वास्तुशास्त्रानुसार हनुमंताचे 'या' विशिष्ट मुद्रेतले फोटो वास्तूसाठी ठरतात लाभदायक! By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 07:30 AM 2022-03-05T07:30:00+5:30 2022-03-05T07:30:03+5:30
आपण आपल्या घरात, कार्यालयात किंवा आपल्या पाकिटात काही फोटो ठेवतो. ते फोटो आपल्याला कधी प्रेरणा देतात, तर कधी मनोबल वाढवतात. मात्र, आपल्या वास्तूमध्ये कोणते फोटो लावावेत आणि कोणते लावू नयेत, याबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. अनेकांच्या घरात वास्तूदोष नष्ट व्हावेत, शनि महाराजांची कृपादृष्टी राहावी, तसेच अनिष्ट शक्तींपासून घराचे संरक्षण व्हावे, म्हणून रामभक्त हनुमंताचा फोटो लावला जातो. याबाबत वास्तुशास्त्र काय सांगते, ते जाणून घेऊया. दक्षिणमुखी हनुमान : वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे पाहणाऱ्या हनुमंताचा फोटो लावावा. तो फोटो शेंदुरचर्चित हनुमंताचा असेल, तर उत्तम. दक्षिणमुखी हनुमान यासाठी, कारण दक्षिण दिशेकडून येणारे अरिष्ट दूर करण्याची क्षमता हनुमंताच्या दीव्य दृष्टीत आहे. अरिष्ट टळल्यामुळे आपोआप घरात सुख समृद्धी नांदते. तसेच तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल, तर तोही शेंदूरचर्चित हनुमानाचे रूप पाहून नष्ट होतो आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य लाभते. उत्तरमुखी हनुमान : उत्तर दिशेकडे मुख असलेल्या हनुमंताचा फोटो घरात लावलेला असल्यास, सर्व देवतांची कृपादृष्टी घराला लाभते. कारण, हनुमंताला बालपणापासून सर्व देवांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे शौर्य आणि बल प्राप्त झाले होते.
पंचमुखी हनुमान : पंचमुखी हनुमानाचा फोटो आपल्या उन्नतीच्या वाटा खुल्या करतो. घरात धन संपत्तीची वाढ होते. तसेच संकटांंना घराबाहेर ठेवण्यासाठी, काढण्यासाठी पंचमुखी हनुमंताची मूर्ती किंवा फोटो लावला जातो. तसेच वास्तुदोषावर पर्याय म्हणूनही पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावण्याचा सल्ला वास्तुतज्ञ देतात.
रामदरबार : राम पंचायतनाचा फोटो आपल्या बैठकीच्या खोलीत लावावा. रामासारखा आदर्श संसार आणि हनुमंताची तत्पर सेवा, यांचा आदर्श आपल्याला फोटोतून मिळत राहतो. हनुमंताचे उड्डाण : हनुमंताच्या उड्डाणाचे चित्र किंवा फोटो आपल्याला हर क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने झेप घेण्याचे संकेत देतो. मनाने निश्चय केला, तर संकटांचा डोंगर उचलून बाजूला करण्याची ताकद प्रत्येकात असते, हे दर्शवणारी हनुमंताची प्रतिमा प्रेरणादायी ठरते.
रामभजनात दंग : रामभक्त असावा, तर हनुमंतासारखा. त्यांना जळी, स्थळी केवळ राम आणि रामच दिसत असत. सीतेने दिलेल्या नवरत्न हारातही हनुमंताने राम शोधला आणि तिथे तो दिसला नाही, तेव्हा आपल्या हृदयात असलेला राम सर्वांना दाखवून दिला. अशा साहसी हनुमंताने रावणाच्या लंकेतही जाऊन रामाचे गुणगान गायले. हे धैर्य आपल्यालाही मिळावे आणि हनुमानासारखे रामभजनात दंग राहावे, हे सूचवणारी छबी मोहक आणि दिलासा देणारी ठरते. श्वेत हनुमान : वयोवृद्ध हनुमंताची धीर गंभीर प्रतिमा आपल्याला संपूर्ण आयुष्य अन्यथा वृद्धापकाळ तरी देवाधर्मात घालवावा, असे सुचवते. आयुष्यभर पराक्रम गाजवून वृद्धापकाळात मन आणि डोकं शांत ठेवावे, हादेखील संदेश त्यातून मिळतो.
राम-हनुमान भेट: राम आणि हनुमान भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट. ज्या घरांमध्ये नात्यात तणाव निर्माण झालेले असतात, अशा घरांमध्ये राम हनुमानाची गळाभेट घेतानाची तसबीर लावावी, अशे वास्तूशास्त्रज्ञ सुचवतात. यापैकी कोणताही फोटो आपल्या घरात आपण लावणार असू, तर त्या फोटोंचे पावित्र्यदेखील जपले पाहिजे. तसेच आपल्या शयन मंदिरात म्हणजेच बेडरूममध्ये हनुमंताची प्रतिमा लावू नये. तसेच किचेन म्हणूनही त्याचा वापर करू नये. आपल्या धर्माचे आणि आपल्या संस्कृतीचा मान आपणच राखला पाहिजे.