Astrology Tips: लक्ष्मी मातेची कृपा व्हावी म्हणून ज्योतिष शास्त्राने सांगितलेले पाच खात्रीशीर उपाय जरूर करा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:25 AM 2023-12-01T10:25:39+5:30 2023-12-01T10:28:43+5:30
Astrology Tips: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पुष्य नक्षत्राचाही अतिशय शुभ संयोग तयार झाला आहे. हा योग ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप शुभ मानला जातो. या शुभ योगामध्ये करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही काम किंवा भागीदारीत व्यवसाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्रात सोने-चांदी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेले खास उपाय जाणून घ्या. १ डिसेंबर रोजी जुळून आलेला योग हा तुमची आर्थिक स्थिती बळकट करणारा आहे. या दिवशी पैसा आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम केल्यास भविष्यात खूप शुभ परिणाम मिळतील. त्यासाठी पुढे दिलेल्या उपायानुसार देवी लक्ष्मीची उपासना अवश्य करा
खीरीचा नैवेद्य शुक्रवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा. शेवया, रवा, तांदूळ, मखाणा यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता. हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या सवाष्ण स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभाशीर्वाद लाभतील.
तांदळाचे दान करा शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्र ग्रहाला समर्पित आहे आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव पांढर्या खाद्यपदार्थांवर मानला जातो. शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते.
सौभाग्य वाण द्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या, जोडवी, हळद- कुंकू यांसारखे सौभाग्य अलंकार द्या. संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करावी. त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान यथाशक्ती आर्थिक दान करा. हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
वेलची उपाय शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याचा पाण्यात चिमूटभर वेलची पूड घाला. दर शुक्रवारी हा उपाय करा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल.
अत्तराचे उपाय लक्ष्मी माता ही वैभव संपन्न देवता आहे. तिला अत्तराचा सुगंध प्रिय आहे. म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या. तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल.