा बोजा खूपच वाढला होता. त्यामुळे पुढील दोन वर्षे आमीर खानसाठी करिअर, कुटुंब आणि आर्थिक स्तरावर फार चांगला नसल्याचे सांगितले जाते आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यातील कुठल्याही दाव्याची पुष्टी करण्यात आलेली नाही.