Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी आवाक्याबाहेर? 'या' पाच वस्तू भरून काढतील सगळी कसर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:19 IST2025-04-19T13:02:24+5:302025-04-19T13:19:06+5:30

Akshaya Tritiya 2025: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केली असता धन संपत्तीचा क्षय होत नाही, अशी भावना असते. मात्र सोन्याचे वधारलेले भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. अशा वेळी पर्यायी कोणत्या वस्तू घ्याव्यात, जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा राहील आणि वास्तू मध्ये धन-संपत्तीही राहील!

यंदा अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) बुधवार, ३० एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने खरेदी करता आली नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. त्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाच स्वस्त पण धन समृद्धीचे प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तू घरी आणा.

अक्षय्य तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग आहे. अशा परिस्थितीत ज्या वस्तूची खरेदी कराल ती वृद्धिंगत होत जाईल अर्थात वाढत जाईल असे शास्त्र सांगते. म्हणून लोक सोन्याची खरेदी करतात. मात्र तुम्हाला सोने खरेदी जमली नाही तरी पुढील वस्तू विकत आणा वा दान करा, तुमच्या धन संपत्तीत भरच पडेल.

अक्षय्य तृतीयेला माती खरेदी करणे हे सोने खरेदी करण्याइतकेच महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी फुलझाडांच्या कुंडीसाठी माती किंवा एखादे मातीचे भांडे, माठ किंवा दिवासुद्धा खरेदी करू शकता. मातीशी आपले नाते आहे. जन्माला येतो ती माता आणि शेवट जिथे होतो ती माती...शिवाय आपले अन्न धान्य सुद्धा मातीत उगवते. त्यामुळे मातीशी जुळलेली नाळ तुटू शकत नाही. म्हणून अशा मुहूर्तावर केलेले मातीचे पूजन अथवा दान लाभदायी ठरते.

शुभं करोति श्लोकात वर्णन आहे, तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेवो माध्याह्न रात...अर्थात तिळाचे तेल, कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे. आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशात मिळत असला, तरी शेतकऱ्याला त्यासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात आणि जेव्हा कपाशी अर्थात कापूस येतो तो विकून शेतकरी धनवान होतो. म्हणून या दिवशीच्या शुभ मुर्हूर्तावर श्रीमंती आपल्याही वाट्याला यावी म्हणून कापसाची खरेदी करा सांगितले आहे.

पिवळी मोहरी अर्थात राई याला सोन्याचा दर्जा दिला आहे. कारण यापासून बनणारे तेल अत्यंत गुणकारी मानले जाते. आणि आरोग्याला श्रीमंती म्हटले जाते. उत्तम आरोग्य मिळावे म्हणून या दिवशी पिवळी मोहरी अथवा पिवळ्या मोहरीचे तेल खरेदी करा आणि त्याचा वापर करून निरोगी शरीर मिळवा असे सांगितले आहे.

अक्षय्य तृतीयेला भांडी खरेदी केली जाते. या दिवशी तांब्या-पितळ्याची भांडी खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती वाढते. त्याबरोबरच देवीची आवडती कवड्यांची माळ खरेदी करून तिची पूजा करून तिजोरीत ठेवली तर उत्पन्नात वाढ होते असे ज्योतिष शास्त्र सांगते.

अक्षय्य तृतीयेला खडे मीठ अथवा जाड मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते. खडे मीठ समुद्रातून मिळते. समुद्र मंथनातून लक्ष्मी पाठोपाठ मीठ बाहेर आले होते म्हणून लक्ष्मी ही समुद्र कन्या आणि तिच्या पाठीवर आलेले मीठ तिचा भाऊ मानला जातो. म्हणून आपण मीठ सांडले तरी क्षमा मागतो. जपून वापरतो. मीठात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. म्हणून लादी पुसताना पाण्यात खडे मीठ टाका असे वास्तू तज्ज्ञ सांगतात. असे मीठ अक्षय्य तृतीयेला आणून पुजले असता धनलाभ होतो आणि आर्थिक वृद्धी होते.