Astrology Tips: लक्ष्मी मातेला प्राजक्ताची फुलं वहा, आर्थिक स्थिती, भाग्य आणि आरोग्य बदलताना बघा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 09:01 AM 2022-11-11T09:01:42+5:30 2022-11-11T09:14:15+5:30
Astrology Tips: प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतो. पण अनेक वेळा माणसाला त्याच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने व्यक्तीला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या उपायांपैकी एक उपाय म्हणजे लक्ष्मी मातेला तिच्या आवडीचे फुल अर्पण करणे. लक्ष्मी मातेला कमळ आवडतेच, पण त्याबरोबरीने प्राजक्ताची फुलेही तिला अतिशय आवडतात. या फुलांचा गंध मोहक असतोच, शिवाय त्याचे आयुर्वेदिक गुणधर्मही अत्यंत लाभदायी असतात. एवढेच काय तर ज्योतिष शास्त्रानेही या झाडाचे महत्त्व ओळखून भाग्योदयासाठी काही उपाय सुचवले आहेत. ज्योतिष, आयुर्वेद, अध्यात्म हे सगळे प्रकार आपल्याला निसर्गाशी जोडणारे आहेत. त्याचे दुष्परिणाम तर नाहीच पण झालेच तर अनेक फायदे होतील. कोणते, ते जाणून घेऊ.
जर तुमच्याकडे पैशांची आवक आहे पण काही कारणाने घरात पैसा टिकत नसेल, वरचेवर खर्च होत असेल, तर तर प्राजक्ताची ५फुले घ्या, ती वाळवा आणि पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा आणि तिजोरीत सुरक्षित ठेवा. असे केल्याने पैशांचा व्यय कमी होतो आणि बचत वाढते असा अनेकांचा अनुभव आहे.
प्राजक्ताची फुलं दुसऱ्याच्या अंगणात पडत असली, तरी त्याचे असंख्य लाभ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्या दारात प्राजक्ताचे झाड असते, त्यांच्या झाडाला फुलांचा बहर येतो आणि त्या घरातल्या कुटुंबियांच्या भाग्याला बहर येतो असे म्हणतात. तुम्हीदेखील हा अनुभव घेऊन बघा!
प्राजक्ताचा सुगंध मन मोहून टाकणारा असतो. ते झाड असेल अशा ठिकाणी आपण वाट वाकडी करून जाण्याचीही तयारी ठेवतो. त्याच्या सान्निध्यात प्रसन्न वाटते. म्हणून ज्या घरात एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असते, त्या घरात प्राजक्ताचे झाड आवर्जून लावावे. आजारातून बरे होण्यास गती मिळते.
नोकरीचा प्रश्न असेल, पदोन्नती मिळत नसेल तर, नवीन नोकरीच्या शोधात असाल तर एका लाल रुमालात किंवा कापडात ओंजळभर प्राजक्ताची फुले घ्या आणि दर शुक्रवारी अंघोळ झाल्यावर लक्ष्मी मातेला ती अर्पण करा.
प्राजक्ताच्या झाडाची फांदी आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवली तरीदेखील पैशांची उणीव कधी भासत नाही असे म्हणतात. कर्जबाजारी असाल किंवा आर्थिक चणचण जाणवत असेल तर हा उपाय अवश्य करून बघा.
वैवाहिक प्रश्न, रोजचे वाद, विसंवाद यावर देखील प्राजक्ताची फुलं अतिशय उपयुक्त ठरतात. रोज सकाळी प्राजक्ताची उन्मळून पडलेली फुलं वेचून पती पत्नीने ती फुलं लक्ष्मी मातेला वाहावीत. तसेच रात्री झोपताना ओंजळभर फुलं उशाशी ठेवावीत.