Adhik Maas 2023 Purnima: वैवाहिक सुख आणि धनप्राप्तीसाठी १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमेला करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 05:29 PM2023-07-31T17:29:40+5:302023-07-31T17:44:24+5:30

Adhik Maas 2023 Purnima: १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने ज्योतिष आणि वास्तुशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. ज्यामुळे केवळ धनप्राप्ती नाही तर वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांही दूर होतील.

१ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमा आहे आणि मंगळवारचा दिवस आहे. पौर्णिमा ही देवीची आवडती तिथी आणि मंगळवार व शुक्रवार हे देवीचे आवडते दिवस आहेत. अशा मुहूर्तावर वैभव प्राप्तीसाठी केलेले उपाय नक्कीच लाभदायक ठरू शकतील.

अधिक श्रावण पौर्णिमेच्या मध्यरात्री तुपाचा दिवा लावून लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. जर तुम्ही मध्यरात्री हे करू शकत नसाल तर तुम्ही रात्री १० ते १२ दरम्यान हे करू शकता. परंतु हे स्तोत्र मध्यरात्री म्हणणे अधिक फायदेशीर असते असे म्हणतात. मात्र आपल्या दैनंदिन जीवनात मध्यरात्री उठून शुचिर्भूत होऊन स्तोत्रपठण करणे शक्य नसल्याने शास्त्राने दिलेल्या सवलतीचा अवलंब करावा.

पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची जन्मतिथी असल्याने तिला ती अधिक प्रिय आहे. म्हणून केवळ कोजागिरी पौर्णिमेलाच नाही तर दर पौर्णिमेला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घरात सुख शांती नांदावी यासाठीही वास्तू शास्त्राने पौर्णिमेला लक्ष्मी पूजा करा असे सांगितले आहे.

ज्या लोकांचे लग्न ठरण्यास विलंब होत आहे किंवा अडथळे येत आहेत, त्यांनी पौर्णिमेला प्राजक्ताची ७ फुले केशरी कपड्यात बांधून लक्ष्मी मातेला अर्पण करावीत. हा उपाय लाभदायक ठरतो.

धन मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ११ नाण्यांवर हळद लावा आणि लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. प्रत्येक पौर्णिमेला शंखांची पूजा करा. तुमच्या घरात धनाचे आगमन अर्थात आवक वेगाने वाढेल.

पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला, तेलाचा दिवा लावा. यथाशक्ती दान धर्म करा. या कारणांनीही लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्या सेवेने तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल.

या सगळ्या गोष्टीला जोड हवी प्रयत्नांची आणि प्रामाणिकतेची. फसवणूक करून, लुबाडून पैसे कमवणाऱ्यांकडे जितक्या वेगाने पैसा येतो तेवढ्याच वेगाने पैसा खर्च होतो. पैसा दीर्घकाळ टिकावा आणि वृद्धिंन्गत होत राहावा यासाठी प्रामाणिकपणे काम करा आणि दिलेले उपाय करून लक्ष्मी मातेला मनापासून शरण जा!