अंकज्योतिषशास्त्रानुसार 'सप्टेंबर' एकूण सर्वांसाठीच जोमात आहे; कसा ते पहा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:37 PM 2021-09-01T18:37:54+5:30 2021-09-01T18:43:40+5:30
सप्टेंबर महिना सर्वांसाठी उत्साह आणि आनंद घेऊन आला आहे. या महिन्यात ज्योतिषशास्त्रानुसार अनेक बदल होणार आहेत. अनेक मोठे ग्रह राशिपरिवर्तन करणार आहेत. त्याचबरोबर आपण अंकज्योतिषशास्त्राचाही आधार घेऊया. यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची बेरीज करून मूलांक काढायचा आहे. जसे की ०२ असेल तर ० +२ म्हणजे मूलांक २ आणि १२ असेल तर १+२ म्हणजे मूलांक ३. अशाप्रकारे मूलांक काढल्यावर पुढील अंक तुम्हाला मासिक भविष्य सांगतील. मूलांक १ : नवीन संधीचा लाभ घ्या बिघडलेली नाती, कामे किंवा अन्य गोष्टी सुधारण्याची संधी या महिन्यात प्राप्त होणार आहे. नवीन लोकांशी ओळखी झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. ७ ते १९ हा काळ अधिक लाभदायक ठरेल. आरोग्याच्या कुरबुरी दूर होतील. या महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण कथा ऐकणे लाभदायक ठरेल.
मूलांक २ : कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हा मूलांक असलेले जातक अतिशय उत्साहात असतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. जुने वाद, प्रश्न मिटतील. नवीन प्रकल्प आखाल. त्यामुळे जीवनाला नवीन ध्येय प्राप्त होईल. संगणक तसेच विज्ञान संबंधित क्षेत्रातील लोकांना अधिक लाभ होईल.
मूलांक ३ : सगळे प्रयत्न यशस्वी होतील. हा मूलांक असलेल्या व्यक्तींना गुरुबळ मिळाल्यामुळे ज्ञानप्राप्तीचे संकेत आहेत. त्याचबरोबर मंगळ ग्रहाचा पाठिंबा मिळाल्याने तुमच्या बौद्धिक क्षमतेची प्रशंसा होईल. कामाची दखल घेतली जाईल. नवीन ऊर्जा प्राप्त होईल. व्यावसायिकांसाठी १० सप्टेंबर ही तारीख शुभ ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. वैवाहिक जीवनात पूर्ववत प्रेमाचे, खेळीमेळीचे नाते निर्माण होईल.
मूलांक ४ : नोकरी, व्यवसायात अनुकूलता मिळेल. हा महिना तुम्हाला चमत्कारिक वाटू शकतो. कारण तुम्ही जो विचार कराल, तो प्रत्यक्षात येईल. मोठे विचार, प्रकल्प तुमचे कार्यक्षेत्र वाढवेल. त्या कामात तुम्ही स्वत:ला पूर्णवेळ झोकून द्याल. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. थोडे सबुरीने घ्या. उपासना करा आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवा.
मूलांक ५ : नवीन कार्याचा प्रारंभ भावुक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मनाचे नाही तर मेंदूचे ऐका. काही निर्णय वास्तवतेला धरून घेणे उचित ठरेल. नवीन कार्याची सुरूवात आनंदाने होईल. त्यात सातत्य टिकवून ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. देवीची उपासना करा.
मूलांक ६ : मन:स्वास्थ सांभाळा मन शांत असेल तर कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होते. मात्र मनच अस्वस्थ असेल, तर वाणीवर अर्थात बोलण्यावर नियंत्रण राहत नाही. ज्यांचा जिभेचा ताबा सुटतो, ते आपली जवळची नाती गमावून बसतात. ते टाळायचे असेल तर मन:स्वास्थ सांभाळा. यासाठी ध्यानधारणा आणि आवडत्या दैवताची उपासना करा.
मूलांक ७ : फासे तुमच्या बाजूने पडत आहेत, डाव साधा गेले काही दिवस तुमचे अडलेले काम तुमच्या अस्वस्थतेला जबाबदार होते. परंतु १५ सप्टेंबर नंतर स्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. नशीबाचे फासे तुमच्याबाजूने पडणार आहेत. पूर्ण प्रयत्न करा आणि संधीचे सोने करा.
मूलांक ८ : कार्यपूर्ती होईल. या महिन्यात अडलेली अनेक कामे पूर्णत्वाला जातील. नवीन विचारधारा, उत्साह तुमच्या कामांना पूर्णत्वाकडे नेईल. अनावश्यक गोष्टींना महत्त्व देऊ नका अन्यथा हातून मोठी संधी निसटून जाईल. हनुमान चालिसा म्हटल्याने सकारात्मकता वाढेल.
मूलांक ९ : मित्रांबरोबर आनंदात राहाल. ११ सप्टेंबरपर्यंत नेहमीचेच आयुष्य जगत असाल. परंतु १२ सप्टेंबर नंतर कुटुंब तसेच मित्रपरिवाराच्या भेटीगाठींमुळे तुमच्या मरगळलेल्या आयुष्यात आनंदाचे अनेक प्रसंग येतील आणि तुम्ही त्या क्षणांचा पुरेपूर आस्वाद घ्याल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. या महिन्यातील चारही गुरुवारी विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा, सकारात्मकतेत भर पडेल.