राहु कृपेमुळे व्हाल मालामाल! कुंडलीत ‘या’ ५ ग्रहांसोबत युती ठरते वरदान; राजयोग अन् लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:34 AM2022-07-20T10:34:54+5:302022-07-20T10:45:37+5:30

राहु हा पाप, क्रूर ग्रह मानला गेला असला, तरी कुंडलीतील स्थाने आणि काही ग्रहांशी युती यांमुळे एखादी व्यक्ती धनवान बनू शकते. जाणून घ्या...

आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील प्रत्येक ग्रहाचे महत्त्व वेगवेगळे आहे. परंतु, यापैकी राहु आणि केतु हे छाया ग्रह मानले गेले असले, तरी त्यांचा प्रभाव, त्यांचे कुंडलीतील स्थान विशेष ठरू शकते, असे सांगितले जाते. (Rahu In Kundali)

राहु आणि केतु कायम वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. आताच्या घडीला राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत आणि केतु शुक्राचे स्वामित्व तूळ राशीत विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह कायम एकमेकांपासून सप्तम स्थानी असतात. यालाच समसप्तम योग म्हटले जाते. (Rahu Conjunction Auspicious)

राहु ज्योतिषशास्त्रात अशुभ ग्रह मानला जातो. त्याचे नकारात्मक पैलू बघितले तर राग, वाईट संगत, धूर्तपणा, क्रूरता, लोभ, अपशब्द इत्यादी घटक आहेत. असे असूनही, सर्वांच्या कुंडलीत राहु वाईट परिणाम देत नाही. राहु व्यक्तीला रहस्यमय, गुप्त, साहसी, धाडसी बनवतो. कुंडलीत राहुची शुभ दशा असते तेव्हा प्रत्यंतर दशातील स्थिती शुभ असते, ती रंकाचा राजा बनू शकतो, असे सांगितले जाते.

ज्या लोकांच्या कुंडलीत राहु ग्रह तृतीय, पाचव्या, सहाव्या, नवव्या भावात पूर्ण दृष्टी घेऊन पाहतो, त्यांना जीवनात अनेक चांगले परिणाम मिळतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

तिसऱ्या स्थानी असलेला राहु एखाद्या व्यक्तीला पराक्रमी बनण्याची आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याची क्षमता देतो. असे लोक कोणतेही काम करण्यास घाबरत नाहीत. ज्यातून त्यांना फायदा होतो, त्यांना लगेच त्या वस्तूची, परिस्थितीची जाणीव होते. तथापि, अशा लोकांना मुलाबद्दल काही चिंता सतावू शकतात.

पंचम स्थानातील राहु एखाद्या व्यक्तीला भरपूर श्रीमंतीकडे नेऊ शकतो. ते इतके कुशल होतात की, ते त्यांचे काम शत्रूंकडूनही करून घेऊ शकतात. राहु हा पापी ग्रह मानला जातो, परंतु पंचम भावावर पूर्ण दृष्टी असल्यामुळे व्यक्तीला संतती सुख मिळते.

षष्ठम स्थानी राहुच्या शुभ दृष्टीमुळे व्यक्ती शत्रूंचा नाश करणारा आणि पराक्रमी बनतो. असे लोक मित्र आणि शत्रू सहज ओळखू शकतात. मात्र, अशा लोकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे सांगितले जाते.

नवव्या स्थानातील राहु एखाद्या व्यक्तीला ऐश्वर्यवान बनवतो. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते. यासोबतच त्यांना मुलाकडूनही आनंद मिळतो.

राहु आणि बुधची युती शुभ मानली गेली आहे. बुध ग्रह तर्क क्षमता, वाणी आणि बुद्धीचा कारक मानला जातो. बुधाची तर्कशक्ती राहुच्या रहस्यमय स्वभावाशी एकरुप होते, तेव्हा एक विद्वान व्यक्तिमत्व उदयास येते. तसेच यासोबतच राहु बुधाच्या नक्षत्रात असला, तरी व्यक्ती बुद्धिमत्तेने परिपूर्ण असतो. अशा लोकांना न बोलताही गोष्टी समजतात. यांना तांत्रिक क्षेत्रात भरपूर यश मिळते. या व्यक्ती आपल्या बोलण्याच्या जोरावर समाजात आपला प्रभाव सोडतात, असे मानले जाते.

वास्तविक पाहता राहु आणि गुरु युतीला चांडाळ योग म्हटले जाते. मात्र, हा योग कायमच प्रतिकूल असतो, असे नाही. ज्ञान आणि आध्यात्मिक शक्तींचा कारक असलेल्या गुरुची कुंडलीत स्थिती चांगली असेल, राहु आणि गुरुचा संयोग असेल किंवा राहू गुरुच्या नक्षत्रात स्थित असेल तर तो उत्तम संयोग मानला जातो.

या संयोगाने व्यक्तीला आध्यात्मिक मार्गात यश मिळते. यासोबतच राजकारणाच्या क्षेत्रातही असे लोक इतर लोकांपेक्षा चांगले काम करतात. गुरूच्या प्रभावामुळे असे लोकही चांगले शिक्षक बनतात. राहू-गुरूचा संयोगही माणसाला वैराग्यकडे घेऊन जातो.

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र शुभ असेल आणि राहु युतीत असेल, तर असे लोक कलेच्या क्षेत्रात चमत्कार करतात. कला कोणत्याही क्षेत्रात अशी माणसे असली तरी ते त्यांच्या विविध कलात्मक क्षमतेसाठी ओळखले जातात. अशा लोकांची उंची, दिसणे काहीही असले तरी त्यांना लोक आकर्षक वाटतात.

ज्योतिष शास्त्रानुसार, राहु ग्रह हा सूर्य किंवा चंद्रासोबत असतो, तेव्हा ग्रहण दोष निर्माण होतो. परंतु जेव्हा कुंडलीत सूर्य किंवा चंद्र लाभदायक असतो आणि राहु युतीत असतो किंवा या दोन ग्रहांच्या नक्षत्रात बसतो तेव्हा त्या व्यक्तीला शुभ परिणाम प्राप्त होतात.

राहुची सूर्याशी युती झाल्यामुळे व्यक्तीला सर्व सुख-सुविधा मिळतात. असे लोक चांगल्या सरकारी पदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात. दुसरीकडे, चंद्रासोबत राहूचा संयोग एखाद्या व्यक्तीला चांगला व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय करणारा बनवतो.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या कुंडलीत राहु कोणत्या स्थानी आहे, त्याचे नेमके काय प्रभाव, परिणाम तुम्हाला होऊ शकतात, यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अतिशय उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.