Gautam Adani Horoscope: कालसर्प, गजकेसरी योगाने तारले; पण साडेसातीने मारले? गौतम अदानींचे पुढे काय होणार? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:14 AM 2023-01-31T11:14:32+5:30 2023-01-31T11:23:20+5:30
Gautam Adani Horoscope: गौतम अदानींची कुंडली काय सांगते? पुढे किती काळ अदानी समूहाला आव्हानांचा सामना करावा लागू शकेल? साडेसाती तारणार का? जाणून घेऊया... Gautam Adani Horoscope: अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने कथित गैरव्यवहारांबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानींना या अहवालामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी सातव्या क्रमांकावर गेले आहेत. हिंडेनबर्ग अहवालाला अदानी समूहाने ४१३ पानांचे प्रत्युत्तर पाठवले आहे.
अदानी समूह आणि गौतम अदानी यांच्यासाठी आगामी काळ कसा असणार आहे, अचानक गौतम अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लागण्याचे कारण काय, गौतम अदानींच्या कुंडलीतील राजयोग, सुरु असलेला साडेसातीचा काळ आणि कालसर्प योगाचा अदानींवर कसा प्रभाव असेल? अदानी समूह यातून कधी बाहेर पडू शकेल? जाणून घ्या, गौतम अदानींची कुंडली नेमके काय सांगते...
गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. गौतम अदानी यांची रास कुंभ असून, आताच्या घडीला गौतम अदानी यांचे साडेसाती सुरू आहे. १७ जानेवारी रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे गौतम अदानींच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. गौतम अदानींची लग्न रास वृषभ आहे.
गौतम अदानी यांच्या जन्मकुंडलीत दशमेश (कर्म) आणि नवमेश भाग्यस्थानात असून, भाग्येश शनीची पराक्रम स्थानात म्हणजेच कुंडलीच्या तिसऱ्या स्थानात असलेल्या शुक्रावर दृष्टी पडत आहे. त्यामुळे एक जबरदस्त राजयोग तयार होत आहे. यासोबतच दशम भावात गुरु आणि चंद्र यांच्या युतीचा शुभ मानला गेलेला गजकेसरी योग तयार होत आहे. याशिवाय गौतम अदानी यांच्या कुंडलीत कालसर्प योग तयार होत असल्याचे सांगितले जात आहे.
सन १९९० च्या दशकात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांच्या वेळी गौतम अदानी यांची कुंडलीत बुधची १६ वर्षांच्या विंशोत्तरी दशा सुरू झाली. यामुळे अदानी समूहाने पोलाद, ऊर्जा, यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केला. खाणी, रेल्वे, बंदर इत्यादींमध्येही बरीच प्रगती केली. अदानीच्या नवांश आणि दशमांश कुंडलीमध्ये बुध दशम भावात एक उत्तम राजयोग निर्माण करत आहे.
सन २०१४ मध्ये गौतम अदानी २.८० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६०९ व्या स्थानावर होते. पण गेल्या ८ वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत ४९ पटीने वाढ झाली. गौतम अदानी अलीकडेच जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यानंतर एक पायरी वर जात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. शनीच्या शुभ योगामुळे गौतम अदानी यशोशिखरावर पोहोचले, त्याच शनीच्या साडेसातीमुळे गौतम अदानी यांना आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबर २०१४ पासून गौतम अदानी यांच्या कुंडलीमध्ये शुक्राची महादशा सुरू झाली आहे. या महादशेत गौतम अदानी सातत्याने प्रगतीपथावर राहिले. मात्र, शुक्रासह सहाव्या स्थानाचा स्वामी राहु युतीत आहे तसेच त्यांवर शनी आणि मंगळाची दृष्टी असल्याचे सांगितले जात आहे.
गौतम अदानी यांच्या नवांश कुंडलीत शुक्र ग्रह मंगळ आणि राहुशी युतीत असल्यामुळे भविष्यात त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जून २०२३ पर्यंत गौतम अदानी यांच्या कुंडलीत शुक्र-राहू-शनीची दशा सुरू आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे.
जून महिन्यानंतर शुक्र-राहू-बुध युतीने गौतम अदानी यांना काही काळ दिलासा मिळू शकेल. मात्र, २०२४-२५ या वर्षांत न्यायालयीन खटल्यांचा ससेमिरा, आर्थिक अनियमितेच्या चौकशीच्या फेऱ्यात गौतम अदानी अडकू शकतात. तसेच आरोग्याच्या कारणांमुळे काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते. आगामी काळात जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांच्या स्थान आणखी घसरू शकते, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.