ज्योतिषशास्त्र सांगते, वायफळ बडबड करणाऱ्या 'या' राशीच्या लोकांनी जरा बोलण्यावर आवर घाला, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:35 PM 2022-05-20T15:35:13+5:30 2022-05-20T15:41:08+5:30
काही लोक तबकडीवर पिन ठेवावी तसे पिन बाजूला करेपर्यंत अथक बोलत राहतात. अशा लोकांना बोलायला कोणतेही विषय चालतात. समोर मूक व्यक्ती बसवली तरी त्याच्याही वाटचे बोलायची यांची तयारी असते. त्यांना पाहता आपल्याला शोले मधील बसंती नाहीतर जब वुई मेट मधील गीत नक्की आठवेल. मात्र अशा बडबड्या लोकांना ज्योतिष शास्त्राने मोलाचा सल्ला दिला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. त्यांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. कोणत्याही व्यक्तीची राशी, ग्रहस्थिती यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. राशीनुसार काही लोक स्वभावाने शांत असतात. तर काही लोकांना खूप बोलण्याची सवय असते. खूप बोलण्याची सवय त्यांना त्रासदायक ठरू शकते.
जे लोक जास्त बोलतात त्यांना ज्योतिष शास्त्राने सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला आहे. हे लोक कधी कधी खूप बोलण्याच्या सवयीमुळे स्वतःसाठी अनेक समस्या निर्माण करतात. तसेच त्यांच्या बोलण्याचा विपर्यास होऊन समोरच्याचे गैरसमज देखील होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना ज्योतिष शास्त्राने सावधतेचा इशारा दिला आहे ते! त्यांच्या म्हणण्यानुसार अशा लोकांनी आपल्या शब्दांना आवर घातला नाही तर त्यांना भविष्यावर आवर घालावा लागेल. म्हणून पुढील राशींनी वेळीच जागे व्हा!
वृषभ - ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. आणि या राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा वृषभ राशीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असतो, किंवा राहू किंवा केतू ग्रहांनी त्रस्त असतो, तेव्हा या लोकांचा जिभेवरील ताबा सुटतो. आणि त्यांची बेताल बडबड सुरू होते. या अवांतर बडबडीमुळे समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते, बोलण्याच्या भरात तिचा अपमान होऊ शकतो किंवा ती दुखावली जाऊ शकते. म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.
मिथुन : या राशीच्या लोकांचे नाव काहीही असले तरी त्यांचे आडनाव गोडबोले ठेवावे, इतके ते गोड गोड बोलतात. त्यांच्या प्रभावी बोलण्यामुळे समोरची व्यक्ती आकर्षित होते. मात्र कौतुक करण्याच्या नादात ते कधी कधी एवढे वाहवत जातात की त्यांना समोरच्यांकडून अपमानाचे घोट रिचवावे लागतात. अशा लोकांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे. स्तुती करावी परंतु उगीचच खोटे कौतुक करू नये, अन्यथा त्यांचेच पितळ उघडे पडू शकते.
कन्या - या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे हे जाणून घेऊया. बुध ग्रहाचा संबंध वाणीशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या राशीचे लोक त्यांच्या भाषा आणि वक्तव्याबद्दल खूप जागरूक असतात. त्यांच्या बोलण्यात विद्वत्ता जाणवते. मात्र अनावधानाने त्यांनी बोललेला एखादा कटू शब्द त्यांच्या वैऱ्यांची संख्या वाढवू शकतो. म्हणून या राशीच्या लोकांनी आपली कमी आणि मोजके बोलण्याची वृत्ती कायम ठेवून जाणीवपूर्वक बोलण्याची सवय लावून घ्यावी, अन्यथा नात्यांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.
मकर - या राशीचे स्वामी शनी देव असल्यामुळे या राशीच्या लोकांवर शनी देवांची करडी नजर असते. शनी देवांना फसव्या भूल थापा, अपमान, खोटी स्तुती आवडत नाही. तसे करणाऱ्या लोकांना शनी देव चांगलीच शिक्षा करतात. म्हणून मकर राशीच्या लोकांनी आपल्या शब्दांचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे. अन्यथा त्यांच्या कामात अडचणी वाढू शकतील.