Adipurush: रावण असा तर कुंभकर्ण कसा? आदिपुरुष टिझर वर ट्रोलिंगची झोड उठण्याची ५ मुख्य कारणं जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 11:24 AM2022-10-07T11:24:31+5:302022-10-07T11:31:48+5:30

Adipurush: चित्रपटाचे टिझर म्हणजे शितावरून भाताची परीक्षा! आदिपुरुषचा टिझर लॉन्च झाल्यापासून प्रेक्षकांकडून तो दणाणून आपटला जातोय. एवढी मोठी बिग बजेट फिल्म असूनही टीकेची झोड का उठली असावी? तर त्यामागे असलेली मुख्य कारणं जाणून घेऊ!

रामानंद सागर यांचे रामायण पाहिलेला प्रेक्षक वर्ग श्रीरामाच्या रूपात सिक्स पॅक वाला प्रभाव राम अवतारात पचवू शकला नाही. त्याचे रौद्र रूप पाहता एकवेळ तो रावण म्हणून चालला असता पण राम नाही, असे मत प्रेक्षकांनी नोंदवले आहे.

रावणाच्या रूपात सैफचा कैफ लोकांवर चढण्यात सपशेल अपयशी ठरला! प्रमाणापेक्षा उग्र रूप, पुष्पक विमान सोडून वटवागुळावर केलेली स्वारी आणि सुरमा लावलेला रावण प्रेक्षकांच्या डोळ्यात चांगलाच खुपला!

रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आणि शिवभक्त होता. तो रामापेक्षा दसपटीने बलवान होता. परंतु त्याने आपल्या शक्तीचा केलेला गैरवापर त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला. रावण हा सर्व शास्त्र निपुण असल्यामुळे कपाळावर त्रिपुंडी लावत असे. ओम राऊत यांचा मोकळ्या कपाळाचा रावण असुर कमी आणि भेसूर जास्त दिसतो.

हनुमानाच्या रूपात देवदत्त नागे हा बलवान मराठमोळा अभिनेता बघायला मिळणार म्हणून मराठी प्रेक्षक उत्सुक होता. परंतु मिशा न ठेवता केवळ दाढी असलेला हनुमान बघून प्रेक्षाकांचा पुरता रसभंग झाला.

आदिपुरुष टिझर आल्यापासून राम, सीता, रावण आणि हनुमान यांचे दर्शन घडले आहे. हे असे तर इतर कसे, याचा प्रेक्षकांनी धसका घेतला आहे. चित्रपटावर प्रसिद्धीपूर्व ट्रोलिंगची झोड उठली असून दिग्दर्शकाचा अभ्यास कमी पडला असे प्रेक्षकांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचा किंवा रामायण या ऍनिमेटेड मुव्हीचा तरी आदर्श ठेवायला हवा होता, अशी शेरेबाजी केली जात आहे!

एवढ्या सगळ्या टीकेनंतरही हे आधुनिक रामायण प्रेक्षकांच्या गळी उतरणार की प्रेक्षक त्यावरही बॉयकॉट लावून बहीष्कार टाकणार, हे वर बसलेल्या श्रीरामालाच माहीत! तोवर जय श्रीराम!