रामायण महाभारतातील 'या' तीन प्रसंगातून आयुष्यात 'या' तीन चुका टाळा. By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:00 AM 2021-04-05T08:00:00+5:30 2021-04-05T08:00:02+5:30
दरवेळी आपल्याच अनुभवातून शिकावे असे नाही, तर दुसऱ्यांच्याही अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकता येते. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' ही म्हण त्यासाठीच आहे. भावनेच्या भरात तीन चुका टाळल्या पाहिजेत, त्या चुका कोणत्या आणि त्यामुळे काय विपरीत घडते, हे समजून घेण्यासाठी रामायण महाभारतातल्या प्रसंगाचा आधार घेऊया. आनंदाच्या भरात वचन देऊ नका. एकदा असुरांनी इंद्रपुरीवर आक्रमण केले. असुरांना आटोक्यात आणणे कठीण होत होते. तेव्हा इंद्राने अजेय, पराक्रमी अशा दशरथ राजाला पृथ्वीवरून बोलावणे पाठवले. पुत्रकामेष्टी यज्ञाच्या तयारीत असलेला दशरथ राजा गुरु कर्तव्यपूर्तीसाठी देवलोकी जायला निघाला. त्यावेळी त्याची पट्टराणी कैकेयी हिने सोबत येण्याचा हट्ट धरला. ती देखील युद्धकलेत प्रवीण होती. तिने दशरथाकडे हट्ट करून रथाचे सारथ्य केले. दोघे जण सैन्याची तुकडी घेऊन देवलोकी गेले. असुरांशी युद्ध केले. एका बाणात दशरथाच्या रथाचे चाक कोलमडून पडण्याच्या अवस्थेत होते. तेव्हा कैकेयीने रथाखाली उडी घेऊन रथ सावरून धरला. दशरथाने युद्ध जिंकले. आणि या यशाचे श्रेय आपल्या पत्नीला देत आनंदाच्या भरात म्हणाला, 'तुझ्यावर मी खूप प्रसन्न आहे, तुला हवे ते मागून घे.' कैकेयी म्हणाली, 'राजन, एक नाही दोन वर मला हवे आहेत, पण ते वर आता मागावे अशी गरज नाही. योग्य वेळी मी ते मागून घेईन. तेव्हा तुम्ही तुमचा शब्द पाळा म्हणजे झाले.' दशरथाने वचन दिले आणि याच वचनपूर्तीसाठी रामाला ऐन तारुण्यात चौदा वर्षे वनवास भोगावा लागला.
रागाच्या भरात उत्तर देऊ नका. एकापेक्षा एक पराक्रमी अशा पांडवांना हरवणे कौरवांसमोर मोठे आव्हान होते. त्यांना पराजित करण्यासाठी शकुनी मामांनी दुर्योधनाला द्यूत खेळण्याचा सल्ला दिला. कृष्णाने सावध करूनही दुर्योधनाच्या चेतवण्यामुळे पांडवांनी दंड थोपटले आणि द्यूत खेळायला बसले. अधर्मी कौरवांना तेच हवे होते. त्यांनी आपल्या मायाजाळाने फासे आपल्या बाजूने पाडून पांडवांना देशोधडीला लावले. रागात घेतलेल्या निर्णयामुळे द्युतात हरलेले पांडव आपले राज्य, सैन्य, सिंहासन, संपत्ती, वैभव सारे काही गमावून बसले. एवढेच काय तर भर दरबारात त्यांना आपल्या पत्नीचे शीलहरण होताना पहावे लागले. रागात उचललेले एक पाऊल सगळे काही संपवून टाकते.
दुःखाच्या भरात निर्णय घेऊ नका. दंडकारण्यात अनेक असुरांचे साम्राज्य आहे, हे माहीत असतानाही सुवर्ण कांचन अर्थात सोन्याचे हरीण पाहून सीता भुलली. तिने रामाला ते हरीण पकडून आणण्याचा हट्ट धरला. बायकोच्या प्रेमापोटी राम हरीणाला पकडायला गेले. पण जाता जाता लक्ष्मणाला सीतेकडे लक्ष दे असे सांगून गेले. बराच वेळ झाला तरी राम परतले नाहीत. उलट दूरवरून ते लक्ष्मण आणि सीतेचा धावा करत असल्याचा आवाज सीतेच्या कानावर पडला. सीतेने लक्ष्मणाला जाण्याची आज्ञा दिली. त्यावर लक्ष्मण म्हणाला, 'सीता माई, श्रीराम स्वसंरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. त्यांना माझ्या मदतीची गरज नाही. कोणी असुर आपल्याशी खेळ करत आहे, आपल्याला सावध राहायला हवे. यावर सीता शोकाकुल होऊन म्हणाली, 'तुला तुझ्या भावाच्या जीवाची जराही काळजी नाही. तू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इथे थांबला आहेस.' हे बोल लक्ष्मणाला जिव्हारी लागले. तो जायला निघाला. तरी कर्तव्यपूर्ती म्हणून त्याने सीतेच्या रक्षणार्थ लक्ष्मणरेषा आखली आणि ती ओलांडू नको, अशी विनवणी केली. कोणी घरात नाही पाहून रावणाने वेषांतर करून डाव साधला आणि सीतेला दुःखाच्या भरात आपण चुकीचा निर्णय घेतल्याचा पश्चात्ताप झाला.