Astro Tips: शपथ घेताना विचार करा, अन्यथा विष्णुपुराणात दिलेले त्रास भोगायला तयार राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:45 PM2024-06-25T13:45:06+5:302024-06-25T13:48:52+5:30

Astrology: 'तुला माझी शपथ आहे'...'आधी शपथ सुटली म्हण' हा भावनिक संवाद लहापणापासून आपल्या कानावर पडला आहे. काही जण निर्दयीपणे म्हणतात, 'मी शपथ वगैरे मानत नाही, मी मला हवं तेच करणार!' अशा वेळी प्रश्न पडतो, की शपथ देणे आणि शपथ तोडणे यामुळे खरोखरीच कोणाचे नुकसान होते का? विष्णुपुराणात त्याचे उत्तर सापडते, चला जाणून घेऊ.

जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा भावनिक विवश होऊन आपण समोरच्याला त्याच्या प्रिय व्यक्तीची शपथ घालतो. ती थपथ मोडली असता, संबंधित व्यक्तीला त्रास होऊ शकतो, जीवाला धोका होऊ शकतो, अशी त्यामागची काळजी असते. म्हणून एक पाऊल मागे घेऊन आपण दिलेल्या शपथेचा आदर बाळगतो.

विष्णुपुराणात स्पष्टपणे लिहिले आहे, की शपथ घेतली तर ती पूर्ण पणे निभावून न्या. अन्यथा शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या आणि ज्याची शपथ घेतली त्या व्यक्तीच्या आयुष्यात आज ना उद्या अनेक प्रकारची अनाहूत संकटं येतात. त्या संकटांचे कारण सापडत नाही, पण त्यामागे कधी काळी न पूर्ण केलेली शपथ जबाबदार असते, हे लक्षात ठेवा.

विष्णुपुराणानुसार घेतलेली शपथ पूर्ण केली नाही तर पुढील प्रकारे त्रास होऊ शकतो. हा त्रास शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. हा त्रास दीर्घकाळ पुरु शकतो. तसेच अशा प्रकारच्या त्रासात तुम्ही आजवर कमावलेले पैसे, मानमरातब, आरोग्य, कुटुंब यांची हेळसांड होण्याचा अधिक संभव असतो.

सुखासुखी चाललेले कुटुंब अचानक दृष्टावते आणि कुटुंबातील सदस्यांपैकी कोणावरही एखादे संकट ओढावू शकते. एक संकट थांबले नाही की दुसरे येऊन उभे ठाकते. संघर्षाचा दीर्घकाळ त्रास होऊ शकतो. अशा वेळी भूतकाळात आपल्याकडून कोणाला दिलेला शब्द पाळला गेला नसेल, वचनपूर्ती झाली नसेल, तर ते आठवून पहा आणि तो शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

अनेकदा असे घडते की यश तोंडापर्यंत येते पण चाखता येत नाही. संधी हुकते. आनंदाने सुरु असलेल्या समारंभात कोणाच्या कृतीने विरजण पडते आणि आनंदाचे दुःखात रूपांतर होते.

आजारपणात मनुष्याला सर्वात जास्त शारीरिक, मानसिक थकवा येतो आणि आर्थिक गणितं बिघडतात तो भाग वेगळा. विष्णू पुराणानुसार शपथ मोडणाऱ्या व्यक्तीला आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागते. अशावेळी ती व्यक्ती हतबल होते. तसेच आरोग्य बिघडण्याची समस्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भेडसावू शकते.

विष्णू पुराण सांगते, जर तुम्ही तुमचा शब्द पाळत नसाल तर तुमच्या कामाच्या बाबतीत इतर लोकही शब्द पाळणार नाहीत. तुमचे काम अर्धवट राहील आणि अपयश व अडथळ्यांनी तुमची प्रगती थांबेल. त्यामुळे शपथ घेणाऱ्या आणि जिची घेतली आहे त्या व्यक्तीला त्रास होऊ द्यायचा नसेल तर घेतलेली शपथ पूर्ण करा किंवा घेण्याची चूकच करू नका.