देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 02:59 PM 2024-09-28T14:59:10+5:30 2024-09-28T15:20:48+5:30
रामललाचे दर्शन घेण्यासाठी दररोज एक लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात येत असून, मिळणाऱ्या दान, देणग्यांची रक्कमही अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते आहे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत दररोज लाखो भाविक अयोध्येत राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. १८० दिवसांत सुमारे ११ कोटी भाविक, पर्यटकांनी रामललाचे दर्शन घेतले, असे सांगितले जात आहे.
केवळ राम मंदिर नाही, तर या परिसरात अनेक मंदिरे उभारली जाणार आहेत. सुमारे ७० एकरांवर विकसित होत असलेल्या राम मंदिर संकुलात एकूण १८ मंदिरे बांधली जाणार आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी अगस्त्य, माता भगवती, निषादराज, अहिल्या, शबरी, तुलसीदास आदींच्या मंदिरांचा समावेश असणार आहे. तसेच याशिवाय संग्रहालय, ट्रस्ट ऑफिस आणि गेस्ट हाऊस बांधण्यात येणार आहे.
देशभरातील अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळींनी रामललाचे दर्शन घेतले आहे. परदेशात राहणाऱ्या हजारो प्रवासी भारतीयांनीही राम मंदिराचे दर्शन घेतले आहे. केवळ भाविक नाही, तर लाखो पर्यटकही राम मंदिराचे भव्य स्वरुप पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिराचा समावेश झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
प्रभू श्रीराम आपल्या मंदिरात विराजमान आहेत. तेव्हापासून एक लाखाहून अधिक रामभक्त दररोज भेट देत आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी मनापासून देणगी देत आहेत. काही महिन्यात राम मंदिराचे वार्षिक उत्पन्न आणि दान, देणगीची रक्कम देशातील इतर मंदिरांच्या बरोबरीने पोहोचले आहे.
ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या राम मंदिरात आतापर्यंत सुमारे ४०० कोटींचे दान, देणगी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत यात वेगाने वाढ झालेली आहे. गेल्या पाच वर्षांत रामलला यांना विविध माध्यमातून ५५ अब्ज रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, तर १३ क्विंटल चांदी आणि २० किलो सोनेही मिळाले आहे, अशी माहिती देण्यात येते.
उत्तर प्रदेशात काशीच्या कॉरिडॉरनंतर भाविकांची संख्या आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. सात वर्षांपूर्वी भाविकांडून येणारी दानाची रक्कम सुमारे २०.१४ कोटींच्या घरात असायची. आता मात्र, या काशी मंदिरात ८६.७९ कोटी रुपयांचे दान केले जाते. काशीचे अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिर जगभरातील श्रीमंत देवस्थानांच्या यादीत येते. व्यंकटेश्वर बालाजी देवाचे दर्शन घेण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. दरवर्षी सुमारे १४५० ते १६०० कोटी रुपयांचे दान भाविकांकडून केले जाते. तसेच सोने-चांदी, विविध वस्तूही अर्पण केल्या जातात.
केरळमधील अनेक मंदिरे स्थापत्य, कलाकुसर आणि देवतांच्या महात्म्यांमुळे जगप्रसिद्ध आहेत. यातील पद्मनाभस्वामी मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात भाविकांकडून वर्षभरात सुमारे ७०० कोटींचे दान दिले जाते, असे म्हटले आहे. तसेच सोने-चांदी, विविध वस्तूही अर्पण केल्या जातात.
पंजाबमधील स्वर्ण मंदिरात पर्यटक आणि भाविकांची रेलचेल असते. चारही बाजूंनी असलेल्या पाण्यातील हे भव्य मंदिर पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. या मंदिरात सुमारे ५०० कोटींचे दान दिले जाते, असे म्हटले जाते.
जम्मू काश्मीर कटरा येथील वैष्णो देवी मंदिर भाविकांनी गजबजलेले असते. अथक परिश्रम, मेहनत घेऊन भक्त देवीचरणी लीन होतात. या मंदिर देवस्थानला सुमारे ४०० कोटींचे दान भाविकांकडून मिळते, असे सांगितले जाते.
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा मंदिर श्रीमंत मंदिराच्या यादीत येते. साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. या मंदिरात सुमारे ४०० कोटींचे दान भाविकांकडून केले जाते, असे सांगितले जाते.
ओडिशा पुरी येथील जगन्नाथ मंदिरातही भाविकांची रेलचेल असते. रथयात्रेत लाखो भाविक सहभागी होत असतात. परंतु, दररोजही हजारो भाविक जगन्नाथाचे दर्शन घेतात. या मंदिरात २३० ते २४० कोटींचे दान सामान्यपणे भाविकांचे होते. यासह सोने-चांदी, विविध वस्तूंचेही दान केले जाते.
मुंबई, महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर हे श्रीमंत देवस्थानांच्या यादीत आहे. दररोज हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पा चरणी नतमस्तक होतात. सिद्धिविनायक मंदिरात १०० ते १५० कोटींचे दान केले जाते. तसेच सोने-चांदी, विविध वस्तूंचेही दान केले जाते.
स्थापत्य कला आणि भव्यता यांसाठी अक्षरधाम मंदिरे ओळखली जातात. केवळ देशात नाही, तर परदेशातही अक्षरधाम मंदिरे आहेत. नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात सुमारे ६० ते १०० कोटींचे दान दिले जाते. हजारो पर्यटक, भाविक दररोज येथे येतात आणि येथील सौंदर्याचा आनंद घेतात.
गुजरातमधील सोमनाथ मंदिर नेहमीच भाविकांनी गजबजलेले असते. वर्षभरात गुजरातमधील सोमनाथ मंदिरात ५० ते १०० कोटींचे दान दिले जाते. तसेच सोने-चांदी, विविध वस्तूंचेही दान केले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.