३० वर्षांनी शनी स्वगृही: ३ राशीच्या साडेसातीत मोठा बदल, ‘या’ राशीची मुक्तता; कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 06:51 AM2023-01-18T06:51:06+5:302023-01-18T06:51:06+5:30

कुंभ प्रवेशानंतर साडेसातीचे चक्र पूर्णपणे बदलणार असून, शनीचा प्रभाव यापुढे कसा असेल? ते जाणून घ्या...

सन २०२३ या वर्षाची सुरुवात अगदी उत्साहात आणि आनंदात झाली. नवीन वर्षाचा पहिला जानेवारी महिना ज्योतिषीय दृष्टिने महत्त्वाचा आणि विशेष ठरत आहे. १७ जानेवारी रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान झाला आहे. कुंभ राशीत सुमारे अडीच वर्ष शनी विराजमान असेल, त्यानंतर शनी गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. (saturn transit in aquarius 2023)

शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाने साडेसातीचे चक्र बदलले. धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपुष्टात येत आहे आणि मीन राशीची साडेसाती सुरू होत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे. शनी कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. (shani gochar in kumbha rashi 2023)

तसेच शनीच्या कुंभ प्रवेशाने मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढिय्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होईल. शनी हा क्रूर ग्रह असला तरी कर्मकारक आहे. जसे ज्याचे कर्म, तशी फळे त्या त्या व्यक्तीला मिळतात, अशी मान्यता आहे. (sade sati 2023)

शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान झाल्यावर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल आणि मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा प्रारंभ होईल. शनी साडेसाती तीन टप्प्यांत असते. यापैकी दुसरा टप्पा हा सर्वांत त्रासाचा, कष्टकारी आणि वेदनादायक मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, शनीची दृष्टी शुभ असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळते. शनी ग्रहाला कर्माचे फळ देणारा आणि न्यायाधीश मानला जातो. शनी न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्याबद्दल असा समज निर्माण झाला आहे की, शनी हा दु:ख, कष्ट देणारा ग्रह आहे. सत्य हे आहे की, शनी देव वय, तांत्रिक क्षमता, समजून घेण्याची क्षमता देणारा ग्रह आहे. घरातील लोकांमध्ये आनंद आणण्याचे कामही शनी करतात.

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला गेला आहे. शुक्राच्या तूळ राशीमध्ये शनी उच्च आहे आणि जेव्हा तो मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दुर्बल म्हणजेच नीच होतो. याशिवाय २७ नक्षत्रांपैकी पुष्य, अनुराधा आणि उत्तराभाद्रपद या तीन नक्षत्रांचा स्वामी शनी आहे.

ज्या व्यक्तीवर शनीचा शुभ प्रभाव असतो, ती व्यक्ती मेहनती, कर्मठ आणि न्यायी असते. शनीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळते आणि त्याच्या यशाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाचे वर्णन निळा आणि श्यामला असे केले आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर शनी लग्न स्थानी असेल तर योग्य मानला जात नाही. लग्न स्थानी शनी असेल तर व्यक्ती पुण्यवान असेल पण कामात खूप धीमी असेल. असे लोक स्वतःमध्येच अडकून राहतात आणि त्यांच्यात मोठ्या स्तरावर विचार करण्याची क्षमता कमी असते.

पौराणिक कथेनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र मानले गेले असले तरी ते शत्रू ग्रह असल्याचे सांगितले जाते. मकर संक्रांतीला सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्य आणि शनी एका राशीत विराजमान होते. यानंतर आता महिनाभराने सूर्य कुंभ राशीत गेल्यावर पुन्हा एकदा सूर्य आणि शनी काही काळासाठी एका राशीत असणार आहेत. सूर्य आणि शनीचा संयोग शुभ मानला जात नाही.

भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शनिदेवाचे गुण पाहून महादेवांनी त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीशाचे स्थान दिले. शनीच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, त्याचे वडील सूर्य आणि आई छाया, भाऊ यमराज असून, शनीला सुवर्चला, यमुना आणि भद्रा या तीन बहिणीही आहेत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

२९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे सांगितले जाते.

सुमारे ३० वर्षांनी शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीतून स्वगृही म्हणजेच कुंभ या स्वराशीत विराजमान होत आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.