Astrology Tips: हळकुंडाचे पाच उपाय सोडवतील तुमच्या आयुष्यातील गुंतागुंतीचे प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 01:35 PM2023-05-11T13:35:10+5:302023-05-11T13:38:12+5:30

हळद हा असा पदार्थ आहे, ज्यामध्ये एक नाही तर अनेक गुणधर्म आहेत. याचा उपयोग फक्त स्वयंपाकातच नाही तर रोगांवर उपचार करण्यासाठीही केला जातो. एवढेच नाही तर प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य मानण्यात आला आहे. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे. हळदीशी संबंधित अनेक उपाय देखील लोकप्रिय आहेत. भाग्योदयासाठी हळदीचे काही तोडगे सुचवले जातात. त्यापैकी ५ सोपे तोडगे जाणून घेऊ!

जर तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही हळदीचा उपाय करू शकता. एका पुरचुंडीत हळकुंड ठेवून त्याची गाठ मारा आणि ती पुरचुंडी रात्री डोक्याजवळ ठेवून झोपा. हा उपाय केल्याने वाईट स्वप्ने थांबतात आणि चांगली झोप लागते.

एखाद्याला दिलेले पैसे परत येत नसतील किंवा एखाद्या ठेवीत पैसे अडकले असेल तर थोडे तांदूळ घेऊन त्यात हळद मिसळा. यानंतर ते तांदूळ लाल कापडाच्या छोट्याशा तुकड्यात बांधून ती पुडी पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने अडकलेला पैसा लवकर परत येतो.

अनेक प्रयत्न करूनही तुमच्या वैवाहिक जीवनात अडचण येत असेल? तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर रोज चिमूटभर हळद अर्पण करा. तसेच दर गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा. असे मानले जाते की या उपायाने वैवाहिक अडचणी दूर होतात आणि मनासारखा जोडीदार मिळतो.

जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल आणि तुम्हाला त्याच्या यशाबद्दल थोडीशीही शंका असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला हळद लावून आशीर्वाद घ्या. यानंतर त्याच हळदीने कपाळावर तिलक लावा. असे म्हटले जाते की असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात त्यात यश मिळते.

जर तुम्ही काही काम करण्यासाठी खूप मेहनत करत असाल पण त्यात यश मिळत नसेल तर तुम्ही हळदीचा उपाय करू शकता. बुधवारी गणपतीला अक्ख्या हळदीची म्हणजेच हळकुंडाची माळ अर्पण करावी. असे केल्याने मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्तीस हातभार लागतो.