स्वप्नशास्त्रानुसार भल्या पहाटे 'ही' स्वप्नं पडली, तर भरघोस धनलाभ होणार हे नक्की! By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:04 PM 2022-06-13T13:04:41+5:30 2022-06-13T13:12:21+5:30
श्रीमंतीची स्वप्नं आपण झोपेतच काय तर जागेपणीही बघत असतो. स्वप्नं प्रत्यक्षात आणणे ही आपली जबाबदारी असते. तेवढी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे स्वप्नं सत्यात उतरतात. पण स्वप्नशास्त्र सांगते, पहाटे पडलेली स्वप्नं खरी होत असली, तरी त्यातील निवडक स्वप्नं तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. ती सूचक स्वप्नं कोणती ते जाणून घेऊया. लहान मुलांचे खळखळून हसणे : जर स्वप्नात एखादे लहान मूल खळखळून हसताना किंवा खेळताना दिसले तर तुमचेही आनंदाने खळखळून हसण्याचे दिवस आले आहेत असे समजा. तसेच हसरी, खेळती मुलं दिसणे तुमची आर्थिक स्थिती प्रबळ होणार असल्याचेही संकेत देतात.
स्वप्नात धान्याचा ढीग दिसणे : स्वप्नात धान्याचा ढीग पाहणे खूप शुभ मानले जाते. हे समृद्धीचे लक्षण आहे. याचा अर्थ आगामी काळ तुमच्यासाठी भरभराटीचा काळ ठरणार आहे. अन्न-धान्य, पैसा, सोने-चांदी यांची उणीव जाणवणार नाही.
पाण्याने भरलेला हंडा दिसणे : स्वप्नात पाण्याचे भरलेला हंडा दिसणे अतिशय शुभ असते. जल है तो जीवन है असे आपण म्हणतो. म्हणजेच पाणी ही जशी मोठी नैसर्गिक संपत्ती आहे, त्याप्रमाणे या संपत्तीने भरलेला घडा आपल्याला ऐहिक सुखांचा घडा भरून देणार असल्याचे ते संकेत असतात.
स्वत:ला स्नान करताना पाहणे: स्वप्नात आपला चेहरा आपल्याला कधी दिसत नाही पण आपला वावर मात्र दिसतो. जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला नदीत स्नान करताना पाहिलंत तर कुठूनतरी अचानक धनप्राप्तीचे होणार असल्याचे लक्षण आहे. अशी स्वप्नं जुनी देणी परत येणार असल्याचे दर्शवतात.
स्वप्नात पूर्वज दिसणे : पूर्वजांचे स्वप्नात दिसणे हे खूप सूचक मानले जाते. विशेषतः तेव्हा, जेव्हा ते तुमच्याशी छान गप्पा मारत असतात, प्रेमाने बोलत असतात, हाक मारत असतात आणि त्या हाकेने तुम्ही जागे होतात. असे स्वप्न पूर्वजांचा आशीर्वाद असल्याचे दर्शवते. त्यांच्या कृपेने आर्थिक स्थिती पालटणार, पैसे मिळणार, नशीब साथ देणार असे ते संकेत असतात.
तुटलेला दात दिसणे : स्वप्नात तुटलेला दात दिसणे हे अचानक लाभाचे लक्षण मानले जाते. जर असे स्वप्न एखाद्या व्यावसायिकाला पडले तर ते त्याला भरपूर नफा देते. त्यामुळे स्वप्नात दात पडलेला पाहिलात तरी प्रत्यक्षात दात दाखवून आनंद व्यक्त करण्याची संधी चालून येणार आहे असे गृहीत धरू शकता!