Astro Tips: घरगुती मसाल्याच्या डब्यातल्या 'या' तीन वस्तू पाकिटात ठेवा आणि धनवृद्धीचा अनुभव घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 07:00 AM 2023-07-11T07:00:00+5:30 2023-07-11T07:00:07+5:30
Astrology Tips: ज्योतिष शास्त्रात दैनंदिन समस्येवर उपाय म्हणून अनेक तोडगे दिले आहेत. हे तोडगे आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ देतात आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवतात. अर्थात हे उपाय त्यांनाच फळतात जे कष्टाचीदेखील तयारी दाखवतात. कारण कष्टाशिवाय कोणतेही फळ मिळत नाही. त्यामुळे आधी स्वतःवर आत्मविश्वास हवा आणि मग त्याला ज्योतिष किंवा अन्य शास्त्रात दिलेल्या उपायांचा आधार हवा. वाढत्या महागाईत आर्थिक अडचणीमुळे अनेकांवर घरखर्चाचा, मुलांच्या शिक्षणाचा, घरभाडे, कर इत्यादी गोष्टींचा बोजा पडतो. कितीही कमवले तरी पैसे पुरत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. अशा वेळी लोक नशिबावर हवाला टाकून मोकळे होतात. त्यांना आधार देताना ज्योतिष शास्त्र सांगते, तुम्ही करत असलेले प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू ठेवा आणि ग्रहदशांचे पाठबळ मिळावे म्हणून उपायांची जोड द्या.
ज्योतिष शास्त्राने उपाय दिले आणि श्रीमंत झालो असे होत नाही, 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' असे म्हटल्यासारखे होईल. अशा व्यक्तीला देव आणि दैव कोणाचीही साथ लाभत नाही. हे लक्षात घेऊन कष्टाची तयारी ठेवा आणि पुढील उपाय करा.
आर्थिक अडचणी सुटत नसतील तर धनवृद्धी होईपर्यंत आपल्या पाकिटात एक लवंग, दालचिनी आणि तमाल पत्र ठेवावे. या तिन्ही पदार्थांचे औषधी गुणधर्म तर आहेच, शिवाय भाग्यबदल करण्यासही ते उपयुक्त ठरतात.
तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी न विसरता श्रीसूक्त पठण करावे. हे दोन्ही दिवस लक्ष्मी मातेचे असल्याने या दिवशी तिची मनोभावे केलेली पूजा लवकरच फलद्रुप होते. सकाळी स्नान करून देवीची पूजा करावी आणि श्रीसूक्त म्हणावे. मासिक धर्मात ही उपासना करू नये.
शुक्रवारी कुंकुमार्चन केले असताही लक्ष्मी मातेचा कृपाशिर्वाद लाभतो. यासाठी शुक्रवारी सायंकाळी शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची किंवा श्रीयंत्राची पूजा करावी आणि चिमटी चिमटीने कुंकू अर्पण करत श्रीसूक्त, देवीसूक्त किंवा आपल्याला पाठ असलेला देवीचा श्लोक म्हणत १०८ वेळा कुंकू अर्पण करावे.