३० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ काळ: ‘या’ ४ राशींना वरदान, शेअर बाजारातून फायदा; अपार लाभ-पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:09 PM2023-02-14T14:09:27+5:302023-02-14T14:18:24+5:30

आगामी काळात जुळून येत असलेल्या राजयोगांचा कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्यामुळे अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग, राजयोग तयार होत असतात. या योगांचा प्रभाव सर्व राशींसह देश-दुनियेवर पडत असतो, असे सांगितले जाते. काही राशींना हा काळ चांगला ठरतो, तर काही राशींना संमिश्र ठरतो.

जेव्हा मोठे ग्रह जसे शनी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र जेव्हा आपले स्थान बदलतात आणि अन्य ग्रहांसह युती योग जुळून येतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक दिसून येतो. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच १७ जानेवारीला ३० वर्षातील शनीचे सर्वांत मोठे गोचर झाले. शनीने आपले स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन ही शुक्र ग्रहाची उच्च रास आहे. या राशीत शुक्र सर्वोच्च फळे देऊ शकतो, असे म्हटले जाते. यावेळी जुळून येत असलेल्या राजयोगांमुळे ४ राशींना भाग्योदयाचे योग आहेत.

या ४ राशीच्या व्यक्तींच्या गोचर कुंडलीत राजयोग तयार होत असून, यामुळे आगामी काळात धनलाभाची संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी-शुक्र ग्रहाचा राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. केंद्र त्रिकोण राजयोग तसेच शश महापुरुष राजयोग जुळून येत आहे. आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रगतीचे व पगारवाढीचे योग आहेत. जुन्या शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत. या काळात नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना उत्तम संधी मिळू शकतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालव्य राजयोग आणि हंस महापुरुष राजयोग जुळून येत आहे. शुक्र उच्च स्थानी असल्याने व्यवसायात धनलाभाची संधी आहे. प्रवासाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहावे लागू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर येत्या काळात यशप्राप्तीचे योग आहेत. आपण सुरु केलेल्या प्रत्येक कामात यशाची संधी आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना प्रगतीचे व धनलाभाचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळू शकते. मालव्य राजयोगाने प्रगतीसाठी मोठी पाऊले उचलता येतील. हंस राजयोगाने गुंतवणुकीतून लाभाची संधी आहे. व्यवसायात एखादी मोठी डील पूर्ण होऊ शकते. तुम्हाला नवीन ग्राहक व मिळकतीचे स्रोत लाभू शकतात.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ वरदान सिद्ध होऊ शकतो. शनिदेव आपल्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. शनीची दृष्टी आपल्या राशीतील धनस्थानी असणार आहे. यामुळे नोकरदार मंडळींना पगारवाढ लाभण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. कामात इच्छापूर्ती होऊ शकते.

पिता-पुत्र मानले गेलेले सूर्य आणि शनी कुंभ राशीत विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रह शत्रू ग्रह मानले जातात. तसेच शुक्राच्या मीन प्रवेशानंतर गुरु आणि शुक्र या ग्रहांची युती होणार आहे. हे दोन्ही ग्रहही शत्रू ग्रह मानले गेले आहेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.