Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलप्रिय तुळशीबरोबर आषाढी एकादशीला लावा, वास्तूची भरभराट करणारी 'ही' रोपे! By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 01:49 PM 2023-06-27T13:49:26+5:30 2023-06-27T13:54:53+5:30
Ashadhi Ekadashi 2023: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गात जाणे शक्य होत नसेल, तर निसर्ग घरात आणणे हाच त्यावर उपाय ठरतो. केवळ बागेत नाहीत, तर घरात देखील छोटी छोटी रोपटी लावली, तर त्यांना पाहून मन शांत आणि प्रसन्न राहते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. अशातच विठ्ठलप्रिय तुळशीसह आषाढीच्या मुहूर्तावर घरात कोणकोणती रोपे लावणे फायदेशीर ठरू शकेल ते पाहूया. तुळस : ज्या घरात, दारात तुळशीचे रोप फोफावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग, रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जोतो, तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो. रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगाजलाइतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. म्हणून इतर कोणतेही रोप असो वा नसो, घरात किंवा दारात तुळस हवीच. तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसे पाणी लागते. थोडीफार मशागत केली की तुळस छान वाढते.
मनी प्लांट : वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाण खान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते. तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागले. डोळ्यांना आल्हाददायक वाटते. त्याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. घरात बाहेर कुठेही ठेवू शकता मोठी कुंडीच हवी असे नाही. छोट्या बरणीत, बाटलीतही ते आकार घेते.
नागवेलीचे पान : नागवेलीचे पान अर्थात विड्याचे पान. त्याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. सुपारी, चुना, कात, हिरवी पत्ती घालून केलेला विडा, दोन्ही जेवणानंतर खावा. हा उत्तम बलवर्धक आहे. परंतु त्याचे अति सेवन वाईट! ही पाने उष्ण असल्याने सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी असतात. त्याची वेल फार सुंदर दिसते. या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही. घरातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचे रोप लावावे. वेलीला काठीचा आधार देत राहावा. बाकी फार मशागत करावी लागत नाही. त्याची वाढ भरभर होते. ते जितक्या वेळा खुडले जाते तेवढ्या वेळा ते जास्त वाढते.
पारिजात : पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. याचा गंध जेवढ्या दूर पसरतो, तेवढा परिसर सुगंधाने व्यापलेला असतो. तिथले वातावरण प्रसन्न राहते. साध्या मातीत पण ते पटकन रुजते. परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. मग टपोऱ्या सुगंधी फुलांची बरसात व्हायला वेळ लागत नाही.
केळ्याचे रोप : तुमच्या घराला मोठी बाल्कनी असेल तर घरच्या घरीच केळ्याचे रोप लावू शकता. तसे शक्य नसेल, तर आपल्या इमारतीच्या आवारात आवर्जून केळ्याचे रोप लावा. ते अतिशय आल्हाद दायक दिसते. ते लवकर रुजते. केळीच्या पानाचा वापर सर्वांना करता येतो. हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला, आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते. या रोपाला किंवा झाडाला सुरुवातीचे चार महिने थोडे जास्त लक्ष घालावे लागते. मशागत करावी लागते. पण नंतर मूळ धरल्यावर ते छान वाढते.
हळदीचे रोप : हिरवेगार हळदीचे रोप घरातील हवा शुद्ध ठेवते. आपल्याला त्याच्या फुला पानांचा वापर करता येतो. थोडीफार जमीन असेल तर हळदीचे उत्पन्नही घेता येते. परंतु आपला उद्देश तो नसेल, तरीही हळदीची मोठी हिरवी पाने आणि फुले डोळ्यांना तजेला देतात. भरघोस वाढणारे हे रोपटे घराचा कोणताही कोपरा सहज आकर्षित बनवते.
गोकर्ण : गायीच्या कानासारखी दिसणारी फुले तिला गोकर्ण असे म्हणतात. ती वेलीवर उगवतात. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात. बीज पेरले तरी ते सहज रुजते आणि काही काळातच सुंदर फुलांनी आणि हिरव्यागार वेलीने रोपटे बहरून जाते. हिवाळा वगळता उर्वरित दोन्ही ऋतूमध्ये भरपूर फुलं येतात. देवपूजेतही रोज या फुलांचा वापर होतो.