४ ग्रहांचे गोचर: मे महिना करणार मालामाल, ‘या’ ४ राशींना लाभ; नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:50 PM2023-04-29T12:50:03+5:302023-04-29T12:58:39+5:30

मे महिन्यात ४ ग्रहांच्या होत असलेल्या गोचराचा कोणत्या राशींना चांगला लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे? जाणून घ्या...

एप्रिल महिना अनेकार्थाने महत्त्वाचा ठरला. बुध, सूर्य, गुरु, शुक्र यांच्या राशीपरिवर्तनामुळे अनेकविध योग, राजयोग जुळून आले. मेष राशीत पंचग्रही योग जुळून आला. यातच आता मे महिना सुरु होत आहे. मे महिन्यात नवग्रहांपैकी ४ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.

मे महिन्यात सन २०२३ मधील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. बुद्धपौर्णिमेला लागणारे हे चंद्रग्रहण छायाकल्प स्वरुपातील असणार आहे. शुक्र स्वराशीतून म्हणजेच वृषभ राशीतून मिथुन राशीत ०२ मे रोजी प्रवेश करणार आहे. तसेच नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ मिथुन राशीतून १० मे रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजा सूर्य म्हणजेच रवि १५ मे रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल.

विशेष म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस ३० मे रोजी शुक्र पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करून मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय वक्री आणि अस्तंगत स्थितीत असलेला बुध मे महिन्यात मार्गी आणि उदय होणार आहे. या एकूणच ग्रहस्थितीचा ४ राशीच्या व्यक्तींना शुभ-लाभ होऊ शकेल. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक आघाडीवर तुमच्यासाठी कसा असेल हा आगामी मे महिना, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामात खूप व्यस्त असाल. प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न कराल. नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. जवळच्या मित्रांसह कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळू शकेल. प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवू शकाल. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळू शकेल. व्यवसाय पुढे नेण्याची किंवा काही फायदेशीर योजनेत पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतील. बढती होऊ शकते. पैशाशी संबंधित जोखीम घेणे टाळा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना मनोकामना पूर्ण करणारा ठरू शकेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांवर वर्चस्व राखून सर्वोत्तम देऊ शकाल. आदर वाढेल. गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. व्यवसायात अपेक्षित प्रगती होऊ शकेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना सहकार्य मिळू शकेल. जमीन व मालमत्ता खरेदी-विक्रीतून लाभ होईल. व्यवसायात नफा होऊ शकेल. संचित संपत्ती वाढू शकेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळतील. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत बनतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा कष्टकारी ठरू शकेल. कामाचा ताण वाढू शकतो. जवळच्या मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही. पूर्वी गुंतवलेल्या पैशातून लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संयम ठेवावा लागू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना यशकारक ठरू शकेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे उचित ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा तसेच हितचिंतकांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखू शकाल. जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होऊ शकतो. काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक तसेच कार्यक्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणखी काही काळ संयम ठेवावा लागू शकेल. भावनिक होऊन तसेच रागाने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. भागीदारीत असलेल्यांनी गोष्टी स्पष्टपणे मांडणे हिताचे ठरू शकेल. जमीन, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार यशस्वी ठरू शकतील. मात्र, कोणत्याही कागदांवर सही करण्यापूर्वी खात्री करून तपासून घ्यावेत. भावंडांचे सहकार्य मिळू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना चांगल्या संधींचा ठरू शकतो. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मित्र, परिचित आणि कुटुंबातील सदस्यांचे समर्थन, सहकार्य आणि आपुलकी मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतील. काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदार किंवा मित्रांशी मतभेद होऊ शकतात. अशावेळी वादाच्या ऐवजी संवादातून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करावा.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. झटपट लाभामुळे कालांतराने होणारे नुकसान टाळणे हिताचे ठरू शकेल. सहलीला जात असाल तर आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरदारांना काम आणि घराचा समतोल साधण्यात काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळू शकेल. घराच्या सजावटीवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमप्रकरणांच्या दृष्टिकोनातून हा काळ थोडा त्रासदायक ठरू शकतो. वैवाहिक जीवन गोड करण्यासाठी आयुष्याच्या जोडीदाराला पूर्ण वेळ द्यावा.

धनु राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वेळ आणि आरोग्य या दोन्हींची खूप काळजी घ्यावी लागेल. आजचे काम उद्यावर सोडण्याची सवय टाळावी लागेल. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकेल. व्यावसायिकांनी अशा कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणे टाळणे हिताचे ठरू शकेल. जोखीम घेऊ नये. कामाच्या ठिकाणी लहानसहान बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका.

मकर राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना अनुकूल ठरू शकेल. तुमच्या बोलण्याने एखादे काम बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. सर्व लक्ष तुमच्या घरावर आणि कुटुंबावर केंद्रित कराल. कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या सोडवताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. करिअर पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशी चांगले संबंध राखण्याची आवश्यकता असेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबाच्या गरजांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. घर किंवा कोणत्याही महागड्या वस्तू इत्यादींच्या दुरुस्तीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. ज्यामुळे बजेट बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहील. प्रेम जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. व्यावसायिकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना आगामी मे महिना यशकारक ठरू शकेल. प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. प्रयत्न पूर्णपणे फलदायी ठरू शकतील. मोठ्या योजनेत पैसे गुंतवताना सल्ला घेणे योग्य राहील. घरात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह सहल किंवा एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊ शकता. नोकरदारांना इच्छित पदोन्नती मिळू शकते. एखाद्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.